स्व. ससाणेंनी शहरात पत्रकारांच्या सत्काराची परंपरा सुरू केली ; पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा गौरव


श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) श्रीरामपूर शहर आणि तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून तालुक्याला दिशा देण्यासाठी आता पत्रकारांनी पुढे येण्याची गरज आहे.माजी आमदार कै.जयंत ससाणे हे नेहमी पत्रकारांना आपले मित्र मानत होते. त्यांनी पत्रकार दिनी या शहरांमध्ये पत्रकारांच्या सत्काराची परंपरा सुरू केली. ही परंपरा करण ससाणे यांनी चालू ठेवली त्याबद्दल त्यांना धन्यवाद देत श्रीरामपूरचा विकास आणि श्रीरामपूर जिल्हा कधी होणार या प्रश्नाची जोरदार चर्चा रंगली. निमित्त होते अपूर्वा हाल येथे करण ससाणे मित्र मंडळातर्फे आयोजित केलेल्या पत्रकार दिनाच्या सत्कार समारंभाचे.

यावेळी माजी नगराध्यक्ष श्रीमती राजश्रीताई ससाणे, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाबासाहेब दिघे, माजी नगराध्यक्ष संजय फंड, शिक्षण मंडळाचे माजी सभापती सुनील बोलके, दत्तात्रय सानप, रमण मुथा,

ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड, संपादक करण नवले,दिलीप नागरे, सुधीर नवले आदिंसह शहर व तालुक्यातील सर्व माध्यमांचे प्रतिनिधी आणि काँग्रेस प्रेमी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रास्ताविक भाषणात माजी नगराध्यक्ष संजय फंड यांनी आज श्रीरामपूरला कोणी वारस राहिलेला नाही. श्रीरामपूरच्या विकासासाठी कोणी पुढे येत नाही. याबद्दल खंत व्यक्त केली. तोच धागा पकडून ज्येष्ठ पत्रकार रमण मुथा यांनी पुढे कोणी यायचं असा प्रश्न उपस्थित करीत आता तुम्हीच नेतृत्व करा आम्ही सर्व तुमच्या बरोबर आहोत असे त्यांना सांगितले.

श्रीरामपूर जिल्हा व्हावा म्हणून जी चळवळ ज्या वेगाने चालवायला पाहिजे ती सध्या मंदावल्यासारखी वाटते. शहरांमध्ये येणारे शासकीय अधिकारी सध्या आपल्या मनमानी पद्धतीने काम करीत आहेत. चार दोन लोक जाऊन अधिकाऱ्याचा सत्कार करतात. त्यामुळे ते डोक्यावर बसतात. नगरपालिकेमध्ये सध्या प्रशासकीय राजवट असल्याने तिथे काय चालले कुणालाच कळत नाही. शहरांमध्ये अतिक्रमणे वाढत आहेत. दिवसाढवळ्या मूळ जागा मालकांच्या जागेमध्ये अतिक्रमणे होत आहेत. गुन्हेगारी मध्ये मोठी वाढ झाली आहे. शहर व तालुक्याचे प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी राजकीय पक्षाचे लोक कमी पडत आहेत अशा पद्धतीची चर्चा या ठिकाणी अनेक वक्त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केली. ज्येष्ठ पत्रकार रमेश कोठारी, पद्माकर शिंपी, करण नवले, ज्ञानेश गवले, भाऊसाहेब काळे, नागेशभाई सावंत आदिंनी वेळी आपले मनोगत व्यक्त केले.

 प्रेस क्लबचे अध्यक्ष बाळासाहेब भांड यांनी शहरातील पत्रकार भवनाचा प्रश्न नजीकच्या काळात मार्गी लागणार आहे. खासदार राजीव शुक्ला यांच्या दहा लाख रुपयांच्या निधीतून पत्रकार भवनाचे बरेचसे काम झाले आहे. उर्वरित काम आमदार लहूजी कानडे यांच्या निधीतून मार्च एंड पर्यंत पूर्ण होईल अशी माहिती दिली.

यावेळी बोलताना माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी कै. जयंत ससाणे साहेब व पत्रकार यांच्या मैत्रीपूर्ण संबंधांचा उल्लेख करत पत्रकारांनी विरोधात बातमी छापली म्हणून ससाणे साहेब कधीही नाराज झाले नाहीत. उलट त्यांनी ती बातमी सकारात्मक दृष्टीने घेऊन मूळ प्रश्न सोडवण्याला प्राधान्य दिले. शिर्डी संस्थानच्या माध्यमातून देखील पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी हातभार लावला. पत्रकारांनी केलेल्या बहुमोल सूचनांची ते दखल घेत असत तसेच शहर व तालुक्याच्या विकासासाठी नेहमी पत्रकारांशी चर्चा करीत होते. आज शहरांमध्ये अनेक प्रश्न आ वासून उभे आहेत. हे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी पत्रकारांनी आम्हाला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

श्रीरामपूर नगरपालिकेने माजी आमदार जयंत ससाणे यांच्या पुढाकाराने सार्वमतचे संपादक कै.वसंतरावजी देशमुख यांच्या स्मरणार्थ एक व्याख्यानमाला सुरू केली होती तसेच प्रेस क्लबच्या सहकार्याने जिल्ह्यातील पत्रकारांचा गौरव करण्यात येत होता.या व्याख्यानमालेच्या निमित्ताने देशभरातील नामवंत विचारवंतांचे विचार शहरवासीयांना ऐकण्यास मिळत होते. गेले तीन चार वर्षे हा कार्यक्रम नगरपालिकेने घेतला नाही.त्यामुळे वैचारिक मेजवानी पासून शहरवासी वंचित राहत आहेत तरी तो कार्यक्रम नगरपालिकेने पुन्हा सुरू करावा. कै.देशमुख यांच्या स्मृती जपण्यासाठी एकत्र होणे आवश्यक आहे असे मत उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केले.

यावेळी उपस्थित सर्व पत्रकारांचा यथोचित गौरव करण्यात आला. कार्यक्रमास पत्रकार अनिल पांडे, महेश माळवे,गौरव साळुंके,शिवाजी पवार, सुनील नवले, प्रकाश कुलथे,सलीमखान पठाण,रणजीत श्रीगोड, बरकतअली शेख, भारतीताई परदेशी, रियाज पठाण, विठ्ठल गोराणे आदिंसह तालुक्यातील पत्रकार व ससाणे मित्रमंडळाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय धाकतोडे यांनी केले.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post