रविवार आणि शनिवारीही कार्यालयीन कामकाज; सिन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यतत्परतेबद्दल कौतुक

नाशिक : शासकीय कार्यालय सामान्यतः शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांमध्ये बंद असतात, परंतु सिन्नर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (सार्वजनिक बांधकाम उपविभाग) अधिकाऱ्यांनी या नियमाला अपवाद ठरवत नागरिकांच्या सोयीसाठी आणि महत्त्वाच्या कामकाजाची वेळेवर पूर्तता करण्यासाठी हे दोन्ही दिवस (९ आणि १० ऑगस्ट २०२५) कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रशासनाच्या या नागरिकाभिमुखआणि कार्यतत्पर धोरणामुळे सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.

                    मिळालेल्या माहितीनुसार, माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत दाखल करण्यात आलेल्या काही महत्त्वाच्या अपिलांच्या सुनावण्या तसेच इतर कार्यालयीन कामकाज शनिवारी, दिनांक ९ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजता आणि त्यानंतर रविवारी, दिनांक १० ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी ०४:०० वाजता आयोजित करण्यात आले आहे. अपिलीय अधिकारी तथा उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, सिन्नर यांच्या दालनात हे कामकाज पार पडणार आहे.
                सामान्यतः शनिवार आणि रविवारी सुट्ट्या असल्याने कार्यालयीन कामकाज अपेक्षित नसते, मात्र नागरिकांना तातडीने न्याय मिळावा आणि त्यांची कामे त्वरित मार्गी लागावीत या उदात्त हेतूने अधिकाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. सुट्टीच्या दिवशीही नागरिकांसाठी उपलब्ध राहून त्यांचे काम मार्गी लावण्याची ही वृत्ती खरोखरच प्रशंसनीय आहे.
यामुळे प्रशासनावर नागरिकांचा विश्वास अधिक दृढ होण्यास मदत मिळेल. सार्वजनिक हितासाठी आणि कार्यक्षम प्रशासनासाठी अशा प्रकारे अतिरिक्त प्रयत्न करणाऱ्या सिन्नर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा हा आदर्श निश्चितच इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post