तसं पाहिलं तर समाजात भरपूर समस्या प्रश्न अडचणी असतात. काही माणसांना त्या दिसतात, पण समजत नाहीत. पण एखादा कुणीतरी हे प्रश्न सोबत घेऊन त्यावर उपाययोजना शोधत राहतो. काही प्रश्नावर उपाय निघतात काही तसेच लोंबकळत राहतात. विक्रम आणि वेताळाच्या गोष्टीसारखे. परिणामांची पर्वा न करता एखादा विक्रम चालत राहतो. प्रश्न खांद्यावर टाकून. एखादा सल हलका करता आला तर त्यातून विक्रमच मानतो असे विक्रम फार थोडी आजकाल वेताळ जास्त. अशा विक्रमांना लोक जगरहित समाजसेवक, दलित सेवक म्हणतात स्वतःपुरता पाहणाऱ्यांना असा माणूस वेडा वाटतो पण एखाद्या उद्दिष्टाने वेडी झालेली माणसं मात्र इतिहासाची पान रचतात.
अरुणराव मिसाळ त्याच फळीतले. अक्षरशः एक "एकला चलो रे" या चाळीतले. स्वतःबद्दलची फारशी चिंता न करता दुसऱ्याच्या सावलीसाठी एक झाड शोधणारा हा माणूस. गावागावात आणि सरकारी दरबारी सुद्धा त्यांच्याकडे दलित सेवक म्हणून पाहिलं जातं. नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती हे त्यांचं गाव. आज त्यांचा ६६ वा वाढदिवस.... वाढदिवसानिमित्त त्यांच्याशी पत्रकार प्रल्हाद एडके यांनी संवाद साधत त्यांच्या जीवनकार्याचा घेतलेला हा संक्षिप्त आढावा...
प्रश्न: मिसाळ साहेब, वयाची साहसष्टी पूर्ण केली आज समाज सेवक दलित सेवक म्हणून तुम्हाला ओळखले जाते काय वाटतं मागे वळून पाहताना?
अरुणराव : अतिशय सामान्य कुटुंबात माझा जन्म झाला. 1954 च्या 10 ऑक्टोबरला. आजपर्यंत समाजासाठी जी करता आली ती सेवा केली, अजून करणार आहे. माझ्यामुळे एखादा व्यसनाधीन माणूस परत माणसात आला, एखादं कुटुंब हिमतीने स्वाभिमानानं उभ राहिल हे पाहून चीज झालं असं वाटतंय, मी समाधानी आहे.
प्रश्न : तुम्ही निवडलेल्या या मार्गाबद्दल आज काय वाटते?
अरुणराव : अजिबात चुकीचा नाही, हे नक्की. माझा पिंड मला त्याच दिशेने नेत राहिला. आई-वडिलांना काळजी वाटायची अनेक नको ते प्रसंग घडायचे पण मी त्यांची समजूत काढायचं दुसऱ्या दिवसापासून पुन्हा ते चालू.
प्रश्न : तुमच्या शिक्षणाबद्दल थोड सांगितले तर छान होईल....
अरुणराव : इयत्ता चौथी गावामध्ये झाले पुढे पाचवीचा वर्ग नव्हता मग कुकाना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिथे पाचवी सहावी आणि सातवी आठवी वडाळा मिशन. त्या काळात इच्छा असूनही परिस्थितीमुळे शिक्षण थांबवावं लागलं.
प्रश्न : समाजसेवा दलित सेवा हे सगळं कसं डोक्यात शिरल मग?
अरुणराव : काय झालं शिक्षण सुटलं. पुढे काय हा प्रश्न उभारायला. मजुरी शेती यात मन रमत नव्हतं घरी बसून कंटाळलो 1970 साल होतं डोक्याचे केस वाढले होते त्यांनी मला या क्षेत्रात आणलं.
प्रश्न : म्हणजे कसं?स्पष्ट करून सांगा.
अरुणराव : म्हणजे असं झालं बघा त्या काळात अस्पृश्यता जातीयता पुष्कळ होती आजही आहे पण धार बोथट झाली समाज म्हणजे दलितांचा शिकत होता तसा पिचतही होता. केस कापायला गावात गेलो सलून वाल्याने दुकानात केस कापायला नकार दिला.
प्रश्न : का? कशामुळे?
