ऑस्ट्रेलियाविरूध्द अॅडलेड येथे झालेल्या पहिल्या दिवस रात्र कसोटीत भारताचा संघ दुसऱ्या डावात केवळ ३६ धावात उखाडला, त्यामुळे जगभरातील स्वयंघोषित क्रिकेट पंडितांनी आपल्या अकलेचे तारे तोडायला सुरुवात केली. भारत चालू कसोटी मालिका ४-० हरेल अशी भविष्यवाणी यातील अनेक जणांनी केली आहे. त्यामध्ये परदेशी नतद्रष्ट्यांसह भारतातील विद्वांनाचा समावेश आहे. भारताचा संघ ३६ धावात गुंडाळला गेला म्हणजे भारताचे क्रिकेट संपले. भारतीय फलंदाजी मृत पावली, असा समज काही दळभदऱ्या लोंकाचा झाला आहे. खेळात हार जीत असतेच. भारत या सामन्यात हरला. तसे इतरही देश हरतात. भारताचा हा काही पहिला पराभव नव्हता तसा शेवटचाही नाही. मात्र भारताने ज्या प्रकारे साक्षात लोटांगण घेतले ती बाब सोडता हा पराभव खेळाचाच एक भाग असून फक्त या पराभवातून लवकरात लवकर सावरणे व विरोधकांना त्यांची जागा दाखवून स्वतःही झटपट लय पकडणे हे भारतीय संघाचे पुढचे काम आहे, आणि भारताचा संघ हे आव्हान पार पाडू शकतो हे यापूर्वीही घडलेल्या काही घटनांतून सिध्द झाले असून याला साक्षात इतिहासच साक्षीला आहे.
या दौऱ्याच्या सुरूवातीपासूनच भारतीय संघाला खेळाडूंच्या दुखापतीने ग्रासले असून रोहीत शर्मा, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, दौऱ्याच्या मध्यान्हाला रवींद्र जडेजा व पहिल्या कसोटीत हुकमी गोलंदाज मोहम्मद शमी जखमी झाल्याने भारतीय संघ हादरला आहे. त्यातच भारताचा अव्वल फलंदाज व कर्णधार विराट कोहली खाजगी कारणामुळे संघ सोडून चालला आहे. या सर्व बाबी संघाचे मनोथर्य खच्ची करण्यास पुरेशा असल्या तरी वरील खेळाडूंना पर्याय म्हणून निवडलेले खेळाडूही तितकेच तोलामोलाचे असल्याने लगेच त्यांच्या गुणवत्तेवर शंका घेणे अयोग्य आहे.
मागील पराभवातून खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून जिवंत होऊन यशस्वी भरारी मारून समस्त क्रिकेट जगताला भारताच्या क्रिकेटींग क्षमतेचे दर्शन घडविण्याची जबाबदारी सध्याच्या संघावर असून ते करण्याची पूर्ण कुवत या संघात नक्कीच आहे. विराट कोहलीच्या गैरहेरीत अजिंक्य राहाणेने यापूर्वी भारताचे तीन कसोट्यात नेतृत्व केले असून भारताला ते तीनही सामने अजिंक्य राहणेने जिंकून दिले आहेत. त्यामुळे राहणेच्या नेतृत्व गुणांवर शंका घेण्याचे काही एक कारण नाही
कोहलीच्या मायदेशी परतण्याने संघाची फलंदाजी कमकुवत होईल असे भाकित केले जात आहे. परंतु ते सारासार खोटे आहे. कोहलीच्या उपस्थितीतच भारताने आपली कसोटी इतिहासातील निच्चांकी धावसंख्या नोंदवली आहे. त्या सामन्यात त्या निच्चांकी धावांमध्ये त्याचेही केवळ ४ धावांचे योगदान होते. कोहलीशिवाय भारत चांगला खेळ करू शकतो हे मागील अनेक सामन्यात सिध्द झाले आहे. कोहलीच्या गैरहजेरीत वनडे व टि २० सामन्यात रोहीत शर्माने अतिशय सुंदर नेतृत्व केले असून त्याची यशाची टक्केवारी ८० टक्के एवढी आहे. तर कसोटीत कोहलीच्या अनुपस्थितीत अजिंक्य राहाणेची जिंकण्याची सरासरी १०० टक्के आहे हे कोणी विसरू नये. गेली सहा वर्ष भारताचे नेतृत्व करणाऱ्या कोहलीचीही एवढी यशवारी नाही.
भारताने मागील पराभवाचा विचार सोडून सकारात्मक देहबोलीने सामन्यात उतरावे. संघ निवड करताना मागील काही सामन्यात खरोखर अपयशी ठरलेल्या व आपल्या गुणवत्तेला न्याय न देणाऱ्या खेळाडूंना आराम देऊन पर्यायी खेळाडूंमध्ये आत्मविश्वास भरून त्याला प्रेरित करावे.
खास करून मागील काही सामन्यात सातत्याने अपयशी ठरलेला सलामीवीर पृथ्वी शॉला विश्नांती देण्याची गरज आहे. शॉ एक गुणवान खेळाडू आहे. परंतु सध्या तो बॅडपॅचमधून जात असल्याने त्याच्यावर ताण पडेल अशा जबाबदाऱ्या टाळाव्यात. त्याचे वय अवघे २१ वर्ष असल्याने त्याच्यात बरेच क्रिकेट बाकी असून तो झालेल्या चुकांमधून शिकू शकतो. त्याने १९ व्या वर्षी कसोटी पदार्पणातच शतक केले आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवण्यासारखी आहे. शॉ ला वगळणे म्हणजे त्याचे क्रिकेट संपवणे असे नाही तर त्याला चुका दुरुस्त करण्यास संधी देणे असा समजावा.
कर्णधार कोहली ऐवजी के.एल राहुल, पृथ्वी शॉ ऐवजी शुभमन गिल, हनुमान विहारी ऐवजी रविंद्र जडेजा व जखमी मोहम्मद शम्मी ऐवजी नवदिप सैनी किंवा मोहम्मद सिराज असे बदल केल्यास पुढील कसोटीत भारत ऑस्ट्रेलियाला पराभवाचा डोस पाजू शकतो. त्यासाठी फक्त मागच्या कसोटीतील पराभव विसरून सकारात्मक धोरण ठेवणे आवश्यक आहे.
ऑस्ट्रेलियातच मागील काही मालिकांमध्ये भारताने पिछाडीवरूनही बरोबरी साधल्याचे उदाहरणे आहेत. त्यामुळे खचून न जाता फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून जिवंत होऊन यशस्वी भरारी मारण्याची गरज आहे.
लेखक : -
डॉ.दत्ता विघावे
क्रिकेट समिक्षक.
इंटर नॅशनल मेंबर ऑफ वर्ल्ड पार्लमेंट,
मेंबर ऑफ युनायटेड नेशन्स ग्लोबल टॅलेंट पुल,
प्रतिनिधी भारत.
Email: dattavighave@gmail.com