तुम 'माही' को यूं भुला ना पाओगे, भाग ०१

               
     २२ डिसेंबरला जगातली सर्वात मोठी रात्र असते आणि २३ डिसेंबरपासून सुर्याच्या उत्तरायणाला प्रारंभ होतो. मात्र २००४ सालच्या २३ डिसेंबर या तारखेला एक आगळेवेगळे महत्त्व आहे‌. कारण अगदी याच दिवशी माही नावाचा क्रिकेटसुर्य क्रिकेटविश्वावर उगवला आणि आपल्या तडाखेबंद खेळाने त्याने तमाम क्रिकेटरसिकांना दिपवून टाकले होते. स्थळ होते एम. ए. अझीझ स्टेडीयम, बांगलादेश आणि 'चित्तगावच्या' मैदानावर मानवी खेळाडूच्या रुपात एक "चित्ता" टीम इंडियाकडून खेळण्यास उतरला होता. जबरदस्त फिटनेस, भेदक नजर, कमालीचे हॅंड आय कॉर्डीनेशन, शिकारी करीता लागणारे थंड डोके आणि जिवघेणा संयम या सर्व बाबींचा अफलातून मिश्रण असलेल्या या खेळाडूने जवळपास '१५ वर्षे' क्रिकेट जगतावर अधिराज्य गाजवत अखेर '१५ ऑगस्टला' क्रिकेटला रामराम ठोकला. खरेतर पदार्पण करणारा प्रत्येक खेळाडू कधी ना कधी निवृत्त होणारच परंतु कसोटी आणि टी ट्वेंटीत शिताफीने निरोप घेणाऱ्या माहीला नियतीने अड आणि सड करत रखडवले आणि अखेर विषण्ण मनस्थितीत निरोप घ्यायला भाग पाडले.

              कसोटी क्रिकेटची वेस ओलांडून क्रिकेटने वनडे सोबत लिव्ह इन रिलेशनशिप चालू केल्याने संघात यष्टीरक्षकाच्या भुमिकेला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले होते. त्यामुळे केवळ यष्टीमागेच नव्हे तर यष्टीपुढेही दमदार कामगिरी करणाऱ्या यष्टीरक्षकांची निकड भासू लागली होती. त्यातच टी ट्वेंटी नावाची आकर्षक फटाकडी समोर दिसताच संघात दे दणादण फलंदाजांची मागणी अचानकपणे वाढली होती. मग यातुनच यष्टीरक्षक हा उत्तम फलंदाज असावा ही संकल्पना पुढे येऊ लागली जी महेंद्रसिंग धोनीच्या पथ्यावर पडली.

            १९८३ विश्र्वचषकाच्या दिग्विजयापासून सय्यद किरमाणी, किरण मोरे आणि नयन मोंगीया या अस्सल यष्टीरक्षकांनी टीम इंडियाच्या यष्टीरक्षणाचा भार आपापल्या परीने वाहीला. मधात काही काळ चळवळ्या अजय रात्रा आणि विजय दहिया यांनी थोडाफार हातभार लावला परंतु अजय रात्राची 'रात्र वैऱ्याची झाली' तर विजय 'दहियाची दहिहांडी' टीम इंडियाच्या विजयात फारसा हातभार लावू शकली नाही. अखेर महेंद्रसिगं धोनीच्या रुपाने टीम इंडियाचा एक विस्फोटक फलंदाज आणि उत्तम यष्टीरक्षण करणाऱ्या खेळाडूचा दुष्काळ संपला‌.

              वास्तविकत: धोनीच्या रुपाने टीम इंडियाच्या अप्पर ऑर्डर आणि लोअर ऑर्डरला जोडणारा आणि मध्यफळीला बळकटी देणारा एक खंदा फलंदाज लाभला होता. सोबतच त्याचे यष्टीरक्षण नामचीन फलंदाजांनाही कित्येकदा नामोहरम करत असे धोनी यष्टीरक्षणाला उभा असला की समोरचा गोलंदाज कितीही आमिषे दाखवत असला तरी फलंदाज 'बुलाती है मगर जानेका नहीं' याचे तंतोतंत पालन करत असायचे. कारण धोनीचे यष्टीरक्षण म्हणजे खबरदार जर टाच मारुनी जाल क्रिझपुढे चिंधड्या, बेल्स उडवीन राई राई एवढ्या असल्याने फलंदाजांची चांगलीच गोची व्हायची.

