साईकिरण टाइम्स | १० डिसेंबर २०२०
श्रीरामपूर (प्रतिनिधी) शहराच्या मिल्लतनगर उपनगरातील गोंधवणी पुलापासून मिल्लतनगर चौक व पुढे गणपती मंदिर व तेथून साई रेल्वे भुयारी मार्ग पर्यंतच्या सर्वात मोठ्या रस्त्यावरील मिल्लतनगर चौक ते गोंधवणी पूल या भागातील रस्त्याची डागडुजी सध्या सुरू झाली आहे.
गेले अनेक महिने या भागातील नागरिकांनी यातना सहन केल्यानंतर नगरपालिकेने रस्त्याच्या डागडुजीचे काम हाती घेतले आहे. परंतु, सदरचे काम हे निकृष्ट होत असून पूर्ण खड्डे बुजवले गेलेले नाहीत. त्यामुळे नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक यांनी या महत्वाच्या रस्त्याच्या कामात लक्ष घालून दर्जेदार रस्ता कसा तयार होईल याबाबत संबंधित ठेकेदारांना सूचना द्याव्यात.
हा रस्ता शहराच्या उपनगरातील रस्त्यांपैकी अत्यंत महत्त्वाचा असून संजय नगर, गोपीनाथ नगर, सुखदा कॉलनी, रामनगर, मिल्लतनगर, फातिमा कॉलनी आदी सर्व परिसरातील नागरिक रहदारीसाठी या रस्त्याचा वापर करतात. मोठ्याप्रमाणावर वर्दळीचा असलेला हा रस्ता यापूर्वी अनेक वेळा दुरुस्त करण्यात आला. परंतु निकृष्ट कामामुळे दोन-तीन महिन्यातच रस्त्याला खड्डे पडायला सुरुवात होते. त्यामुळे आता होणारे डांबरीकरण हे महत्प्रयासाने होत असून ज्यादिवशी रस्त्याचे डांबरीकरण होईल त्या दिवशी मिल्लत चौकामध्ये रस्त्याचे डांबरीकरण झाल्याच्या तारखेचा बोर्ड मिल्लत नगर विकास समितीतर्फे लावण्यात येणार आहे. सदर रस्त्यावरची एकूण होणारी वाहतूक आणि वाहनांची संख्या पाहता या रस्त्याचे काम दर्जा राखून होणे आवश्यक आहे. यापूर्वी सदर रस्त्याचे काम संबंधित ठेकेदाराने अतिशय निकृष्ट दर्जाचे केल्यामुळे नागरिकांना अनेक वर्ष त्याचा त्रास सहन करावा लागलेला आहे. याबाबत या भागातील नगरसेवकांनी सुद्धा लक्ष घालण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. खूप यातना सहन केल्यानंतर होणारे रस्त्याचे काम दर्जेदार होईल याबाबत परिसरातील नागरिक आशावादी आहेत .
समांतर ड्रेनेज करावी
सदरचा रस्ता हा कॅनॉलला समांतर गेला असून वर्षभरात कॅनलला ज्या ज्या वेळी पाणी येते त्या वेळी पाण्याचा पाझर रस्त्यावर येतो. त्यातून रस्ता कमकुवत होतो . त्यामुळे हा रस्ता दीर्घकालीन टिकवायचा असेल तर कॅनॉलच्या बाजूने रस्त्याच्या समांतर अशी ड्रेनेज गटार बांधणे आवश्यक आहे. त्यामुळे कॅनलला पाणी आल्यानंतर पाझराचे पाणी या गटारीतून पुढे निघून जाईल आणि रस्ता सुरक्षित राहील. त्यामुळे आधी ड्रेनेज गटार बांधावी व नंतरच रस्त्याचे काम करण्यात यावे अशी आग्रही मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.