विधान परिषदेच्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून १५ उमेदवारांनी माघार घेतली असून आता रिंगणात २१ उमेदवार आहेत. काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीसमोरील बंडखोरीचे संकट टळले. परंतु,भाजपशी संबंधित एक आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा उमेदवार रिंगणात असल्याने महायुतीला बंडखोरीचा तोंड द्यावे लागणार आहे.
नाशिक शिक्षकमध्ये सर्व प्रमुख उमेदवार धनाढ्य अन शिक्षण संस्थाचालक आहेत.शिक्षकांची संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टीडीएफ या संघटनेने नगरचे प्रा.भाऊसाहेब कचरे यांना अधिकृत उमेदवारी दिल्याचे जाहीर केलेले असले तरी टीडीएफच्या जिल्हा निहाय संघटनांनी वेगवेगळ्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केल्याने या निवडणुकीत टीडीएफचे तुकडे झाल्याचे दिसून येत आहे.
माघारीची मुदत संपुष्टात आल्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. बंडखोरी आणि नामसाधर्म्य असणाऱ्यांची उमेदवारी हे प्रमुख राजकीय पक्षांसमोर आव्हान ठरले.अपक्ष उमेदवार डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्या माघारीसाठी त्यांचे बंधू महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी प्रयत्न केले.काँग्रेसचे उमेदवार दिलीप पाटील यांच्या माघारीसाठी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून विनंती केली. भाजपचे धनराज विसपुते यांनी रिंगणातून माघार घेतली असली तरी भाजपशी संबंधित विवेक कोल्हे यांनी उमेदवारी कायम ठेवली आहे. राज्यात सत्ताधारी असणाऱ्या महायुतीत या निवडणुकीत फूट पडली. शिवसेना (शिंदे गट) जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार उभा केला आहे.
एकूण २१ उमेदवार रिंगणात आहेत. यात शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे, शिवसेना ठाकरे गटाचे ॲड. संदीप गुळवे, राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर भावसार यांच्यासह धोंडीबा भागवत,अनिल तेजा, अमृतराव उर्फ अण्णासाहेब शिंदे, इरफान इसहाक, भाऊसाहेब कचरे, विवेक कोल्हे,सागरदादा कोल्हे,संदीप कोल्हे, गजानन गव्हारे, संदीप गुरुळे, सचिन झगडे,डॉ. छगन पानसरे, रणजित बोठे, महेश शिरुडे, रतन चावला, आर. डी. निकम,संदीप गुळवे (पाटील) यांचा समावेश आहे.
नाशिक विभागातील पाच जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक असलेल्या शिक्षक मतदार संघासाठी प्रामुख्याने मतदार संघ 1987 साली निर्माण झाला.शिक्षकांचे प्रश्न विधानमंडळात मांडण्यासाठी शिक्षकांचा प्रतिनिधी म्हणून शिक्षक आमदार तेथे असावा ही संकल्पना त्या मागे होती. 1987 पासून 2018 पर्यंत शिक्षक आमदारच निवडून जात होते.परंतु या मतदारसंघाच्या निर्मितीच्या तरतुदीमध्ये शिक्षकांबरोबर संस्थाचालक सुद्धा उमेदवारी करू शकतो असा नियम असल्याने त्या नियमाचा फायदा घेत गेल्या वर्षी येवल्याचे किशोर दराडे हे संस्थाचालक उमेदवार झाले.त्यांनी या निवडणुकीची सगळी गणिते बदलून टाकली.मतदारांना पैठणी व ड्रेस देऊन नवा इतिहास घडवला. त्यामुळे या मतदारसंघात आता सर्रासपणे मतदारांना आमिष दाखविण्याचे काम सुरू झाले आहे. काही उमेदवारांनी आपल्या ठराविक मतदारांना पैठणी साड्या व ड्रेसची वाटप केले आहे तर यावेळी प्रथमच निवडणुकीत उतरलेल्या नाशिकच्या एका उमेदवाराने पैठणी व ड्रेस सोबत महिला मतदारांना सोन्याची दोन ग्रॅम ची नथनी देऊन कडी केली आहे.अशा पद्धतीने उघडपणे मतदारांना आमिषे दिले जात असताना शिक्षक म्हणून उमेदवारी करणारे काही उमेदवार मात्र कुठे ही दिसून येत नाही.त्यातच नगर मधून प्रा. भाऊसाहेब कचरे यांना पराभूत करण्यासाठी त्यांचे परंपरागत विरोधक मैदानात उतरले आहेत. त्यांना या निवडणुकीशी देणे घेणे नाही. सवत रंडकी झाली पाहिजे या न्यायाने ते लोक या निवडणुकीत उमेदवारी करत आहे. यासाठी त्यांना सत्ताधारी गटाकडून आर्थिक रसद पुरविण्यात आल्याची देखील चर्चा आहे.
पदवीधर शिक्षक मतदार संघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष निवडणूक लढवून सर्व पक्षांचा पाठिंबा घेतला. या कामी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. तोच कित्ता या ही निवडणुकीत गिरविण्यात आला आहे. भाजप च्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे हे मूळचे भाजपचे असले तरी ते अपक्ष म्हणून या निवडणुकीत उतरले आहे. त्यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अपक्ष उभे राहण्यास सांगितल्याची चर्चा मतदारसंघात आहे. त्यामुळे विवेक कोल्हे यांनी सुद्धा आपली संपूर्ण ताकद या निवडणुकीत लावली असून सुरुवातीला काहीसे मागे असणारे विवेक कोल्हे आता प्रचारात सर्व आघाड्यांवर सर्वात पुढे असल्याचे चित्र आहे.
