साईकिरण टाइम्स ब्युरो, 21 ऑगस्ट 2020
अहमदनगर | अहमदनगर जिल्ह्यात बायोडिझेल अवैधरित्या विक्री करून शासनाची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे तसेच विक्री संबंधित सर्व परवाने तपासणी करण्याची मागणी, छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष राजाराम शिंदे व जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना शुक्रवारी (दि. 21)दिले.
जिल्हा प्रशासनास दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्रभर बायोडिझेल विक्री घोटाळे समोर येत असताना नाशिक, नागपूर, धुळे अशा अनेक जिल्हयात बायोडिझेल पंप चालकांचे घोटाळे उघडकीस आले आहेत. काही पंप चालकांनी रात्रीतून पंप बंद करून पसार झाल्याचे वृत्त आहे. नगर जिल्ह्यात देखील शासनाची फसवणूक करून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या बायोडिझेल विक्री होत असल्याचा आरोप छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने करण्यात आला आहे.
मिश्रीत डिझेल विक्री करून सध्या जिल्ह्यात शासनाची व ग्राहकांची फावणूक चालू आहे. ज्या कंपनीचे बायोडिझेल आहे त्या कंपनीकडे केंद्र शासनाची परवानगी, बायोपंप डिझेल धारकाकडे ते ज्या कंपनीकडून डिझेल घेतात त्यांना डिझेल विक्रीचा परवाना, पंप डिलरकडे जिल्हाधिकारी यांचे ना हरकत प्रमाणपत्र, मंजुरी नकाशा, वजन, माप अधिकाऱ्याकडून पंप स्टपिंग, जिल्हाधिकारी यांची परवानगी, डिझेलची नियमाप्रमाणे डेन्सिटी, पंपाची कमर्शियल जागा तसेच बायोडिझेल विक्रीचे सर्व परवाने तपासावे, संबंधित पंपांचे सॅम्पल लॅबमध्ये टेस्टिंग करावे, पुरवठा अधिकारी यांच्याकडून अवैधरित्या मिश्रीत बायोडिझेल विक्री व शासनाची फसवणूक करणाऱ्या पंप चालकांवर कारवाई करण्यात यावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नियमांचे पालन करून उपोषण करण्याचा इशारा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.