अरुणराव : मी दलित म्हणून. अस्पृश्यता. हट्ट धरला माणूस नाही का मी? त्याला म्हटलं तो सांगू लागला तुझे केस कापले तर लोक माझ्यावर बहिष्कार टाकतील, वाळीत टाकतील, दुकानात कोणी येणार नाही, मला पोट भरायचे.बाहेर बसून कापतो शेवटी मी पोलिसात तक्रार केली आणि मला माझा न्याय मिळाला. पोलिसांच्या साथीने दुकानातच केस कापले.
तिथून अंतर्मुख झालो आपल्या या दलित जीवनाच्या वाटेत किती काटे? सलूनमध्ये ही तर्हा. पानवठा वेगळा. मग हीच घटना कलाटणी ठरली. माझ्या भादरललेल्या केसात साऱ्या दलितांची दुःख दिसू लागलं. माणूस म्हणून जगण्याचे ठरवलं...
प्रश्न : हे सगळं करीत असताना राजकारणाशी संबंध आलाच असेल?
अरुणराव : तेवढे क्षेत्र पूर्णपणे टाळलं. राजकारणात न उतरता फक्त समाजसेवा करायची ठरविली. मात्र राजकीय व्यक्तींशी माझे संबंध कायम जवळचे मैत्रीचे राहिले आहेत.
प्रश्न : आई-वडील नातेवाईक यांच्या बद्दलच्या प्रतिक्रिया त्या कशा होत्या?
अरुणराव : हे काम कोणालाच आवडलं नव्हतं. एकदम प्रस्थापित चालीरीती समाज याविरुद्ध आवाज उठवावा याची सगळ्यांना एक अनामिक भीती वाटली. शिकावं, नोकरी करावी, प्रपंच सांभाळावा ही आई-वडिलांची रास्त अपेक्षा. त्या काळात प्रस्तापिताविरुद्ध काम करणं हे एक आव्हान होतं. संकटाचा मार्ग होता. गाव पातळीवर तालुका, जिल्हा पातळीवर अवघड म्हणण्यापेक्षा अशक्यप्राय होतं. पण मी सगळ्यांची समजूत घातली. आव्हान स्वीकारलं, पुढे कितीतरी घटना, संकटं, प्रश्न यांचा अनुभव घेत घेत चालत राहिलो. कोणाच्या मदतीची याचना केली नाही. बरोबर आले त्यांना सोबत घेऊन चालतोय.
प्रश्न : कौटुंबिक जीवनाबद्दल थोडा सांगितलं तर बरं होईल...
अरुणराव : या कामात माझ्या आई-वडिलांचा फार मोठा आशीर्वाद आहे. नातेवाईक मित्र यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रेरित केलं. पत्नीची साथ चांगली लाभली. लष्कराच्या भाकरी भाजणारा नवरा कोणत्या बायकोला बरा वाटेल? पण तिने हे सर्व निमूटपणे स्वीकारलं. पुढे मुलं मोठी झाली त्यांनीही मदत केली मानसिक बळ वाढवले.
पत्नी इंदुबाई. 1976 साली आमचं लग्न झालं. चिलेखनवाडी माझी सासुरवाडी. मुलगा अशोक बारावीनंतर शेती करतोय. शेतीच्या फळझाडांच्या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करतोय. प्रपंच सांभाळतो. धाकटा भूषण त्याचप्रमाणे आहे.दोन मुलींची लग्न झाली आहेत. मोठी मुलगी लंका ही साळवे यांच्या घरी व लहानी मुलगी प्रगती ही बर्वे यांच्या घरी सुखी आहे. धाकटी मुलगी हिचा विवाह मात्र सत्यशोधक पद्धतीने लावून दिला. वडिलांचे 1987 ला निधन झाले. ते आज हवे होते... तसेच आई ही हवी होती आज....
प्रश्न : राजकीय व्यक्ती बाबत तुमचे मत कसे आहे?
अरुणराव : तालुका, जिल्हा आणि राज्य पातळीवर सुद्धा अनेक नेत्यांशी संबंध आला. ही माणसं आपल्या स्थानावर मोठी आहेत. कर्तुत्वान आहेत. त्यांची मदत,मार्गदर्शन प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष मिळत गेलं. समाजसेवेचे राजकारण केलं नाही त्यात उतरलोच नाही.
प्रश्न : या राजकीय क्षेत्रातील काही मान्यवरांची नावे...
