पोळा , माझ्या मनातला... ---डॉ. वंदनाताई मुरकुटे

पोळा , माझ्या मनातला...--डॉ. वंदनाताई मुरकुटे

          काल पोळा झाला. ह्या वर्षी माझ्या लेकीने सोनुने स्वतःच्या हाताने खिल्लारी बैलांची जोडी बनवली. मी तीच जोडी पूजेत ठेवली. पूजा करताना लेकीने केलेली कलाकृती बघताना मन कातर झालं. पूजेतील बैलासमोर वैरण सजवताना खाटीवर सतरंजी अंथरलेली आणि बाजरीची घातलेली वैरण आठवली. माझी पिढी ही एकार्थाने भाग्यवान,स्वतः स्थितंतरे अनुभवलेली पिढी किंवा असेही म्हणता येईल आमच्या पिढीने नवतेला सामोरे जाण्याचे धाडस नेहमी केले. मी हे ऐवढ या साठी म्हणतेय,आजचा पोळा मला तीस वर्षे मागे घेऊन गेला. माझ्या लहानपणी आमच्या घरी पांढऱ्या रंगाच्या खिल्लारी बैलांची जोडी होती. आमचे शेत घरापासून पाच सात किलो मीटर लांब होते. आम्ही गावात,मालेगावात राजे बहाददूरांच्या वाड्याजवळ राहत होतो. सधन शेतकरी कुटुंबात असते. तीसर्व सुबत्ता आमच्या घरी नांदत होती.एक मज्जा सांगू? घरातील खोल्यांची नावे,ओसरी म्हणजे बैठक हॉल,स्वयांपकघर देव खोली,धान्य खोली ,मोरी,माडीच घर,गच्ची अस अवाढव्य पसरलेलं मोठ्या मनाच घर होत माझं.आम्ही भावंडात दोघे भाऊ अन मी. पोळ्याच्या दिवशी आमच्या गल्लीत सर्वांच्या घरापुढे बैल असायचे.शेतात काम करणारा आमचा सालदार एका जोडीदारांसोबत डोक्यावरच उन ढळल्यावर बैलजोडी घेऊन सणांसाठी यायचा. नेहमीच शेतात राहणारे बैल पोळ्याच्या दिवशी मात्र दारासमोरच सजवले जायचे. शेजारांच्या दारासमोरही त्यांचे बैल उभे राहायचे.आम्हा भावंडानंतर जगातील सर्वात मोठी श्रीमंती आमच्या दारात उभी आहे ह्या तोज्यात वागायचो.

          शेतातला सालदार जो पर्यंत बैल घेऊन घरी पोहचत तोपर्यंत आमची नजर वृंदावन चौकात त्यांच्या वाटेकडे लागलेली असायची. तो जोवर येत नाही तोवर दहा वेळेस घरात जाऊन विचारायचो," ओ काका,जगणभाऊ अजून कसा आला नाही?" काका शांततेने म्हणायचे," येईलच इतक्यात.” तो येत नाही म्हणून आमच्या जीवाची घालमेल सुरु व्हायची. एकदा का बैल आले,ते खुट्यांला बांधून जगन भाऊ बाजारातजायचा. बैलांसाठी कसा, रंग, झिरमाळ्या, फुगे आणायला. माझे धाकटे भाऊ मागे लागायचे,आम्ही पण जगन भाऊ सोबत बाजारात जाणार, पण काका त्यांना पाठवत नसायचे.बाजारात गर्दी आहे, तू हरवून जाशील, हे घे पंचवीस पैसे,समोरून चोकलेट आण, आपल्या बैलाकडे लक्ष दे, म्हणून सांगायचे. आईची सकाळ पासून लगबग सुरु असायची.बैलांच्या शिंगाच्या टोकाला घातले जाणारे पितळी घुगरुंचे कोण शाम्या घासून स्वच्छ करायची.आदल्या दिवशीच चांभार दादांकडून नरम चांबडयाचा घुगराचा जड- मोठा पट्टा शिवून आणलेला असायचा.