![]() |
संग्रहित छायाचित्र |
बेलापूर येथील बेकरीत सापडलेल्या गोमांस प्रकरणातील धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर त्यांनी गोहत्या प्रतिबंधक कायदा अधिक कडक करण्याची जोरदार मागणी केली आहे. सागर बेग यांनी उपस्थित केलेले मुद्दे गंभीर असून, त्यानुसार जिल्ह्यात आजही राजरोसपणे गोहत्या सुरू असून, पोलिस आणि प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत आहेत.काही वर्षांपूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षकांच्या काळात संपूर्ण जिल्ह्यात अवैध कत्तलखान्यांचा सुळसुळाट झाला होता.त्याच काळात गोहत्या बंदी कायद्याचे खुलेआम उल्लंघन होत असतानाही पोलिसांनी कोणतीही ठोस भूमिका घेतलेली नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
विशेष म्हणजे, पोलिस ठाण्याच्या अगदी समोरूनच शेकडो टन गोमांसाची वाहतूक अवघ्या आठ दिवसांमध्ये झाल्याचेही बेग यांनी सांगितले.या प्रकाराची साक्षी खुद्द श्रीरामपूरकरांनी दिली असून,या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष केले गेले. आता पुन्हा एकदा श्रीरामपूरमध्ये उपविभाग पोलीस अधिकारी पदावर कार्यरत राहिलेले अधिकारी सोमनाथ घार्गे यांची जिल्हा पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाल्याने जनतेच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. सुमारे पाच-सहा महिन्यांपूर्वी राहाता तालुक्यातील ममदापूर परिसरात मोठ्या प्रमाणावर गोहत्या करणाऱ्या कत्तलखान्यांवर कारवाई झाली होती ही कारवाई मोठ्या फौजफाट्यासह झाली होती आणि कत्तलीची ठिकाणेही जमीनदोस्त करण्यात आली होती.त्यावेळी ही कारवाई जिल्हाभर गाजली होती. आज पुन्हा या ठिकाणी गोहत्या सुरू असल्याची माहिती समोर आली असून,याच ठिकाणाहून रात्री अपरात्री जिल्हाभर तसेच जिल्ह्याबाहेर गोमांसाची तस्करी सुरू असल्याचे आरोप सागर बेग यांनी केला आहे.
सहा महिन्यांपूर्वी ममदापूर येथील कसाईखाण्यावर झालेली कारवाई केवळ गौप्रेमींना भुलवण्यासाठी होती काय? असा सवाल आता विचारला जात आहे. कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होत नसेल, तर तो कायदा कडक करण्याची गरज आहे,असे सागर बेग यांनी ठामपणे सांगितले आहे.प्रशासनाला ठोस कारवाई करण्याचे आवाहन त्यांनी केले असून,जिल्ह्यातील सर्व अवैध कत्तलखाने तात्काळ बंद करून दोषींवर कठोर गुन्हे दाखल करावेत,अशी मागणी बेग यांनी केली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षकांनी तातडीने लक्ष घालून कारवाई करावी तसेच गोहत्या बंदी कायदा सैल असल्याने पोलिसांना देखील मर्यादा आहेत म्हणून शासनाने कायद्यात कठोरता आणावी म्हणून वेळपडल्यास जनआंदोलन उभारण्याचा इशाराही बेग यांनी दिला आहे. कायदा कडक नसेल तर गुन्हेगार मोकाट राहणार हे वास्तव असून,याला आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचेही स्पष्ट मत सागर बेग यांनी व्यक्त केले आहे.