श्रीरामपूर पालिका अभ्यासिका शुल्कामध्ये दहापट वाढ; संतप्त विद्यार्थ्यांचा ग्रंथपाल स्वाती पुरे यांना घेराव


श्रीरामपूर : पालिका प्रशासनाने गरीब विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सुरू केलेल्या अभ्यासिकेचे शुल्क अचानक १० पट वाढविले. त्यातच ग्रंथपाल स्वाती पुरे यांनी विद्यार्थ्यांची विनंती धूडकावून लावत विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास मज्जाव केला. संतप्त विद्यार्थ्यांनी पुरे यांना नगर पालिकेसमोर घेराव घालीत जाब विचारला.

            स्व. जंयत ससाणे यांच्या पुढाकारातून शहरातील गरीब विद्यार्थ्यांसाठी अभ्यसिका सुरू करण्यात आली. पालिका प्रशासनाकडून नाममात्र शुल्क आकारून विद्यार्थ्यांना पुस्तके, वीज, पाणी  या सुविधांसह अभ्यासिका उपलब्ध करून देण्याचा ठरावही तत्कालिन पदाधिकाऱ्यांनी मंजूर केला. त्यानुसार आतापर्यंत विद्यार्थ्यांकडून सहा महिन्यांकरिता ६० रूपये शुल्क आकारले जात होते. मात्र आता अचानक या शुल्कामध्ये तब्बल दहापट वाढ केली. आता ६० ऐवजी ६०० रूपये भरावे लागणार असल्याने विद्यार्थी हवालदिल झाले. काल सायंकाळी अभ्यासासाठी विद्यार्थी अभ्यासिकेत गेले असता पुरे यांनी शुल्क भरल्याशिवाय बसता येणार नसल्याचे सांगितले. सर्वांनी विनंती केली. इतके शुल्क सर्वांना भरणे शक्य नाही. ती विनंती धुडकावून लावत पुरे यांनी शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यास मज्जाव केला.

            संतप्त झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने पालिकेत मुख्याधिकाऱ्यांकडे आपली कैफीयत मांडण्यासाठी गेले.मात्र, मुख्याधिकारी यांची भेट होऊ शकली नाही. खाली आल्यानंतर सर्वांनी पुरे यांनी घेरावो घालीत जाब विचारला. पुरे यांनी त्यांच्या भावना समजावून घेत शांत करण्याऐवजी अजब उत्तरे दिली. शंभर रूपये महिना म्हणजे काही विशेष नाही. बाहेर खासगी अभ्यासिकेत किती फी आहे जाऊन बघा. मुलं चहा प्यायला गेले तर किती पैसे खर्च करतात. मग अभ्यासिकेसाठी दिल्याने काय बिघडते. शिवाय पुस्तकांच्या किंमती प्रचंड वाढल्याने आता पालिका प्रशासनास अल्प दर शक्य नाही. असे अजब तर्क ऐकूण विद्यार्थी आणखीच संतत्प झाले.

               यावरून सामाजिक कार्यकर्ते समित मुथ्था व पुरे यांच्यात शाब्दीक चकमक उडाली. विद्यर्थ्यांशी शांततेत बोला. आवाज वाढवू नका. अधिकाराचा गैरवापर करून आरेरावी करू नका, पालिका नागरिकांच्या भल्यासाठी असते. पैसे कमविण्यासाठी नाही असे मुथ्या यांनी ठणकावले.

           

याचवेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक, याही तेथे आल्या त्यांनीही पुरे यांना धारेवर धरले. आदिक म्हणाल्या, राजकीय विरोधक असूनही स्व. ससाणे यांनी अभ्यासिकेचा स्तुत्य उपक्रम सुरू केला होता, असे मी मानते. गरीब विद्यार्थी याठिकाणी शिकतात त्यांच्यावर होणारा अन्याय खपवून घेतला जाणार नाही. याबाबत प्रांताधिकाऱ्यांना भेटून शुल्क कमी करण्याची मागणी करणार असल्याच्या त्या म्हणाल्या. यावेळी रोटे यांनी मुख्याधिकाऱ्यांनी फोन लावून संपर्क केला. मात्र, मिटिंगमध्ये असल्याने बोलणे होऊ शकले नाही. 


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post