तो धान्य खोलीत खुंटीला टांगलेला असायचा. आम्ही तिकडे गेलो की मुददाम तो हालवायचो मग तो वाजायचा,त्याचा आवाज ऐकून आजी चिडायची, अंगावर पट्टा पडेल म्हणून ओरडायच्या, पण आम्ही बहाददूर तिचे कुठ ऐकतोय. गल्लीतील इतरांच्या घरापुढे बैल सजवायला सुरुवात व्हायची जर आमचे बैल आले नसले म्हणून आम्ही आत -बाहेर करत राहायचो. एव्हाना आईने मांडे करण्यासाठी चुलीवर पुरणाचे आधण चढवलेले असायचे. वडील ओसरीतील पलंगावर बसलेले असायचे. गावातल्या आत्या,त्यांच्या मुलीही सणासाठी यायच्या. त्यांच्याकडे बैल नसायचे,त्या नेहमी सणाला आमच्याकडे यायच्या. आत्या आल्या की आई वडिलांना खूप आनंद व्हायचा. 'आक्का आली म्हणून दारापर्यंत स्वागताला जायचे. त्यांच्या मुली आल्या म्हणून आम्हीही खुश व्हायचो. खूप खेळायचो ,मज्जा करायचो. आत्या ओसरीत वडिलांसोबत गप्प्पा मारायच्या. आई स्वंयपाक घरात आम्ही छोटी मंडळी अंगणात. एकदा का बैल सजवायला सुरुवात झाली म्हणजे आमच्या अंगात उत्साह संचारायचा. आम्ही भावंड पायरीवर बसून गंमत बघायचो. जगन भाऊच्या हाताखाली छोटी छोटी कामे करायचो. तो म्हणाला, "रंग कालवयाला वाटी लागते", कि तिघेच्या तिघे पळायचो,एक वाटी स्वयंपाक घरातून आणायला! सर्वात आधी बैलाच्या नाकात घातलेली वेसण बदलली जायची. नवीन वेसण अडकली जायची. मला बैलाला वेसण बदलताना बघणे कधीच आवडले नाही. एरवी शांत उभा राहणारा, हवे तसे सजवू देणारा बैल वेसण बदलवताना मात्र डोके जोरजोरात हालवायचा. जोडीदाराच्या सहाय्याने मोठ्या शिथापिने वेसण घातलं जायचं. कधी कधी बैलाच्या डोळ्यात पाणी यायचं. त्यानंतर वेळ यायची शिंगाना रंग देण्याची. त्या रंगाच्या डबीला तो हिंगोळीची डबी म्हणायचा. तासून खरडून घेतलेले शिंगे लाल रंगाने रंगविले जायचे. तो डबीत बोट बुडवून रंग शिंगाना माखायचा. त्याच्या बोटाच्या हालचालीकडे आमचे डोळे असायचे. बोट डबीतून उचलताना रंगाचा टिपका बैलाच्या डोक्यावर पडायचा, आम्ही लगेच ओरडायचो, "ए, जगन भाऊ डोक्यावर रंगाचा टिपका पडला ना! डाग दिसेल ना,आपल्या बैलावर,सगळ्यात भारी आपलाच बैल सजवायचा आहे," रंग देउन झाल्यावर त्यावर तो झीरमाळची टकावायचा. शेजारांच्या बैलाला कोणत्या रंगाची झीरमाळ चीटकवली ते बघून यायचो आणि त्याला सांगायचो आपला रंग भारी आहे. बैलांच्या रंगावर वेगवेगळ्या आकाराच्या गोलाचे म्हणजे ताटली आणि वाटीचे शिक्के मारले जायचे मोठ्या ताटात रंगाचे पाणी करायचो. त्यात वाटीची कडा बुडवून बैलांच्या अंगावर शिक्के मारायचो. त्यात बराच वेळ जायचा. तोवर भीमदादा न्हावी यायचा. बैलाच्या शेपटीला असणाऱ्या केसांना आकार देण्यासाठी. गल्लीतील सर्वांचे आमंत्रण त्याला असायचे.