साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 सप्टेंबर 2020
लॉकडाऊनच्या काळात अनेकांना नकारात्मकतेने ग्रासले मात्र ज्यांच्याकडे छंद आहेत, ज्यांच्या हाताशी कला आहे अशा कलाकारांना या काळातही स्वस्थ बसता आले नाही. त्याचेच उदाहरण म्हणजे मितेश ताके. सुरूवातीपासूनच चित्रपट निर्मिती प्रक्रिया समजावून घेण्याचा छंद असलेल्या ताके यांनी प्रचंड अभ्यभासाअंती लघुपट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला.
अमेरिकेतील फस्ट फ्रायडे फिल्मस् डॉट कॉम या वेबसाईटवर सात ऑगस्ट २०२० रोजी दुर्गाज लॉकडाऊन प्रसारित करण्यात आला व नंतर प्रेक्षकांनी दिग्दर्शक मितेश ताके यांची ऑनलाईन मुलाखत घेतली. या लघुपटाची दखल घेत अमेरिकेतील डेन्व्हर विद्यापीठाच्या ५५ वर्षे जुन्या ‘डेन्व्हर क्वार्टरली' या नियतकालिकाच्या पुढील अंकात स्थान देण्यात येणार आहे. अहमदनगर आकाशवाणीने दिग्दर्शक मितेश ताके यांची दीर्घ मुलाखत घेऊन १६ ऑगस्ट २०२० प्रसारित केली.
या प्रायोगिक लघुपटाची दखल अनेक चित्रपट अभ्यासकांनी घेतली असून जेष्ठ जागतिक चित्रपट अभ्यासक व समीक्षक डॉ. अनमोल कोठाडिया यांनी या लघुपटातील फ्रेम्स व रूपके यांचे विशेष कौतुक करत, यावर एका बड्या वृत्तपत्राच्या पुरवणीत लेख लिहिला आहे. पुणे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटच्या एका उपक्रमाचे अभ्यासक्रम संचालक असलेल्या रितेश ताकसांडे यांनी त्यांच्या मोबाईल चित्रपट निर्मितीच्या कोर्समध्ये या चित्रपटाचा समावेश केला आहे. तर पोर्तुगाल येथील चित्रपट दिग्दर्शक ब्रुनो रेसेंदे यांनी या लघुपटाला पाच तारांकणे देऊन गौरवले आहे. या यशाची दखल घेऊन भारतीय महाक्रांती चित्रपट सेना या संघटनेने मितेश ताके यांना उत्कृष्ठ फिल्म मेकर हा साल २०२० चा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव केला.
या लघुपटाने आतापर्यंत सर्वोत्तम लघुपट, उत्कृष्ट दिग्दर्शक, परीक्षकांची विशेष पसंती, उत्कृष्ट पटकथा, सर्वोत्तम छायाचित्रण, उत्कृष्ट संकलन, सर्वोत्तम संकल्पना, उल्लेखनीय लघुपट असे विविध तेहतीस पुरस्कार पटकावले असून अनेक नामांकने, अंतिम फेरी व उपांत्य फेरी पर्यंत मजल मारली आहे. दिग्दर्शक मितेश ताके तीन वर्षांपासून चित्रपट दिग्दर्शनाचा अभ्यास करत असून हा त्यांचा पहिलाच लघुपट आहे. पहिल्याच प्रयत्नात देश विदेशात त्यांची दखल घेतली गेली आहे.
तीस रूपये खर्च
साधा आठ मेगा पिक्सल कॅमेरा असलेला स्मार्टफोन, टाकाऊ वस्तूंपासून बनविलेला ट्रायपॉड अशा अपुऱ्या साधनांद्वारे सुमारे महिनाभर या लघुपटाचे चित्रीकरण ताके यांच्या घरातच सुरू होते. यासाठी अवघे ३० रूपये खर्च आला. साधने नसताना केवळ संकल्पना, मांडणी, चित्रपटीय भाषा याद्वारे आपले कसब दाखवून ताके यांनी सातासमुद्रापार आपली मजल मारली.
महोत्सवाची सुरूवात ‘दुर्गाज...’ने
ताके यांच्या लघुपट निवड भारताव्यतिरिक्त अमेरिका, इंग्लंड, जर्मनी, कॅनडा, स्वीडन, इटली, पोर्तुगाल, स्लोव्होकिया, तुर्की, बांग्लादेश, चेझ रिपब्लिक, अर्जेंटिना, स्पेन, भूतान, केनिया, कांगो, सिंगापूर, जॉर्जिया, मलेशिया, फ्रांस, पोलंड,ऑस्ट्रेलिया आदी देशांमधील चित्रपट महोत्सवांमध्ये निवडला गेला आहे. विशेष बाब म्हणजे अमेरिकेतील सात प्रतिष्ठित दक्षिण आशियाई चित्रपट महोत्सव एकत्र येऊन यावर्षी ‘कोअलेशन ऑफ साऊथ एशियन फिल्म फेस्टिवल‘ या नावाने यावर्षी झालेल्या संयुक्त ऑनलाईन महा महोत्सवा सुरूवात ‘दुर्गाज् लोकडाऊन’ ने झाली. याप्रसंगी संयोजकांनी व जगभरच्या प्रेक्षकांनी मितेश ताके यांच्याशी ऑनलाईन संवाद साधला .