साईकिरण टाइम्स ब्युरो, 3 जुलै 2020
अहमदनगर | श्रीरामपूर शहरात गुरुवारी (दि. 2) एकाच दिवशी 5 कोरोना बाधित आढळले असताना श्रीरामपूर नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत गुरुवारी दुपारी 12 वाजेच्या दरम्यान प्रियदर्शनी मंगल कार्यालयात दारूच्या पार्ट्या करत आहेत. जनतेच्या पैशातून लठ्ठ वेतन घेणाऱ्या, शहरातील नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सोडून अय्याशी करणाऱ्या अशा मुजोर, बेजबाबदार दोषी कर्मचाऱ्यांवर त्वरित कडक कारवाई करावी, अशी मागणी राजेश बोरुडे यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे केली आहे.
शहरात कोरोनाचा उद्रेक वाढायला सुरवात झाली आहे. श्रीरामपूरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरवासियांमध्ये भीती निर्माण झाली आहे. आशा वेळी शहरात आरोग्य विभागाकडून विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे. आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना शासनाकडून म्हणजेच जनतेच्या पैशातून लठ्ठ वेतन दिले जाते. आरोग्य विभागाचे कर्मचारी कार्यालयीन वेळेत शहरातील नागरिकांचे आरोग्य वाऱ्यावर सोडून दारूच्या पार्ट्या करत असल्याने श्रीरामपूर नगरपालिका अवघ्या महाराष्ट्रभर बदनाम झाली असल्याचे बोरुडे यांनी म्हंटले आहे.
शहरात दिवसागणिक कोरोना बाधितांची संख्या वाढतच आहे. प्रशासकीय यंत्रणेबरोबरच शहरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सुरक्षेची जबाबदारी नगरपालिका आरोग्य विभागावर असताना पालिकेच्याच प्रियदर्शनी मंगल कार्यालयात कर्मचाऱ्यांकडून दारूच्या पार्टी रंगत आहेत. एका वरिष्ठ कर्मचाऱ्याने नगरपालिकेचे ओळखपत्रही घातले होते. आशा मुजोर कर्मचाऱ्यांमुळे नगरपालिका बदनाम होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकारची चौकशी करून दोषींवर त्वरित कठोर कारवाई करावी ; अन्यथा, बेजबाबदार दोषी आरोग्य कर्मचाऱ्यांविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.