श्रीरामपूर : वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, दिंडी आणि विठू नामाचा गजर...अशा विठ्ठलमय वातावरणात बालवारकऱ्यांची विठ्ठल नामाची शाळा नगरपालिकेच्या शाळा क्रमांक तीन मध्ये मोठ्या उत्साहात भरली.
आषाढी एकादशीच्या पूर्वसंधेला गोंधवणीतील नगरपालिका शाळा क्रमांक ३ मध्ये दिंडी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विठ्ठल-रुख्मिणी बनलेल्या बालवारकऱ्यांची मुख्याध्यापिका स्मिता गायकवाड यांच्या हस्ते पूजा होऊन दिंडीला सुरुवात झाली. यावेळी शाळा परिसरातून दिंडी काढण्यात आली. सुजाता व श्रेयस शिंदे या बालवारकऱ्यांनी विठ्ठल-रखुमाई ची धारण केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. शाळेतील सर्व मुला-मुलींनी वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केली होती. मुलींनी नऊवारी साडी परिधान करून डोक्यावर तुलसी वृंदावन घेतले होते. मुलांनी पांढरा शर्ट, पायजमा व डोक्यावर टोपी असा वारकऱ्याचा पोशाख परिधान केला होता. बालवारकऱ्यांनी हातात वीणा, टाळ, गळ्यात तुलसीच्या माळा घालत विठ्ठलनामाचा जयघोष केला.
![]() |
सुजाता व श्रेयस शिंदे या बालवारकऱ्यांनी 'विठ्ठल-रखुमाई'ची धारण केलेली वेशभूषा सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. |
याप्रसंगी दिंडीत लाऊडस्पीकरवर विठ्ठलनामाचा जयघोष करणाऱ्या गीतांनी परिसर भक्तिमय झाला होता. शाळेच्या परिसरातून दिंडी काढण्यात आली. महादेव मंदिरात दिंडीचा समारोप झाला. मुलांना प्रसादरुपाने केळीचे वाटप करण्यात आले.