नाशिक : सिन्नर येथील करंज कालवा उपविभाग क्रमांक २ मध्ये एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला असून, येथे माहिती अधिकार कायद्याचा गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शासकीय कामांची माहिती मागणाऱ्या नागरिकांना ती पुरवण्याऐवजी, थेट आर्थिक प्रलोभने दाखवून प्रकरणे दडपण्याचा धक्कादायक प्रकार येथे सुरू असल्याची लेखी तक्रार नाशिक पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे करण्यात आली आहे. 'साईकिरण टाइम्स'चे संपादक राजेश बोरुडे आणि सामाजिक कार्यकर्ते सुधिर तुपे यांनी २९ जून रोजी ही तक्रार दाखल केली असून, या भ्रष्ट साखळीची तत्काळ विभागीय चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
या कार्यालयातील कारभारावर गंभीर ताशेरे ओढताना तक्रारदारांनी म्हटले आहे की, येथील काही कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने एक भ्रष्ट व्यवस्था चालवत आहेत. माहिती अधिकारांतर्गत अर्ज प्राप्त झाल्यानंतर, संबंधित माहिती शोधून देण्याऐवजी अर्जदाराला बोलावून रोख रकमेचे वाटप केले जाते. शासकीय निधीचा गैरवापर आणि निकृष्ट दर्जाच्या कामांची पोलखोल होऊ नये, या उद्देशाने हा सर्व खटाटोप केला जात असल्याचे तक्रारीत स्पष्ट करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत धनंजय काकड नावाचे कर्मचारी मध्यस्थाची भूमिका बजावत असून त्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पूर्ण पाठिंबा असल्याचे निवेदनात नमूद आहे.
या गैरव्यवहाराचे सबळ चित्रीकरण आपल्याकडे असल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. शासकीय पातळीवर पुराव्यांमध्ये छेडछाड होण्याची शक्यता असल्याने, हा व्हिडिओ थेट चौकशी समितीसमोरच मांडण्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. तसेच, भविष्यात आग लागल्याचा किंवा कागदपत्रे गहाळ झाल्याचा बनाव रचून पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता असल्याने, मागील पाच वर्षांतील सर्व माहिती अधिकार अर्जांचे दप्तर तातडीने सील करावे आणि त्याचे विशेष ऑडिट करावे, अशी आग्रही मागणी देखील करण्यात आली आहे.
या प्रकरणातील दोषी कर्मचारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांवर तातडीने निलंबनाची कारवाई करून निष्पक्ष चौकशी करावी, असे तक्रारीत म्हटले आहे. प्रशासनाने या गंभीर प्रकरणाची योग्य ती दखल न घेतल्यास आणि दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केल्यास, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) तसेच न्यायालयात दाद मागावी लागेल, असा स्पष्ट इशारा राजेश बोरुडे आणि सुधिर तुपे यांनी दिला आहे.
.jpeg)