अनहोनी को होनी करदे "धोनी", भाग ०२
- डॉ अनिल पावशेकर
_______________________________________
साल २००५, स्थळ जयपुरचे सवाई मानसिंह स्टेडियम आणि निमित्त होते भारत विरुद्ध श्रीलंका यातील तिसरा एकदिवसीय सामना. लंकेने प्रथम फलंदाजी करत २९८ धावांचा डोंगर उभारला होता आणि सचिनला दोन धावांत बाद करत लंकेने टीम इंडियावर दबाव वाढवलेला होता. प्रसंग बाका होता आणि इथेच प्रशिक्षक जॉन 'राईट' यांनी एक 'राईट' निर्णय घेतला. अनुभवी राहुल द्रविड ऐवजी नवोदित खेळाडूला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला धाडले आणि याच बेधडक फलंदाजाने १५ चौकार आणि १० षटकारांची बरसात करत १४५ चेंडूत नाबाद १८३ धावा ठोकत सामना जिंकून दिला होता.
पुढे जाऊन याच खेळाडूने टीम इंडीयाला आयसीसीची तिन्ही विश्वचषके जिंकून दिली होती. या करामती योद्ध्याचे नाव होते महेंद्रसिंग पानसिंग धोनी. यष्टीरक्षणात निपुण असलेला हा खेळाडू आपल्या जिगरबाज फलंदाजीने टीम इंडियाचा आधारस्तंभ बनला होता. सचिन, सेहवाग, द्रविड आणि गांगुलीच्या अस्तानंतर पोरक्या झालेल्या टीम इंडियाचा डोलारा याच पठ्ठ्याने आपल्या खांद्यावर सांभाळला होता. केवळ फलंदाजीचीच नव्हे तर धोनीला क्रिकेटची पण उत्तम जाण होती. यामुळेच कित्येदका अशक्यप्राय वाटणारे सामने धोनीच्या झंझावाताने आपण जिंकले होते.
विशेषतः एकदिवसीय सामन्यात धोनीचा खेळ बहरून यायचा. त्यातच धोनीला जेव्हा सिक्सर किंग युवीची साथ मिळायची तेंव्हा ही *संताजी धनाजीची जोडी* प्रतिस्पर्धी संघाला फाडून खायची. धोनी मैदानावर असेपर्यंत धावगती किती आहे, किती विकेट बाकी आहेत याची मुळीच चिंता नसायची. अगदी तळागाळातील फलंदाज असले तरी *जे का रंजले गांजले, त्यांसी म्हणे जो आपुले* प्रमाणे धोनी उर्वरीत फलंदाजांना हाताशी धरत विरोधकांच्या जबड्यातून सामने खेचून आणत असे. त्याच्या याच कलेमुळे त्याला सर्वोत्तम फिनिशर मानले जायचे.
खरेतर धोनी हा आक्रमक जातकुळीतला फलंदाज. मात्र फलंदाजी करतांना केवळ त्याची बॅट आक्रमक असायची. शांत डोक्याने गोलंदाजांची कत्तल करणाऱ्या धोनीला खरेतर कोल्ड ब्लडेड मर्डरर म्हटल्यास वावगे ठरणार नाही. आपल्या भन्नाट बॅट स्पिडने सणसणीत चौकार आणि उत्तुंग षटकार ठोकत गोलंदाजांचे सर्वांदेखत वस्त्रहरण करणा-या धोनीला पाहताच गोलंदाज दे रे कान्हा चोळी, लुगडी चा धावा नक्कीच करत असणार. विशेषतः आपल्या हेलिकॉप्टर शॉटने धोनी गोलंदाजांना चांगलाच जेरीस आणायचा. यॉर्कर लेंथचा चेंडू असो की पायाशी पडणाऱ्या टप्प्याचा चेंडू असो, हवेत ३ चमत्कारिक अंशातून बॅट फिरवत तो चेंडूला लिलया सिमेबाहेर पाठवून सर्वांना आश्र्चर्यचकित करायचा.
वास्तविकत: १९०३ ला राईट बंधूंनी विमानाचा तर १९१२ ला एगोर सिकोर्स्कीने हेलिकॉप्टरचा शोध लावला. मात्र धोनीचे हेलिकॉप्टर शॉटचे अफलातून तंत्र आणि चेंडू आकाशी उडवण्याची कला पाहता या दोन्ही शोधांच्या पेटेंटवर धोनी नक्कीच हक्क गाजवू शकतो. आपल्या बॅटचे पाणी गोलंदाजांना पाजत धोनीने जगभरात चांगलाच दरारा निर्माण केला होता. फलंदाजीतील आक्रमकता ही त्याची कवचकुंडले होती. *गरुडासारखी तिक्ष्ण नजर आणि उसेन बोल्टचे पाय घेऊन २२ यार्डाचे अंतर तो क्षणात कापायचा*. सोबतच त्याचे कल्पक यष्टीरक्षण आणि चाणाक्ष नेतृत्व समकालीन प्रतिस्पर्धी कर्णधारांपेक्षा चटकन उठून दिसत होते. याच शिदोरीवर माहीचा सुर्य २०१५ पर्यंत क्रिकेटविश्वावर तेजाने तळपत होता.
