श्री
श्रीरामपूर : गोंधवणीतील महादेव मंदिराजवळील नगरपालिका शाळा क्रमांक ३ येथे गुरुवारी (दि.१९) 'शाळापूर्व तयारी मेळावा' उत्साहात पार पडला. इयत्ता पहिलीला दाखल होणाऱ्या बालकांसाठी 'स्टार्स' प्रकल्पातर्गत 'शाळापूर्व तयारी अभियान' राबविण्यात आले. दाखलपात्र विद्यार्थ्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य, शिक्षक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांच्या हस्ते मेळाव्याचे उदघाटन करण्यात आले. दाखलपात्र विद्यार्थ्यांचे पावलांचे ठसे घेऊन नोंदणी करण्यात आली. मेळाव्यात विविध सात स्टॉल लावून बालकांच्या कृतींच्या नोंदी करण्यात आल्या. बालकांचा शारीरिक, बौद्धिक, सामाजिक, भावनिक व भाषा विकास, गणनपूर्व तयारीबाबत प्रात्याक्षिकांद्वारे क्षमतांची चाचपणी केली. चेंडू फेकणे, दोरीवरील उद्या आदी खेळ घेण्यात आले.
बालकांचे फोटो काढण्यासाठी सेल्फी पॉईंट बनविण्यात आला होता. बालकांच्या सर्वांगीण विकासाचा संदेश देणारी विविध स्टॉलची सुंदर रांगोळी स्वागतासाठी काढण्यात आली होती.