अशोक सहकारी साखर कारखान्याची सन 2020-21 या वर्षाची सर्वसाधारण सभा ऑनलाईन पध्दतीने कारखान्याचे चेअरमन माजी आ.भानुदास मुरकुटे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे, माजी चेअरमन रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, ज्ञानदेव साळुंके, सोपानराव राऊत, हिंमतराव धुमाळ, आदिनाथ झुराळे, रामभाऊ कसार, ज्ञानेश्वर शिंदे, यशवंत बनकर, प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्वर काळे, ज्ञानदेव पटारे, पुंजाहरी शिंदे, विरेश गलांडे, बाबासाहेब आदिक, यशवंत रणनवरे, अमोल कोकणे, योगेश विटनोर आदी उपस्थित होते.
श्री.मुरकुटे म्हणाले की, कार्यक्षेत्रात 10 ते 12 लाख टन ऊसाची उपलब्धता आहे. कार्यक्षेत्रात 11 व्या व 12 व्या महिन्यातच 60 टक्के ऊसाची लागवड केली जाते. त्यामुळे ऊस गाळप करणे हे आव्हानात्मक ठरते. अशाही स्थितीत कारखाना दररोज 6 हजार ऊसाची तोड करीत असून त्यापैकी स्वत:चे 4200 मे.टन गाळप करुन सुमारे 1 हजार 800 ते 2 हजार मे.टन ऊसाचा राहुरी, संगमनेर, प्रवरा आदी कारखान्यांना पुरवठा करीत आहे. कारखाना व्यवस्थापनाने ऊस तोडणीचे योग्य नियोजन केले असून कार्यक्षेत्रातील संपूर्ण ऊसाचे गाळप केले जाईल, याबाबत सभासदांनी अश्वस्त राहावे.
कारखान्याच्या संचालक मंडळाने आजवर पारदर्शक व काटकसरीने कारभार केला आहे. ऊसाचा भाव हा कोणाच्या मर्जीनुसार निघत नसतो तर तो उत्पन्न व खर्च याच्याशी निगडीत असतो. सन 2020-21 च्या गळीत हंगामात कारखान्याच्या साखर विभागास रु.15 कोटी 55 लाख इतका तोटा झाला. तर आसवनी विभागाला रु.7 कोटी 54 लाख, सहविज प्रकल्प विभागाला रु.6 कोटी 63 लाख व सॅनिटायझर विभागाला रु.14 लाख इतका नफा झाला. याचा हिशोब करुन कारखान्याने प्रतिटन रु.2 हजार 200 असा जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव दिला आहे. प्रवरा, कोळपेवाडी व संजीवनी कारखान्याकडे देशी दारुचे प्रकल्प आहेत तर संगमनेर कारखान्याची गाळप क्षमता अधिक आहे त्यामुळे ते जास्त भाव देऊ शकतात. अन्यथा आपल्या कारखान्याने नेहमीच जिल्ह्यातील चांगल्या कारखान्याच्या बरोबरीने भाव दिला आहे, असे श्री.मुरकुटे यांनी स्पष्ट केले.
सभेतील विषय पत्रिकेवरील चर्चेत सहभाग घेताना साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर म्हणाले की, कारखान्याचे नियोजन व कारभार अतिशय काटेकोर आहे. सद्यस्थिती बघता नवीन प्रकल्प उभारणीबाबत विचार करावा. शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे म्हणाले की, एफआरपी कायदा हा साखर उतार्यावर आधारीत आहे. याचा अर्थ फक्त साखर उत्पादनाचा विचार केला आहे त्यात दुरुस्ती होणे आवश्यक आहे. शेतकरी संघटनेचे अनिल औताडे म्हणाले की, कारखाना वाहनावरील खर्च जास्त आहे. तसेच भाडोत्री वाहनांचा खर्च जास्त आहे. व्हीएसआय साखर उतार्याचे नॉर्मस देतो त्यामुळे उतारा मिळाला पाहिजे. शेतकरी संघटनेचे युवराज जगताप म्हणाले की, दोष दुरुस्ती अहवालात नमूद केल्यानुसार दोष दुरुस्ती झालेली दिसत नाही. साखर विक‘ी ई-टेंडर पद्धतीने झाली पाहिजे. यावेळी शिवाजी मुठे, शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे, रामदास पटारे, ऋतुराज धुमाळ आदींनी 5 हजार टनी नवीन प्रकल्प उभारावा, अशी सूचना केली. चर्चेमध्ये स्वाभिमानी संघटनेचे जितेंद्र भोसले, सुनिल बोडखे, रणजित बनकर आदींनी सहभाग घेतला.
यावेळी कारखान्याच्या वतीने सर्वाधिक उत्पादन घेणार्या सभासद, ऊस उत्पादकांना गौरविण्यात आले. शोभा आप्पासाहेब पवार, अनिता भारत सुकासे, दिगंबर त्रिंबक भालदंड (आडसाली), विजय बाबासाहेब आढाव, बबन उमाजी उंडे, नानासाहेब लक्ष्मण तागड (पूर्व हंगामी), यादव भाऊसाहेब तुपे, दादासाहेब दगडू पटारे, पांडूरंग जयवंत गवारे (सुरु), भाऊसाहेब पांडूरंग पवार, विजय दिनकर आसने, बाबासाहेब भाऊसाहेब आढाव (खोडवा) यांना पुरस्कार व सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले. याप्रसंगी संचालक विरेश गलांडे यांनी मांडलेल्या अध्यक्षीय सूचनेस ज्ञानेश्वर काळे यांनी अनुमोदन दिले. व्हा.चेअरमन भाऊसाहेब उंडे यांनी श्रध्दांजली ठरावाचे वाचन केले. पर्सोनल मॅनेजर लव शिंदे यांनी मागील सभेच्या इतिवृत्ताचे वाचन केले. तर कार्यकारी संचालक संतोष देवकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी सभासद, अधिकारी तसेच कर्मचारी उपस्थित होते.