साईकिरण टाइम्स ब्युरो, 30 जून 2020
श्रीरामपूर | कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा सहकारी बँकेने सर्व प्रकारच्या कर्जास ऑगस्ट २०२० अखेर मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती जिल्हा सहकारी बँकेचे संचालक उपनगराध्यक्ष करण ससाणे यांनी दिली आहे.
जिल्हा बँकेने या संदर्भात नुकतेच परिपत्रक जारी केले आहे. त्यामध्ये सर्व प्रकारच्या मुदती कर्जाचे दि.१ मार्च २०२० ते ३१ ऑगस्ट २०२० या ६ महिन्याचे कालावधीत वसुलास पात्र वसुलीस स्थगिती देण्यात येत आहे.
या कालावधीत येणे बाकीवर व्याज आकारणी करुन त्यांची वसुली सप्टेंबर २०२० व लगतच्या ५ महिन्यात करावयाची आहे. तसेच कर्ज परतफेड कालावधी ६ महिन्यांनी वाढवायचा आहे. सदरचे बदल हे सन २०१९-२० हंगाम करिता मर्यादित राहील.
याबाबत बँक पातळीवर सर्व प्रकारचे कर्ज, हप्त्यास दि.३१ ऑगस्ट २०२० पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय जिल्हा बँक प्रशासनाने घेतला असल्याचे ससाणे यांनी सांगितले आहे. तसेच ज्या सभासदांचे महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्ज मुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफी योजनेचे आधार प्रमाणिकरणाचे कामकाज चालू आहे.
ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले आहे व त्याची शासनाकडून रक्कम प्राप्त झालेली आहे असे जमा खर्च पूर्ण करण्यात आलेले आहेत. तथापी, ज्या शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण झालेले आहे;परंतू शासनाकडून रक्कम प्राप्त झालेली नाही अशा शेतकऱ्यांना शासन येणे दर्शवून जमा खर्च करणेबाबत शासन निर्णयानुसार जिल्हा बँकेने परिपत्रक जारी करुन निर्णय घेतला आहे.
बँकेने कर्ज वसुलीस ऑगस्ट अखेर मुदतवाढ दिल्याने शेतकरी, बँक सभासदांना मोठ्या प्रमाणावर याचा लाभ होणार आहे. या निर्णयाबद्दल राज्य शासन, जिल्हा बँकेचे चेअरमन आणि सर्व पदाधिकाऱ्यांचे ससाणे यांनी आभार वक्त केले आहे.