ज्यांचा बैल जास्त सजवून झाला, त्याच्याकडे भीमदादा अगोदर जायचा. मला आठवते तो एक कलंदर माणूस होता. आमच्या गल्लीतील पाच- सहा बैलजोड्या असायच्या त्या सर्व बैलांचे वेगवेगळ्या आकारात शेपटीवरील केस कापून द्यायचा. ती झुपकेदार शेपटी छान दिसायची. तोच न्हावीदादा बैलाच्या शिंगाच्या वरच्या टोकाच्या बाजूला घुंगरू टोप-शाम्या अडकवण्यासाठी बारीकस शिद्र करून द्यायचा. आदल्या दिवशी घासून लख्ख केलेले पितळाचे शिंगटोप-शाम्या,माथुट,म्होरकी,गेज चढवले जायचे. बैलाच्या पायात बाजारातून मिळणाऱ्या लाल- केशरी रंगाच्या माळा लावल्या जायच्या. कुणी कुणी शिंगाना बाशिंग बांधायचे तर कुणी फुगे लटकवायचे.कुणी दोन शिंगाना मिळवून एक माळ बांधायचे तर कुणी गजरा.त्या नंतर बैलाच्या गळ्यात मोठी जड घुंगराची माळ-पट्टा बांधला जायचा.ईजारीला अडकवण्यासाठी जसा पट्टा लावतात त्याच पद्धतीने बैलाच्या गळ्याच्या मापाने तो मोठे घुंगरू असलेला चाम्बडी पट्टा अडकवला जायचा. दोन्ही बैलाची तयारी होत होत सायंकाळचे पाच वाजायचे.जवळ जवळ सर्वांचेच बैल सजवून व्हायचे. आमच्यातल्या उत्साहाला उधाण आलेले असायचे. गल्लीतील खूप मुले तयारी बघण्यासाठी उभी असायची. इतर दिवशी खेळताना त्रास देणारी मुले गंमत बघताना उभी राहाली की त्यांना हकलायचो. कारण माहिती होते कि अशी सुवर्ण संधी येण्यासाठी पुढील पोळ्या पर्यंत थांबावे लागेल.कुरडई-पापड तळून झालेले असायचे. चुलीजवळ जाऊन तळून ठेवलेल्या कुरडईच्या टोपलिवर डल्ला मारण्याचा इरादा असायचा. हात लावल्याबरोबर आई म्हणायची, "आधी बैलांना,देवाला नैवद्य दाखवायचा मग तुम्ही खा.” मग आम्हीही पुष्टी जोडायचो,काका म्हटले, "कुरडई पापड खाल्ले तर ते देवाला चालत, नैवद्यात ते उष्ठे होत नाही." पुन्हा अंगणात जाऊन उभे असायचो. वडिलांचाही चक्कर अंगणात व्हायचा. पायरीवर बसून ते ही मार्गदर्शक करायचे. आम्हीही त्याच्या जवळ बसायचो. मी जरा लहानपणापासून चिकित्सक होते. एकदा मी वडिलांना विचारले, "बैलांच्या गळ्यात घुंगर माळ का घालतात? दरवर्षी चाम्बडी पट्टा नवा करावा लागतो मग आपण फक्त पोळ्याच्या दिवसा साठीच फक्त घातला तरी चालेल ना? त्यावर ते म्हणाले, 'हे दिवस पावसाळ्याचे आहेत. यात साप,विंचू, जनावरांची भीती असते. ते बैलाजवळ गेले आणि डसले तर अपघात घडू शकतो. रात्री गोठ्यात खुट्यांला बैल बांधलेला असतो आणि त्यांच्या समोर नाग आला तर बैल जोरजोरात डोके हलवतो. गळ्यातील घुंगराच्या आवाजाने जनावर लांब जातात. घुंगराच्या एवढा आवाज का येतो हे बघायला बैलाचा मालकही तेथे चक्कर मारतो. म्हणून घुंगर माळ बैलासाठी आवश्यक आहे.

