श्रीरामपूर : अहिल्यानगर सामाजिक वनीकरण विभागाच्या अधिनस्त असलेल्या श्रीरामपूर सामाजिक वनीकरण परीक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी वृक्षारोपणाच्या कामात शासनाची घोर फसवणूक करून मोठा आर्थिक घोटाळा करत असल्याचा धक्कादायक प्रकार सामाजिक कार्यकर्त्यांनी उघड केला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील मातापूर ते कारेगाव रस्त्यावरील वृक्षारोपण कामाच्या दैनंदिन उपस्थिती पत्रकात एकाच व्यक्तीच्या नावावर अन्य अनेक व्यक्तींचे फोटो नोंदवून खोटी उपस्थिती दाखवून शासकीय निधीचा गैरवापर व कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार शिवाजी दांडगे, सुधीर तुपे, राजेश बोरुडे यांनी अहिल्यानगरचे विभागीय सामाजिक वनीकरण अधिकारी सचिन कंद यांच्याकडे केली आहे.
शिवाजी दांडगे, सुधीर तुपे, राजेश बोरुडे यांनी यासंदर्भात केलेल्या तक्रारीत नमुद केले आहे कि, श्रीरामपूर सामाजिक वनीकरण कार्यालयाचे वनपरिक्षेत्र अधिकारी महेंद्रकुमार कोळी यांच्यामार्फत मातापुर ते कारेगाव रस्ता दुतर्फा १ हजार वृक्षलागवडीच्या कामात गंभीर आर्थिक अनियमितता आणि भ्रष्टाचार झाल्याचे निदर्शनास येत आहे. या कामाच्या दैनंदिन उपस्थिती पत्रकात दत्तात्रय विश्वनाथ कानडे यांची उपस्थिती नोंदवण्यात आलेली आहे. परंतु, प्रत्यक्षात दत्तात्रय विश्वनाथ कानडे हे कामावर उपस्थित नसताना, त्यांच्या जागी अन्य व्यक्तींचे फोटो नोंदवून खोटी उपस्थिती दाखवण्यात आली आहे. शासकीय निधीचा गैरवापर आणि कामात भ्रष्टाचार झाल्याचे यातून स्पष्ट होते. प्रत्यक्ष कामावरील मजुरांच्या फोटोसह उपस्थिती अहवालात श्रीरामपूर सामाजिक वनीकरण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कामावर प्रत्यक्ष मजूर नसताना खोटी उपस्थिती नोंदवून भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध होत असल्याचा दावा शिवाजी दांडगे, सुधीर तुपे, राजेश बोरुडे यांनी केला आहे.
मातापुर ते कारेगाव रस्त्यावरील वृक्षारोपण कामात केलेल्या आर्थिक अनियमिततेची व भ्रष्टाचाराची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत कठोर कायदेशीर कारवाई करावी. याच धर्तीवर, सामाजिक वनीकरण विभाग श्रीरामपूर यांच्यामार्फत तालुक्यातील इतर सर्व वृक्षारोपण व तत्सम कामांची व्यापक चौकशी करावी, जेणेकरून भविष्यात अशा प्रकारचा भ्रष्टाचार थांबवता येईल आणि शासकीय निधीचा योग्य वापर सुनिश्चित होईल, असेही तक्रारदार राजेश बोरुडे, शिवाजी दांडगे, सुधीर तुपे यांनी म्हंटले आहे.
नाव पुरुषाचे आणि फोटो महिलेचा...
७ जून २०२५ रोजीच्या मजूर उपस्थिती अहवालात मजूर म्हणून दत्तात्रय विश्वनाथ कानडे असे नाव असून फोटो महिलेचा असल्याची नोंद आहे.
एकाच व्यक्तीच्या नावावर अन्य अनेक व्यक्तींचे फोटो आणि सर्वांचा जॉब कार्ड क्रमांक एकच...
मजुरांच्या उपस्थिती अहवालात दत्तात्रय विश्वनाथ कानडे या एकाच व्यक्तीच्या नावावर अनेक व्यक्तीचे फोटो अपलोड करण्यात आले आहेत. त्यात महिला व विविध वयोगटातील पुरुष आहेत. दत्तात्रय कानडे या एका व्यक्तीच्या नावाने अनेक अन्य व्यक्तींचे फोटो उपस्थिती अहवालात दाखविण्यात आले आहेत. या सर्व मजुरांचा जॉब कार्ड क्रमांकही एक आहे. शिवाय सर्वांचे फोटो विशाल कानडे या व्यक्तीने काढले आहेत. या सर्वांची व वनक्षेत्रपाल महेंद्रकुमार कोळी यांनी केलेल्या गैरव्यवहार अनियमिततेची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे.
--- राजेश बोरुडे