           प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर धोनी ज्या चपळाईने व धुर्ततेने फलंदाजांना यष्टीचीत करायचा ते पाहता फलंदाज 'बाद' कमी व्हायचे आणि 'बेइज्जत' जास्त व्हायचे. आपल्याला सर्वांसमक्ष मामा बनवले गेल्याने घनघोर अपमान सहन करत, खजिल होत फलंदाज तंबूत परतायचे. ज्यांना धोनीच्या हॅंड ऑफ गॉड वर भरवसा नसायचे ते अंतिम इच्छा म्हणून डीआरएस चा धावा करायचे. मात्र त्या पामरांना हे माहित नसायचे की डीआरएस म्हणजेच धोनी रिव्ह्यू सिस्टिम आहे आणि आपल्या विकेटसोबतच  उपलब्ध डीआरएसचा पर्याय गमवून बसायचे. मंदगती गोलंदाज असले की धोनीचे यष्टीरक्षण आणखी खतरनाक व्हायचे. विशेषतः केदार जाधव, जो समुद्र सपाटीच्या पातळीवर खोल गोलंदाजी करायचा आणि फलंदाजाच्या पायात साप सोडल्यासारखे चेंडू टाकायचा. अशावेळी फलंदाज गोंधळून जायचे आणि धोनी केदारची जोडी फलंदाजांना आत्महत्या करायला प्रवृत्त करायची. केदारच्या लगोरीला धोनीचे निमिषार्धात होणारे स्टंपींग लाभले की फलंदाज बाद झाले तरी अवाक व्हायचे‌, त्यांना ऑनक्रिझ गंडवले गेल्याची भावना यायची. खरेतर अशाप्रकारे धारातिर्थी पडलेले फलंदाज भविष्यात गमतीने धोनीवर फसवणुकीचा गुन्हासुद्धा दाखल करू शकतात एवढ्या सफाईने, सराईतपणे धोनीचे स्टंपींग असायचे.

       यष्टीमागे धोनी यष्टीरक्षणासोबतच गोलंदाजांना उपयुक्त मार्गदर्शन करायचा. फलंदाजांचे कच्चे दुवे काय आहेत, फलंदाजाला आळा कसा घालू शकतो याबाबत सतत मार्गदर्शन करायचा. सोबतच क्षेत्ररक्षण कसे असावे, कोणता खेळाडू कोणत्या जागी चांगले क्षेत्ररक्षण करू शकतो याबाबत त्याचा अभ्यास दांडगा होता. रविंद्र जडेजा, सुरेश रैना, विराट कोहली आणि मनिष पांडे सारखे दर्जेदार क्षेत्ररक्षक आणि सोबतीला धोनीसारखा यष्टीरक्षक असला की फलंदाजांना धाव घेण्यापुर्वी दहादा विचार करावा लागत असे. कारण हे डेडली कॉंबिनेशन कित्येक सेट फलंदाजांना अपसेट करत धावबाद करत असत. धोनीच्या यष्टीरक्षणाने आयसीसीवर सुद्धा मोहिनी घातली होती. धोनी स्टंपच्या मागे उभा असल्यास क्रिझ सोडू नका असे उद्गार खुद्द आयसीसीने धोनीच्या गौरवार्थ काढले होते. आपल्या अनोख्या यष्टीरक्षण कलेचा जलवा दाखवत माही ने एकदिवसीय सामन्यात ४४४ बळी घेतांना ३२१ झेल आणि १२३ स्टंपींग केले, कसोटी सामन्यात २९४ बळी घेतांना २५६ झेल व ३८ स्टंपींग तर टी ट्वेंटीत ५७ झेल, ३४ स्टंपींगसह ९१ बळी घेतले आहेत.

            आज धोनी जरी ३९ वर्षांचा झाला असला तरी त्याची चपळाई, रिफ्लेक्सेस आणि यष्टीरक्षण एखाद्या तरुण खेळाडूला लाजवण्यासारखे आहे. रिषभ पंत, संजू सॅमसन त्याला आजुबाजुला फिरायच्या सुद्धा योग्यतेचे वाटत नाही. धोनीने यष्टिरक्षणाच्या अद्भुत कलेने त्याच्या वयाला मात दिली असून त्याची टीम इंडियातील उणीव सहजासहजी भरून निघेल असे वाटत नाही. कदाचित पंत आणि सॅमसन या दोघांनी धोनीचे एक एक ग्लोव्हज घालून जरी आयुष्यभर सामने खेळले तरी त्यांना आयुष्याचे सार्थक झाल्याचे समाधान नक्कीच मिळू शकते. 
क्रमश:..

दि. १८ ऑगस्ट २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post