वाहतूक नियंत्रणासाठी नियुक्त शहरातील ट्रॅफिक पोलीस कर्तव्य बजावण्याऐवजी फक्त वाहनधारकांना त्रास देण्यासाठीच चौकातील एका कोपऱ्यात उभे राहत असल्याचा आरोप 'आप'कडुन करण्यात आला आहे. बंद पडलेले ट्रॅफिक सिग्नल सुरू करून ट्रॅफिक पोलिसांच्या जाचातून वाहन चालकांची सुटका करावी. ट्रॅफिक सिग्नल विविध चौकाच्या सुशोभीकरणासाठी, चौक सुंदर दिसावा यासाठी लावले आहे का? असा सवाल आपच्या पदाधिकाऱ्यांनी केला.
शहराच्या आसपास अनेक गाव-खेडे असून, श्रीरामपूरची बाजारपेठही मोठी असल्याने शेजारील गावातील नागरिक, व्यापारी सातत्याने ये-जा करतात. शहरात वाहनांची मोठी वर्दळ असते. शहरातील मुख्य चौक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिवसभर मोठी गर्दी असते. सध्या बंद अवस्थेत असलेले ट्रॅफिक सिग्नल त्वरीत सुरू करावे, या मागणीचे निवेदन आम आदमी पार्टी श्रीरामपूरच्या वतीने अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना दिले.
यावेळी तालुका अध्यक्ष विकास डेंगळे, जिल्हा सचिव राहुल रणपिसे, प्रवक्ते ऍड.प्रवीण जमदाडे, ऍड.दिनेश जाधव, भरत डेंगळे,मेजर सोमनाथ ताके, डॉ सचिन थोरात, डॉ प्रवीण राठोड, बी एम पवार, किरण गायकवाड आदी उपस्थित होते.
ट्राफिक पोलीस चौकात ट्रॅफिक नियंत्रण करण्याऐवजी कोपऱ्यात उभा राहुन वाहन धारकांची लूट करतात, याकडे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी योग्य प्रकारे लक्ष घालतील, अशी अपेक्षा डुंगरवाल यांनी व्यक्त केली.