साईकिरण टाइम्स ब्युरो, 19 ऑगस्ट 2020
संगमनेर | पुणे विद्यापीठाच्या 'डिप्लोमा इन जर्नालिझम' या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी संगमनेर महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. कोणत्याही शाखेची पदवी असलेल्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येतो.
संगमनेर महाविद्यालयात शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमाचा अहमदनगर बरोबरच शेजारच्या जिल्ह्यातही एक वेगळा लौकिक तयार झाला आहे. पत्रकारिता करू इच्छिणाऱ्यांबरोबरच शिक्षण व इतर क्षेत्रात कार्यरत असणारे अनेकजण भाषा आणि लेखन कौशल्य शिकण्यासाठी या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात. पुणे विद्यापीठाचे पुण्याबाहेरील एकमेव अभ्यासकेंद्र असलेल्या संगमनेर महाविद्यालयात मागील आठ वर्षात ज्येष्ठ पत्रकार डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक शिक्षक, प्राध्यापक, पत्रकार, नोकरदार, गृहिणी आदींनी हा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. पत्रकारितेच्या मुद्रित माध्यमाबरोबरच दूरचित्रवाणी आणि नभोवाणीची पत्रकारिता कशी करावी याचे परिपूर्ण ज्ञान संगमनेर महाविद्यालयाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून दिले जाते. सन२०२०-२१ या शैक्षणिक वर्षाकरिता या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. शासकीय,निमशासकीय विभागात जनसंपर्क अधिकारी पदासाठी पत्रकारितेतील पदवी अत्यावश्यक असते, अशांंसाठी हा अभ्यासक्रम उपयुक्त आहे. नोकरी किंवा व्यवसायात कार्यरत असणारांना अभ्यासक्रम पूर्ण करता यावा यासाठी फक्त रविवारी संगमनेर महाविद्यालयात याचे वर्ग घेण्यात येतात. अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांनी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अरुण गायकवाड (९८२२८११७६१) किंवा अभ्यासक्रम समन्वयक प्रा.सुशांत सातपुते (९७६६७६०९२६ /८२६३८६५४१२) यांच्याशी संपर्क साधावा.