साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 जुलै 2020
श्रीरामपूर | देशातील केंद्रीय कामगार संघटना यांनी केलेल्या आवाहनानुसार मोदी सरकारच्या कामगार-कष्टकरी-शेतकरी विरोधी धोरण, वाढती बेरोजगारी, महागाई विरोधात शुक्रवारी दि. ३ जून २०२० रोजी देशभर असहकार आंदोलन करत फिजिकल डीस्टन्सिंग चे पालन करून महाराष्ट्र राज्य सर्व श्रमिक महासंघाचे (संलग्न एक्टू) वतीने जिल्हाभरात श्रीरामपूर, नेवासे, राहाता, श्रीगोंदा, राहुरी, पारनेर आदि ठिकाणी निषेध करण्यात आल्याची माहिती श्रमिक महासंघाचे राज्य अध्यक्ष कॉ. बाळासाहेब सुरुडे यांनी दिली.
यावेळी मा. पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना कामगार कायद्यातील विपरीत बदल रद्द करा, अंगणवाडी कर्मचाऱ्याना वेतनश्रेणी व पेन्शन द्या, आयकर लागू नसलेल्या कुटुंबाना दहा हजाराची मदत करा, कंत्राटी सफाई कामगारांना कायम करा तसेच किमान वेतन द्या यासह विविध मागण्याचे निवेदने तहसीलदार प्रशांत पाटील व श्रीमती लिफ्टे प्रकल्प अधिकारी बाल विकास, श्रीरामपूर यांच्या मार्फतीने देण्यात आले.
यावेळी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कॉ. बाळासाहेब सुरुडे यांनी सांगितले कि गेल्या ६ वर्षात मोदी सरकारने कामगार कायद्यात कामगारांवर गुलामगिरी लादणारे बदल केले. मागील अनेक वर्षात रक्ताचे पाणी करून कामगारांनी मिळवलेल्या ४४ कायद्यांचे ४ श्रम संहितेमध्ये रुपांतर केले. त्यामुळे कामगारांचे अतोनात नुकसान होणार आहे. करोना विषाणूचे निमित्त वापरुन यूपी, गुजरात, मध्य प्रदेशमध्ये सरकारने तीन वर्षापर्यंत कामगार संरक्षण कायदे रद्द करण्याचे अध्यादेश जारी करून भयंकर निर्णय घेतले आहेत. 8 तासापेक्षा जास्त तासांसाठी जास्त पैसे न देता दिवसाचे 12 तास काम अनिवार्य केले आहे. तसेच सरकारी कंपन्या बड्या भांडवलदाराना कवडीमोल भावाने विकण्याचेही कार्यक्रम सुरु आहे. केद्र सरकारने अगोदर कोरोनाकडे दुर्लक्ष केले व नंतर अचानक लॉकडाऊन जाहिर केले. यामुळे अनेकांचे रोजगार गेले, स्थलांतरित मजुरांचे मजुरांचे प्रचंड हाल झाले, कोरोना महामारीत स्वतःचा जीव धोक्यात घालून फ्रंटलाईनला राहत काम करणारे अंगणवाडी कर्मचारी, कंत्राटी सफाई कर्मचारी, आशा वर्कर यांच्याही मुलभूत प्रश्नांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. केंद्र सरकार राबवीत असलेले कामगार विरोधी बदल मागे घेई पर्यंत व मानधनी-कंत्राटी कामगारांना न्याय देईपर्यंत हा संघर्ष सुरु राहणार असल्याचे कॉ. सुरुडे यांनी सांगितले.
सदर असहकार आंदोलनात कॉ. जीवन सुरुडे, कॉ. श्रीकृष्ण बडाख, राहुल दाभाडे, इंदुबाई दुशिंग, शावेरी बोरगे, आशा ब्राम्हणे, अलका गायकवाड, लीना केदारे ज्योती लबडे, अनिता होले, योगिता गोरे, उषा वाणे, चंद्रकात दळवी, राकेश झिंगरे, दिनेश तुसंबड, दिपक शेलार, अमोल मरसाले आदि उपस्थित होते.