अरुणराव : हो जरूर सांगतो. मा. यशवंतरावजी गडाखसाहेब, मा. लोकनेते मारुतराव घुले पाटील,ना. शंकररावजी गडाख साहेब, मा.संभाजी फाटके,मा. अभंग साहेब,मा. बाळासाहेब मुरकुटे,मा. चंद्रशेखर घुले,मा. आबासाहेब देशमुख,मा. शंकराव काळे
या सर्वांचा मी ऋणी आहे. याप्रमाणेच सरकारी अधिकारी, बीडीओ, तहसीलदार, जिल्हाधिकारी यांनी ही पुष्कळ मानसिक बळ दिलं. अर्थात बरेच ठिकाणी तेवढेच प्रतिकूल तिखट अनुभव आले. पण अशा कामात ते होतच असतं. हे क्षेत्र असा आहे शेतमजूर धंदेवाल्या पासून तर देहविक्री करणाऱ्या महिलांसाठी काम करणाऱ्या ला अगदी कोणाची सुद्धा धमकी मिळते. मला ते अनुभव आहेत. फक्त मार्ग काढत चालायचे. एवढेच दमछाक होते. पण समाजसेवेची नशा अशी आहे फार मोठ मानसिक समाधान मिळते त्यातून. थोर समाजसेवक यांच्या मानाने माझं काम किरकोळ आहे फक्त मी त्याच्याशी प्रामाणिक आहे.
प्रश्न : काही चांगले वाईट अनुभव? कसं निभावलं?
अरुणराव : चांगले आहेत तसेच वाईट प्रसंगी भरपूर आहेत. पण एकदा पताका खांद्यावर घेतल्यावर इतर गोष्टींचा विचार नसतो.
त्यातही समाजात काही घटकांना परिवर्तन क्रांती नको असते. पारंपारिक जीवनप्रणाली बदलायला ही माणसं राजी नसतात. स्वप्ने हा त्यांचा दोष पण तोच ती भूषण म्हणून वागवतात. एक उदाहरण सांगतो नाव न घेता... एका गावात पतीने पत्नीवर संशय घेतला, तो पिसाळला, तिला शेतात दूर नेऊन झाडाला बांधले, डोक्यावरचे केस मुंडण करून काढली, धिंड काढली गावात, स्त्रीत्वाची केवढी विटंबना? गाव गप्प. आम्ही धावून गेलो पोलीस स्टेशनला तक्रार केली. तिथं पोलिसांनी भलतच निराळं काढलं. आम्हीच ते कृत्य केल्याचे म्हणू लागले. आम्हाला अटक करण्याची भाषा बोलू लागले. आणि कळस म्हणजे तिच्या नवऱ्याला अटकेच सोडा ती बाई सुद्धा आम्हालाच शिव्या देऊ लागली. नवऱ्याची चूक नाही म्हणाली. गाव अब्रू जाईल म्हणून प्रकरण दाबण्याचा मार्गात मग्न.
प्रश्न : मग तुम्ही काय केले
अरुणराव : त्या वेळच्या पोलीस अधीक्षक श्रीमती मीरा बोरवलीकर होत्या (औरंगाबाद) हिंमतबाज आणि तडफदार. त्यांना फोन करून परिस्थिती सांगितली. त्यांनी स्वतःहून आमच्या विनंती तक्रार अर्जानुसार त्या पीएसआयला गुन्हा नोंदवायला भाग पाडले. अखेर त्या माणसाला अटक करण्यात आली. असे कितीतरी प्रसंग आहे.
प्रश्न : दलित कार्यकर्ता म्हणून तुमच्या कामाची अजून माहिती?
अरुणराव : उपेक्षित,दलित, मागास, व्यसनाधीन व्यक्ती परितक्ता कौटुंबिक वाद कलह, अस्पृश्यांना पाणी भरून न देणे (सार्वजनिक ठिकाणी), नंदी वाल्यांना मदत, शैक्षणिक, सामाजिक प्रश्न असे कितीतरी मोठा कामाचा पसारा त्यातले गुंतागुंतीचे प्रश्न ते सोडविताना घडणारी रामायणे किती आणि काय सांगावे, यावर स्वतंत्र ग्रंथ तयार होईल. कुटुंबनियोजन, अंधश्रद्धा, जुनाट परंपरा, व्यसनाधीनता हे तर आज कळीचे प्रश्न आहेत. या सर्वावर उपाय मी सांगत असतो डोळसपणे शिक्षण घेतलं ज्ञान मिळवा तर हे प्रश्न संपुष्टात येतील. आज मी सगळ्या जाती-धर्माच्या माणसांना सोबत घेऊन एकमेकांच्या विचार-विनिमयातून हा जनसेवेचा वारसा जपत आहे.