'इन्कलाब' आंदोलन छेडण्याचा बोरुडे यांचा इशारा
साईकिरण टाइम्स ब्युरो, 23 ऑगस्ट 2020
अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यात राहाता तालुक्यातील रांजणखोल ( गांधीवाडी ) येथील शेती महामंडळाच्या जागेत असणाऱ्या नैसर्गिक, जीवंत वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल केली आहे. सदर मोठ्या प्रमाणात केलेली वृक्षतोड, संबंधित वन विभागाचे अधिकारी - कर्मचारी, वखार चालक, शेती महामंडळ यांनी शासनाची फसवणूक करून अर्थपूर्ण व्यवहारातून केली आहे का?? असा सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित करून, या सर्व प्रकारामध्ये संबंधित वन विभाग, शेती महामंडळाची सखोल चौकशी करावी, दोषींवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी, अशी तक्रार मुखमंत्री उद्धव ठाकरे, वन मंत्री व वन प्रशासनाकडे राजेश बोरुडे यांनी केली आहे.
रांजणखोल (गांधीवाडी) परिसरात शेती महामंडळाच्या जागेत दि.19 ऑगस्ट 2020 रोजी कडुलिंब, चिंच, पिंपळ अशा नैसर्गिक जीवंत, हिरव्यागार वृक्षांची मोठ्या प्रमाणावर कत्तल चालू असल्याचे निदर्शनास आले. सदर वृक्षांची कत्तल करून ती लाकडे टेम्पोमध्ये भरली जात होती. या वृक्षांची कत्तल होत असल्याने कोपरगाव वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांना दि. 19/08/2020 रोजी त्यांच्या भ्रमणभाष क्रमांकावर दुपारी 2.33 व 2.46 वाजता संवाद साधून सदर, 'वृक्षतोडीची आपल्या कार्यालयाकडून परवानगी दिलेली आहे का'?, अशी विचारना बोरुडे यांनी केली असता 'प्रकरण आलेले आहे', असे उडवाउडवीचे उत्तर दिले. वन विभागाकडून वृक्षतोडीची परवानगीच दिलेली नसताना सदर ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड झालीच कशी?? असा संतप्त सवाल राजेश बोरुडे यांनी केला आहे. कोपरगाव वन परिक्षेत्र अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवर या वृक्षतोडीची माहिती देऊनही त्यांनी वृक्षतोड कारणाऱ्यांवर कारवाई का केली नाही?? सदर ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेल्या नैसर्गिक तसेच चिंच यासारख्या फळ झाडांची कत्तल केलेली लाकडे कोठे गेली?? ती लाकडे वन विभागाने ताब्यात घेतली का?? एकूण किती वृक्षांची कत्तल करण्यात आली?? कत्तल केलेल्या वृक्षांचा प्रकार,नाव, झाडाचे आकार, आयुर्मान किती? त्या कत्तल केलेल्या वृक्षांचा वन विभागाने पंचनामा केला का?? सदर एवढ्या मोठ्या प्रमाणात केलेल्या वृक्षतोडीत कोणाकोणाचे हात ओले झाले आहेत?? ही वृक्षतोड कोणाच्या संगनमताने करण्यात आली?? असे अनेक प्रश्न बोरुडे यांनी उपस्थित केले आहेत. या वृक्षांची कत्तल करून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आहे. असा आरोपही बोरुडे यांनी केला आहे. यात कोणाकोनाचे हात ओले झाले आहेत?? यापूर्वी या परिसरात वृक्षतोड झाली असल्याची चर्चा होती; आत्तापर्यंत झालेल्या व होत असलेल्या बेकायदेशीर वृक्षतोडीची त्वरित सखोल चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी बोरुडे यांनी केली आहे.
सदर वृक्षतोड शेती महामंडळाच्या जमिनीत होत असल्याने महामंडळाच्या कार्यालयाकडे वृक्षतोडीबाबत विचारणा केली असता, 'वृक्षतोडीचा कर भरून घेण्यात आला आहे', असे सांगण्यात आले. शेती महामंडळाने कोणत्या अधिकारक्षेत्रात कर भरून संबंधितांना वृक्षतोड करू दिली? कर भरला का मोठमोठी नैसर्गिक तसेच फळझाडांची कत्तल करता येते का??असा संतप्त सवालही बोरुडे यांनी विचारला आहे. शेती महामंडळाकडे वृक्षतोडीचा कर भरल्यावर वृक्षतोडीची परवानगी मिळते का?? शेती महामंडळाला कर भरून घेऊन संबंधितांना वृक्षतोड करू देण्याचा अधिकारी कोणी दिला?? कोणत्या नियमानुसार?? शेती महामंडळाने कर भरून घेतल्यावर वृक्षतोड करण्यासाठी वन विभागाची परवानगी लागत नाही का?? यापूर्वी अशा किती वृक्षतोडीचा कर शेती महामंडळाने भरून घेऊन किती वृक्षांची कत्तल आजपर्यंत झाली?? व ती लाकडे कुठं गेली?? यांची चौकशी, तपासणी करून दोषींवर कारवाई करावी, असे बोरुडे यांनी म्हंटले आहे.
शासन एकीकडे 'झाडे लावा झाडे जगवा', असा संदेश देत असताना शासनाचे नोकर ( लोकसेवक ) मोठया प्रमाणावर अर्थपूर्ण तडजोडीतून वृक्षतोड करत आहे का?? पर्यावरण संरक्षण, संवर्धनासाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असतानाच दुसरीकडे शासकीय कर्मचाऱ्यांच्या अर्थपूर्ण व्यवहारातून अशा प्रकारे अनेक वर्षांपूर्वीच्या जीवंत, नैसर्गिक झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल होत आहे का?? सदर मोठ्या प्रमाणात केलेली वृक्षतोड संबंधित वन विभागाचे अधिकारी - कर्मचारी, वखार चालक, शेती महामंडळ यांनी शासनाची फसवणूक करून अर्थपूर्ण व्यवहारातून केली आहे का?? या सर्व प्रकारामध्ये वन विभाग, शेती महामंडळाची सखोल चौकशी करावी, संबंधित दोषींवर त्वरित कायदेशीर कारवाई करावी; अन्यथा उपवनसंरक्षक कार्यालय अहमदनगर यांच्या कार्यालयासमोर उपोषण, धरणे, घेराव, 'इन्कलाब' आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.