साईकिरण टाइम्स | २२ डिसेंबर २०२०
बेलापूर ( प्रतिनिधी ) बेलापूर ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याबाबतची प्रक्रिया सर्व कायदेशीर बाबींचे पालन करुन कायद्याच्या चौकटीत राहूनच केली जाणार आहे. त्यामुळे यासंदर्भात कोणतीही शंका बाळगण्याचे कारण नाही. अखेर निवडणुक बिनविरोध करायची की नाही हे अंतिमतः सर्वपक्षिय नेत्यांच्या व ग्रामस्थांच्याच भुमिकेवरच अवलंबून असेल, असा खुलासा बेलापूर पञकार संघाकडून करण्यात आला आहे.
यासंदर्भात बेलापूर पञकार संघाने प्रसिध्दिसाठी दिलेल्या पञकात म्हटले आहे की, राजकीय कटुता टाळावी तसेच निवडणुकीवर होणारा अनावश्यक अफाट खर्च गावाच्या विकासाचे करणी लागावा यासाठी निवडणूक बिनविरोधी व्हावी अशी बेलापुर पत्रकार संघाची अपेक्षा आहे.
याबाबत अनेक ग्रामस्थांनी निवडणुका बिनविरोध व्हाव्यात, अशा भावना पत्रकार संघाकडे व्यक्त केल्या. ग्रामस्थांच्या या भावनांना प्रतिसाद म्हणून बेलापूर पञकार संघाने निवडाणूक बिनविरोध व्हावी यासाठी पुढाकार घेतला.
यासाठी गावातील सर्वपक्षियांची बैठक बोलविण्यात आली. या बैठकीस सर्वपक्षिय नेते, विविध संघटनांचे प्रतिनिधी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या बैठकीत सर्वांशी चर्चा करुन सर्वसंमतीने प्रस्ताव ठरविण्यात आला. यानुसार ज्यांना उमेदवारी करावयाची आहे त्यांनी उमेदवारी अर्ज भरावेत. त्यानंतर ज्यांना बिनविरोध निवडणुकीसाठी नावे द्यायची आहेत त्यांनी आपली नावे यासंदर्भात नियुक्त समितीकडे द्यावीत. बिनविरोध निवडणुकीसाठी पञकार संघाचे कोणीही सदस्य उमेदवारी करणार नाही. त्यानंतर ग्रामस्थांची बैठक घेवून आलेल्या नावांतून वार्डनिहाय व प्रवर्गानुसार कायदेशीर प्रक्रिया पार पाडून १७ उमेदवार निश्चित केले जातील. बिनविरोध निवडणुक वा उमेदवारी करणे याबाबत कोणासही कोणतीही सक्ती नसून केवळ गावाच्या हितासाठी पञकार संघाने पुढाकार घेतला आहे. यापलीकडे ज्यांना उमेदवारी करावयाचीच असेल तर मग रितसर निवडणूक होईल. अशावेळी काय भुमिका घ्यावयाची ते ग्रामस्थ व पञकार संघ ठरवतील .असा बिनविरोध निवडणुकीचा प्रस्ताव असून तो नीटपणे समजून घ्यावा.अखेर बिनविरोध निवडणूक प्रस्तावाबाबत काय करायचे हे सर्वपक्षिय नेते व ग्रामस्थांनी ठरवायचे आहे, असे बेलापुर पञकार संघाने स्पष्ट केले आहे.