श्रीरामपूर : लोकमान्य टिळक वाचनालयात ग्रंथपाल पदावर काम करणाऱ्या स्वाती पुरे यांचा अतिशय मनमानी कारभार सुरू असून शहरातील त्या नागरिकांना या प्रचंड त्रास देतात. त्यांची तात्काळ बदली करण्यात यावी, या श्रीरामपूर भाजपाचे शहराध्यक्ष मारूती बिंगले यांनी केलेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी त्रिदस्यीय समिती नेमून चौकशीचे आदेश दिले आहेत.
भाजपाचे शहराध्यक्ष बिंगले यंच्या नेतृत्त्वाखाली युवा मोर्चाचे हंसराज बतरा, महिला मोर्चा अध्यक्ष पुष्पलता हरदास, जिल्हा युवा सरचिटणीस रूपेश हरकल, जिल्हा महिला मोर्चा सरचिटणीस पुजा चव्हान, शहराध्यक्ष विजय आखाडे आदींनी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुरे यांच्या मनमानी कारभाराबाबत तक्रार केली.
त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, श्रीरामपूर नगर पालिका लोकमान्य टिळक वाचनालयात ग्रंथपाल पदावर काम करणाऱ्या श्रीमती स्वाती पुरे यांची अतिशय मनमानी कारभार सुरू असून शहरातील नागरिकांना या प्रचंड त्रास देतात. याठिकाणी अडचणीच्या काळात लघुशंकेसाठी आलेल्या महिला, विद्यार्थीनी यांची अडवणूक केली जाते. बाथरूमचा वापर महिलांना करू दिला जात नाही. वाचनालयात येणाऱ्या नागरिकांना सहकार्याची भुमिका नसते. वाचनालय ही शासकीय इमारत असून पुरे या आपली खासगी मालमत्ता असल्याप्रमाणे येथे वावरतात. येथे अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनाही त्यांना सतत त्रास असतो. त्यांनीही अनेकदा याविषयी आंदोलन केले आहेत. याशिवाय याठिकाणी कामास असलेल्या कर्मचाऱ्यांनादेखील या स्वाती पुरे आरेरावीची भाषा वापरतात. आझाद मैदान व आगाशे सभागृहाचे शुल्क भरून देखील सार्वजनिक कार्यक्रमाच्यावेळी सहकार्य केले जात नाही. आयोजकांना दमदाटी केली जाते. त्यांची कुचंबना होते. शासनाचा कारभार जनताभिमुख असायला हवा. शासकीय कर्मचारी व अधिकारी हे जनतेच्या सहकार्यासाठी नेमलेले असतात मात्र स्वाती पुरे या कोणाशीही सहकार्याने वागणे तर सोडा उलट सर्वांशी उद्धटपणे वागत असतात. अशा मग्रुर अधिकाऱ्याची तात्काळ बदली करण्यात यावी. पुरे यां ची वाचनालयाच्या ग्रंथपालपदी झालेली नियुक्तीदेखील वादाचा विषय आहे. त्यांची पात्रता नसताना त्यांनी अनधिकृतपणे या पदावर आपली नियुक्ती करवून घेतलेली आहे. त्यामुळे त्यांची या पदावरील पात्रता निकष तपासून नियुक्तीबाबतही सखोल चौकशी करावी, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा बिंगले यांनी दिला होता.
त्यांच्या या तक्रारीची गंभीर दखल घेत प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी मुख्याधिकाऱ्यांना चौकशी करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार मुख्याधिकारी जाधव यांनी अंतर्गत लेखा परिक्षक जयश्री दिलीप सायखेडे, कर व प्रशासकीय सेवा अधिकारी दिपक खोब्रागडे, तसेच शितल भिमराज काळे यांची त्रिसदस्यीय समिती नेमली असून त्यांना प्रांताधिकाऱ्यांना आलेल्या तक्रार अर्जाच्या अनुषंगाने चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. पुढील कारवाई करण्यासाठी चौकशीचा अहवाल लवकरात लवकर सादर करण्याच्या कामात कुठलीही टाळाटाळ करणे तसेच हलगर्जीपणा करता कामा नये असा ईशाराही देण्यात आला आहे.