साईकिरण टाइम्स | राजेश बोरुडे
श्रीरामपूर : शहरातील उच्चभ्रू लोकवस्तीत सुस्थितीतील रस्ते खोदून पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचा नवीन 'धंदा' चालू केल्याने शहरवासियांकडून संताप व्यक्त केला जात आहे. चांगल्या रस्त्यांच्या बाजूपट्ट्याची तोडफोड करून पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी लाखों रुपयांची उधळपट्टी केली जात आहे. या ठिकाणी कामाचा माहितीदर्शक फलक लावण्यात आला नाही. कामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले जात आहे. यासंदर्भात राजेश बोरुडे यांनी पालिका प्रशासनाकडे तक्रार केली आहे.
पालिका हद्दीतील अक्षय कॉर्नर ते सिद्धिविनायक मंदिर कमानी दरम्यान चालू असलेले पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने ठेकेदारावर त्वरित कारवाई करून काम बंद करण्याची मागणी राजेश बोरुडे यांनी मुख्याधिकारी मच्छिन्द्र घोलप यांच्याकडे केली आहे. रस्त्याच्या बाजूला लाखों रुपये खर्चून पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे सुरु असलेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असून, गरज नसताना या रस्त्याच्या सुस्थितीतील बाजूपट्ट्या खोदून पेव्हिंग ब्लॉक बसविले जात आहेत. पालिका प्रशासन व सत्ताधाऱ्यांकडून जनतेच्या पैशाची उधळपट्टी केली जात असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे.
या कामात वापर होत असलेले पेव्हिंग ब्लॉक निकृष्ट दर्जाचे, कच्चे आहेत, ते बसवतानाच फुटत आहेत. कामाच्या ठिकाणी कामाची माहिती दर्शविणारा माहितीदर्शक फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे काम नेमके किती रक्कमेचे आहे? कामाचा दोषनिवारण कालावधी किती आहे? कंत्राटदार कोण आहे? काम कोणत्या योजनेतून होत आहे? कोणत्या निधीतून होत आहे? कामाची सुरुवात केव्हा झाली? कामाची मुदत किती आहे? हे शहरवासियांना समजले पाहिजे. कामात निकृष्ट दर्जाचे मटेरियल वापरले जात असल्याने या साहित्त्याची टेस्टिंग केली का नाही? याचा खुलासा करावा.
-- राजेश बोरुडे