             सजावट पूर्ण झाली म्हणजे कासरा बदलला जायचा.(कासरा म्हणजे चर्हाट-दोर) दोन्ही बैलांच्या वेसणीला बांधला जायचा. जनू आत्ताही माझ्या डोळ्यासमोर ते पांढरे शुभ्र बैल जसेच्या तसे उभे आहेत. बैलाचे डोळे काजळ भरल्या सारखे काळेभोर दिसायचे. लहानपणी मला वाटायच, आज पोळ्या निमित आपण बैल सजवतो. रंगरंगोटी करतो. हे सर्व शंकरजी स्वर्गातून पाहतात. बैल तर त्यांचेच वाहन आहे म्हणून ते स्वतः गुप्त पद्धतीने येतात आणि बैलांच्या डोळ्यात काजळ भरतात,म्हणून ते डोळे सुंदर दिसतात. एव्हना आईचाही पुरणाचा स्वयंपाक आटोपलेला असायचा. गल्लीतील सर्वांचे बैल सजवून झालेले असायचे. आमच्या पल्याड हिरेगल्ली होती. तिथेही आमच्या गल्लीसारखे घरोघरी बैल होते. पाठीमागे तेलीगल्ली होती तिथे काही ठिकाणी बैलजोड्या असायच्या.

         वेशीवरच्या मारुतीला म्हणजे चंदनपुरी गेटच्या मारुती मंदिरात आधी बैलांना दर्शनाला नेले जायचे. त्या नंतर किल्ल्यातील हनुमान मंदिरात जाण्याचा विचार रिवाज होता. हिरेगल्ली, बजरंगवाडीतील बैल आमच्या गल्लीतील आणले जायचे. आमच्या गल्लीतील संजू- राजू परदेशीकडे बैलावर टाकायची नक्षीदार झूल होती. सर्वात उठून दिसणारी त्यांची बैलजोडी असायची. ते मिरवणुकीला ढोल लावायचे. तृतीयपंथीना नाचायला बोलावयाचे, पुढे ढोल मागे तृतीयपंथी त्यानंतर बैल अशी दर्शनासाठी मिरवणूक निघायची. आम्ही भावंडही किल्याच्या हनुमानाला दर्शनाला जायचो. कधी कधी श्रावणसरी बरसायच्या. आमच्या हातात नारळाची कापडी पिशवी.जगनभाऊच्या हातात बैलजोडी आणि डोक्यात टोपी. बैलाची मिरवणूक मोठ्या तोर्यात निघायची. चौका चौकात ढोलवाला थांबायचा. बैलाचे मालक मालेगावचे प्रसिद्ध नाच 'तीनपावली' नाचायचे. परत वाजत गाजत लवाजमा पुढे जायचा. रस्ताने जाताना भावंड त्यांच्या हातात कासरा घ्यायचे. रस्ता नेहमीचा असायचा पण घरातून डोकावून कोण कोण पाहतो आहे हे तिरक्या नजरेने पहिले जायचे. मोठा कौतुक वाटायचे. रस्ताने बैल कधी कधी पळायचे. तेव्हा त्यांच्या वेगळे पळाव लागायचं. किल्ला मारुतीला पोहचल्यावर मंदिराला प्रदिक्षणा मारून परतीचा प्रवास सुरु व्हायचा. कुणाचा बैल जर मारका तर त्याच्या पासून सावध राहावे लागे. गड्यांच्या ते अंगवळणी पडले होते . घरी परतल्यावर अंगण स्वच्छ असे. सजवताना इतरस्त पडलेल शेण आवरलेले असे. पायरीवर खाट ठेवलेली असे. धान्यखोलीमध्ये मोठी लोखंडी कोठी होती. तिच्या खालच्या बाजूला खिडकी होती. त्यातून आई पायली- दोन पायली बाजरी काढत असे. खाटीवर सतरंजी अंथरूण त्यावर बाजरी टाकूण ठेवत. बैल आले की लगेचच बाजरी खायला लागत. वरच्या पायरीवर उभे राहून आई ओवाळत. एरवी प्रत्येक सणाला मागे असणारी आई,बैल पूजेला अग्रस्थानी असायची. तिचाच तर बैलाशी वर्षभर संबध यायचा. ती शेतात गेल्यावर त्यांच्या पुढे वैरणीची पेंढी टाकायची. त्याच्या पाठीवरून हात फिरवायची. पूजेच्या ताटात लोखंडी पत्र्याचा दिवा असयाचा तो फक्त पोळ्याचा वापरला जायचा. दीप पूजनाच्या दिवशी ती, तो दिवा आवर्जून घासत असे, पोळ्याला पूजनाचे वेळी ताटात हाच दिवा असायाचा. सोन्याची अंगठी, तांब्याभरपाणी, हळदी कुंकू, फुले, नारळ आदींनी पूजेचे ताट गच्च भरलेले असे. बैलाच्या पायावर पाणी घालयाची,गंध-अक्षदा टाकून पूजा करायची. जगन भाऊचे औक्षण करायची. शेवटी एक आख्खा मांडा स्वतः च्या हाताने बैलांना चारायची. त्यांना नमस्कार करायची,मनोमन म्हणायची, "तुम्ही मला साथ देत आहात,म्हणून माझा संसार चांगला चालू आहे. अशीच अखंड साथ द्या." त्यानंतर आत्या,मग आम्ही बहिणी पूजा करायचो.