यानंतर मात्र वयोमानानुसार त्याच्या फलंदाजीला मर्यादा येऊ लागल्या होत्या. भलेही त्याचे रनिंग बिटविन दी विकेट्स आजही अतुल्य असले तरी खणखणीत चौकार आणि गगणभेदी षटकार त्याच्या भात्यातून हळूहळू अदृश्य होऊ लागले होते. त्याची हिच कवचकुंडले गळून पडू लागली होती. याचा थेट परिणाम सामन्याच्या निकालावर होऊ लागला होता. युवी संघात नसल्याने तसेच रोहीत, धवन, विराट वगळता संघात मध्यफळीत एकही जागतिक दर्जाचा फलंदाज नसल्याने सर्व दबाब धोनीवर येऊन पडला होता. वयोमानानुसार त्याच्या पोलादी फलंदाजीला तडे जाऊ लागले होते. इथेच जणुकाही नियतीने क्रुर खेळ करत ये हाथ मुझे दे दे ठाकूर करत त्याच्या दे दणादण फलंदाजीला ब्रेक लावला होता.
अखेर आपुलीच प्रतिमा होते आपुलीच वैरीच्या दुष्ट विळख्यात माही गुरफटून गेला होता. एकहाती सामना जिंकून देणारा माही सामने वाचविण्यात अपयशी ठरू लागला होता. माही नावाच्या सिंहाला यष्टीरक्षणाची यशस्वी आयाळ असली तरी फलंदाजीरुपी त्याची दातनखे काळाने हिरावून घेतली होती. सहाजिकच यावेळी धोनी विरोधकांच्या खाटा कुरकुरायला लागल्या होत्या आणि माही चा सूर्य आता मावळतीला लागला, अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. हमखास सामने जिंकून देणारा माही संघाची नाव विजयी पैलतीरावर नेण्यात अपयशी ठरू लागताच त्याची संघातून गच्छंती अटळ होती. केवळ उत्तम यष्टीरक्षणाच्या व्याजावर त्याला संघात सामावणे अवघड होऊन बसले होते. अखेर निवड समितीने २०१८ विंडीज आणि कांगारूंविरूद्ध टी ट्वेंटी मालिकेत माही ला वगळून त्याचे परतीचे दोर कापून टाकले होते.
माहीला आपला जलवा दाखवायला २०१९ चा विश्र्वचषकात नामी संधी मिळाली होती परंतु त्याच्या बॅटने संथ वाहतो धोनीचा माई सारखी गती दाखवल्याने टीम इंडियाची गत आणि पत उपांत्य सामन्या पर्यंतच मर्यादित राहिली. शेवटी अपयशाचे खापर धोनीवर फोडून इतर नामानिराळे राहिले. एरवी अंदाज घेऊन दुहेरी धाव वेगात घेणारा धोनी किवी विरूद्धच्या उपांत्य सामन्यात अगदी काही मि.मी. अंतराने बाद झाला. कर्णाचा रथ चिखलात फसावा तशी त्याची बॅट क्रिझच्या बाहेर फसली आणि टीम इंडियाला विश्र्वचषकातून आपला बाशा गुंडाळावा लागला होता. आधीच कसोटी आणि टी ट्वेंटी चे दरवाजे बंद होते, त्यातच विश्वचषकातल्या पराभवाने धोनी विरूद्ध आगीत तेल ओतण्याचे काम केले. धोनीवर निवृत्ती साठी दबाब वाढू लागला होता.
एबी डिव्हीलीअर्सने तर धोनी ८० वर्षांचा झाला तरी संघात हवा असे धोनीबाबत गौरवोद्गार काढले होते. मात्र व्यवहारीक दृष्ट्या एकदिवसीय सामने आणि टी ट्वेंटी सारख्या वेगवान खेळात इतिहास, रेकॉर्ड, भावना यांना फार महत्त्व देणे हानीकारक ठरते. आंतरराष्ट्रीय स्तरावर भावनेपेक्षा प्रदर्शन महत्त्वाचे असते शिवाय इतिहासालाच कवटाळून बसले तर नवा इतिहास कसा रचणार? सोबतच निवड समितीची मेहेरनजरसुद्धा तितकीच महत्त्वाची असते. यावर्षी कोरानाने घातलेला धुमाकूळ पाहता आंतरराष्ट्रीय क्रिकेट बाबत अनिश्चितता वाढली होती. अखेर स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त शोधून महेंद्रसिंग धोनीने क्रिकेटपासून स्वतंत्र होण्याचा कटू निर्णय घेतला.
क्रमश:....
दि. १९ ऑगस्ट २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com