श्रीरामपूर : शहरवासियांच्या नागरी समस्या सोडवून नागरिकांना रस्ते, पाणी, वीज, उद्यान, शैक्षणिक, आरोग्यविषयक सुविधा पुरविण्याची मागणी 'मनसे'च्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात नगराध्यक्ष करण ससाणे व मुख्याधिकारी ऋषिकेश पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
याप्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की, शहरातील बाजारतळालगतच्या उद्यानात नागरिकांसाठी व्यायाम साहित्य बसवून लहान मुलांना खेळण्याचे साहित्य बसवावे. संपूर्ण उद्यानाचे नव्याने सुशोभीकरण करावे. शहरातील सर्व गटारी, नाल्यांची रोजच्यारोज साफसफाई करावी. शहरात सार्वजनिक शौचालय उभारावित, जुन्या सर्व स्वच्छतागृहांची दुरुस्ती करावी. शहरातील रस्ते नव्याने करून खराब झालेले रस्ते त्वरित दुरुस्त करावे. नागरिकांना स्वच्छ पिण्याचे पाणीपुरवठा करण्यासाठी उपाययोजना करावी. डास निर्मूलनासाठी संपूर्ण शहरात प्रत्येक आठवड्यात एक दिवस फवारणी करावी. तालुका पोलीस स्टेशन समोरील संत गाडगे महाराज उद्यानातील व्यायामाचे साहित्य त्वरित दुरुस्त करावे. शहरातील प्रत्येक वार्डामध्ये बजरंग व्यायाम शाळेप्रमाणे व्यायाम शाळा सुरू करण्यात यावी. शहरातील प्रत्येक वार्डातील बंद असलेल्या स्ट्रीट लाईट बसवून ज्या भागात स्ट्रीट लाईट नाही त्या भागात स्टेट लाईट बसवावे.
शहरात गेल्यावर्षभरामध्ये ज्या ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाचे रस्त्याचे काम व इतर नगरपालिका अंतर्गत झालेले कामे निकृष्ट दर्जाचे केले अशा ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करावी. शहरात ट्रॅफिकची समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने नव्याने बांधकाम चालू असलेल्या इमारतीच्या ठिकाणी पार्किंगची व्यवस्था न करणाऱ्या इमारत मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी तसेच ज्यांनी पार्किंगची जागा दाखवून इमारत बांधकाम परवानगी घेतली आहे व प्रत्यक्षात पार्किंगची व्यवस्था केली नाही, अशा इमारत बांधकाम मालकावर कारवाई करावी.