या मतदारसंघातील सर्व मतदार हे सुशिक्षित आहेत व समाज घडविणारे शिक्षक आहेत.यामध्ये महिला मतदारांची संख्या देखील लक्षणीय आहे. या सर्व मतदारांना प्रलोभने दाखवून मागील वेळी झालेला प्रयोग यशस्वी करण्यासाठी पुन्हा एकदा आता सर्वच उमेदवार कामाला लागले आहेत.या निवडणुकीत खरी चुरस ही विद्यमान आमदार किशोर दराडे, युवा नेते विवेक कोल्हे तसेच माजी आमदार गुळवे यांचे पुत्र एडवोकेट संदीप गुळवे व टीडीएफ चे उमेदवार नगरचे प्रा. भाऊसाहेब कचरे या चौघांमध्ये आहे. इतर 17 उमेदवार सुद्धा आपले नशीब आजमावीत आहेत.
धन दांडग्या संस्था चालकांनी केलेल्या या अतिक्रमणामुळे मतदार असलेला शिक्षक मात्र भांबावून गेला आहे. संस्थाचालकांचे मोठे दडपण प्रत्येक मतदारावर आहे. त्यामुळे आपले हक्काचा मतदारसंघ धनदांडग्या संस्था चालकांनी हिरावून घेण्याचे प्रयत्न चालविले असताना हा मतदार हे प्रयत्न उधळून लावतो कि त्यांच्या आमिषाला बळी पडतो याचे उत्तर मतमोजणी नंतरच मिळणार आहे.
राधाकृष्ण विखे धर्मसंकटात
महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांचे बंधू राजेंद्र विखे पाटील यांनी या मतदारसंघातून अर्ज भरला होता. परंतु त्यामागे विवेक कोल्हे यांना रोखणे हा मुख्य उद्देश होता.कोल्हे यांनी गणेश कारखान्याच्या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिल्याने आगामी विधानसभेत राहाता मतदार संघात त्यांच्यामुळे आपल्याला डोकेदुखी होईल.ती होऊ नये म्हणून कोल्हे यांना अपक्ष उभे करून त्यांना सर्व मदत करण्याचे आश्वासन महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्याची चर्चा आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या पक्षाचे उमेदवार किशोर दराडे यांना निवडून आणण्याची जबाबदारी राधाकृष्ण विखे यांच्यावर टाकली आहे. लोकसभा निवडणुकीत विखे यांच्यावर नाशिक व नगर जिल्ह्यातील चार मतदार संघाची जबाबदारी होती. तेथे चारही उमेदवार पराभूत झाल्याने विखे यांचे मंत्रीपदच आता टांगणीला लागले आहे. त्यातच किशोर दराडे यांचा पराभव झाल्यास कदाचित राधाकृष्ण विखे यांना मंत्रिमंडळातून डच्चू सुद्धा मिळू शकतो. दुसरीकडे विवेक कोल्हे या निवडणुकीत पराभव झाल्यास ते विधानसभेला राहता मतदार संघातून उभे राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे विखे यांची डोकेदुखी वाढू शकते.महायुतीचा धर्म पाळताना किशोर दराडे यांना मदत करायची कि आपल्या मतदारसंघातील आव्हान कमी करण्यासाठी विवेक कोल्हे यांना साथ द्यायची अशा धर्म संकटात विखे पाटील सापडले आहेत.
जातीय समीकरणाचा धोका
लोकसभेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्या मराठा आंदोलनाची झलक पाहायला मिळाली. राज्यभरातील मराठा समाज एकवटल्याने लोकसभेत राज्यातून 48 पैकी 30 मराठा उमेदवार निवडून आले. धक्कादायक बाब म्हणजे बीडमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. तेथे उघडपणे वंजारी विरुद्ध मराठा असा सामना झाला.तोच प्रकार या ही निवडणुकीत होण्याची शक्यता आहे.किशोर दराडे हे ओबीसी असून त्यांनी मतदारसंघातील माळी,वंजारी सह अल्पसंख्यांक व इतर सर्व ओबीसी समाजाच्या मतदारांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे.दुसरीकडे कोल्हे, गुळवे आणि कचरे हे तीनही उमेदवार मराठा आहेत. त्यांच्यामध्ये जर मराठा मतांची विभागणी झाली तर त्याचा फटका तिघांना बसणार आहे. दुसरीकडे या मतदारसंघातील एक वजनदार नेते छगन भुजबळ हे देखील नाराज आहेत.त्यांच्या मागे असलेला ओबीसी समाज हा दराडे यांच्या पाठीशी उभा राहिल्यास दराडे यांचा विजय निश्चित मानला जात आहे.त्यामुळे या निवडणुकीतील सर्व मतदार सुशिक्षित असले तरी जातीय समीकरणाचा धोका आहे.
सर्व ठिकाणी हजेरी
या निवडणुकीच्या निमित्ताने मतदार असलेल्या शिक्षकांची मात्र मोठी चंगळ आहे. प्रत्येक तालुक्यामध्ये सर्व उमेदवार आपापले पद्धतीने मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून सर्व प्रमुख उमेदवारांकडून मतदारांना जेवणाचे आमंत्रण दिले जात आहे. प्रत्येक तालुक्यात संध्याकाळी मोठ्या हॉटेलवर त्याचे नियोजन केले जात आहे. मतदारही या संधीचा फायदा घेत असून सर्वांच्याच कार्यक्रमाला उपस्थिती लावत आहेत.