साईकिरण टाइम्स | राजेश बोरुडे
श्रीरामपूर : पालिका हद्दीतील गोंधवणी रस्त्यावरील झिरंगे नगर चौकात गतिरोधकच नसल्यामुळे हा परिसर अपघातांचा हॉटस्पॉट बनत आहे. झिरंगे नगर चौकालगतच पेट्रोलपंप असल्यामुळे येथे चारही दिशांकडून दिवसरात्र वाहनधारकांचा ओघ सुरु असतो. कॅनॉल वरील पुलावरूनही वेगाने वाहनधारक येतात. याठिकाणी छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून, अनेकदा वाहचालकांचे वादविवाद होतात. या भागात ठिकठिकाणी ब्रेकर बसविण्याची मागणी नागरिक करत आहेत. भागातील नगरसेवक, नगराध्यक्ष व पालिका प्रशासनाने गतिरोधक बसविण्याबाबत त्वरित कार्यवाही करणे आवश्यक आहे.
अतीवर्दळीच्या गोंधवणी रस्ता व झिरंगेनगर चौक परिसरातून मार्गक्रमण करताना नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे. गोंधवणी रस्त्यावर त्वरित ठिकठिकाणी गतिरोधक बनवून रस्त्यात व रस्त्यालगत वाहतुकीस असणारे अडथळे त्वरित हटविणे गरजेचे आहे. झिरंगेनगर चौक परिसरात ब्रेकरच नसल्यामुळे छोट्या-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले असून, मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. चौकालगत पेट्रोलपंप असल्यामुळे येथे कायमच वाहतुक असते.
फातेमा सोसायटी, मिल्लत नगर, संजय नगर, गोपीनाथ नगर, वॉर्ड नं २ आदी भागातून झिरंगेनगर लगत असलेल्या पेट्रोलपंपाकडे वाहनधारक वळतात. पेट्रोल भरण्यासाठी व इतर कामानिमित्त लोक याच परिसरातून मार्गक्रमण करतात. कॅनॉलवरील पुलावरूनही भरधाव वेगाने वाहनधारक येऊन पेट्रोल पंपाकडे जातात. त्यामुळे झिरंगेनगर चौक परिसरात रोजच किरकोळ अपघात होऊन वाहनधारकांचेही वादविवाद होतात.