               बैल सजवते वेळी शेजारच्या बैलाच्याकडे रागे रागे बघणारे आम्ही वडिलांच्या सांगण्याकडून त्यांच्या बैलांच्या पूजा करण्यासाठी आमंत्रण द्यायला जायचो. आमचेही बैल तेथे न्यायचो. हिरेगल्लीतून मामांचेही बैल पूजेला येत असत. या सोहळ्यानंतर जेवणाच्या पंक्ती उठायच्या. सालदार मंडळी आधी जेवायची, त्यांना शेतात परतायचे असायचे. आम्ही लहानगे तर तळणावर आणि रशी-भातावरच ताव मारायचो. मोठ्यांचा गप्पा ऐकता ऐकता ओसरीतल्या पलंगावर कधी झोप लागयाची हे कळायचंही नाही.  यथावकाश आम्ही भावंड मोठी झालोत. वडील वारले. भावांचे शिक्षण झाले. आता ते शेती करू लागले. माझ लग्न होऊन मी श्रीरामपूरला आले. बराच काळ लोटला. शेतीच्या जागेवर प्लॉट घेणार होते. मी तर सासरी होते. मला माझी सोनू तान्ही होती. तिकडे मालेगावला गल्लीतील सर्वांचे बैलजोडीची जागा इतर यंत्रांनी घेतली होती. फक्त माझ्या भावाकडेच खिल्लारी बैलजोडी शिल्लक राहिली होती. स्थित्यतराची ही कातरवेळ मोठी जीवघेणी असते. त्या वर्षीच्या पोळ्याच्या आधी दोन दिवस माझ्या श्रीरामपुरातील घरचा फोन खणाणला, पलीकडे आई होती, ती म्हणाली, "बाई, परवा पोळा आहे, तू येते का मालेगावला. हा शेवटचाच पोळा आहे आपल्या बैलांचा. दिवाळीपर्यंत बैलजोडी विकावी लागेल. आत्या पण येणार नाहीत. तू ये,सोनुला पोळा दाखव." माझ मन कातरं झाल. क्षणभर डोळ्यात पाणी आल. वडील बैल विकत आणायला निघाले की आई म्हणायची, "खिल्लारी ढवळ्या रंगाचा बैल आणा." पूर्वीचा बैल म्हातारा झाला की खुट्यांवर ती चारा खाऊ घाला, म्हणून गड्यांना सांगायची. सर्व क्षणभर डोळ्यांसमोर तराळलं. आईने परत विचारलं, "येते ना?" मला द्वारकेच्या कृष्णाची आठवण झाली. तो मथूरेतून द्वारकेला गेला.माघारी मथुरेला, त्याच्या राधा-गोपिकांना भेटायला माघारी परतला नाही. पहिल्यांदा मी हे वाचाल तर मला उमजल नव्हत,कृष्णाचं वागण.मला पण मालेगावला पोळ्याला जाऊन माझ्या मनातील बालपणीच्या अविस्मरणीय स्मृती पुसायच्या नव्हत्या. मग मी आईला काळजावर दगड ठेवून 'नाही' म्हटलं. त्यानंतर कित्येक पोळे गेले. आई चांगलीच सावरली आणि मी ही. पण आज जेव्हा माझ्या लेकीने स्वतः मातीचे बैल बनवले,मला आनंद झाला. जणू शेतातून सजवण्यासाठी बैल घरी आल्या सारखा! पण दुसऱ्या क्षणी पोळ्याच्या रात्रीसारखे मन कृष्णमय झाले.

                         ---डॉ. वंदनाताई मुरकुटे,
                             श्रीरामपूर.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post