साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 मे 2020
श्रीरामपूर | जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांना नियमित कामांचा प्रचंड बोजा असतानाही कोवीड-१९ रूग्णांच्या देखभालीची जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडत आहेत. मात्र त्यांना सुरक्षिततेच्या बाबतीत कुठलीही उपकरणे जिल्हा परिषदेकडून पुरविली जात नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शिवाय त्यांना ८ तास काम करावे लागते. त्यांमुळे त्यांची विलीगीकरण कक्षातील नेमणूक तातडीने रद्द करण्याची मागणी जिल्हा अंगणवाडी सेविका मदतनीस कर्मचारी युनियनचे सरचिटणीस कॉ. राजेंद्र बावके यांनी दिला आहे.
कॉ. बावके यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील केल्यानंतर राज्याच्या विविध शहरातून ग्रामीण भागात लोक वास्तव्यास येत आहेत. त्यातील अनेक जण मुंबई, नाशिक, पुणे, औरंगाबाद अशा रेडझोन भागातून येत असल्याने चिंतेचे कारण आहे. अशा लोकांना ग्रामीण यंत्रणा शाळेत किंवा इतर ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवत आहे. त्यांच्या देखभालीसाठी अंगणवाडी सेविकांना नेमण्यात येते. प्रारंभी या सेविकांना १२ तासांची व रात्रीची नेमणूक देण्यात आली. त्याविरोधात संघटनेने आवाज उठविल्यानंतर रात्रीची नेमणूक व कामांचे तास कमी करून दिवसा व ८ तास नेमणूक देण्यात आली. मात्र त्यांना कुठलीची सुरक्षिततेची उपकरणे पुरविली जात नाहीत. वास्तविक पाहता या अंगणवाडी सेविकांचा संपर्क थेट विलग करणाऱ्या व्यक्तींशी येतो. शिवाय जिल्ह्यात विलग करण्यात आलेल्या अनेकांना संशयीत म्हणून जिल्हा रूग्णालयातही हलविले. सुदैवाने त्यापैकी अद्याप एकही पॉझीटिव्ह आढळला नाही. मात्र तसे झाल्यास सुरक्षिततेच्या उपकरणांअभावी अंगणवाडी सेविकांचे आरोग्य धोक्यात येणार आहे.
अंगणवाडी सेविकांना या जबाबदारीव्यतिरिक्त स्थलांतरीत लोकांचे सर्व्हेक्षण करणे, ऑनलाईन माहिती भरणे, पोषण आहार वाटप, व्हॉट्स ॲप द्वारे अंगणवाडीतील लाभार्थ्यांच्या पालकांचा ग्रुप करून त्याद्वारे विविध उपक्रम राबविणे, गरोदर मातेशी संपर्क करून त्यांची देखभाल करणे, कुपोषित बालकांसंबंधीची कामे, पंधरवाड्यातील प्रसुती माता संपर्क, मोबाईलवर माहिती संकलीत करून भरणे, कोरोना, सारी सर्व्हेक्षण यासह विविध कामे पार पाडावी लागतात. ही सर्व कामे असताना त्यांना विलीगीकरण कक्षाचीही जबाबदारी दिली आहे. अशा परिस्थितीत त्यांना कोवीड १९ चा प्रादूर्भाव झाल्यान त्यांच्यापासून इतर अनेकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणे अत्यावशक आहे.
असे असतानाही ग्रामपंचायत स्तरावरून कुठलीही उपकरणे पुरवणे तर दूर उलट तुम्ही तुमच्या खर्चाने घ्या असे उद्धटपणे सांगण्यात येते. आधीच अतिशय तुटपुंज्या मानधनावर अंगणवाडी कर्मचारी काम करीत असताना त्यांना असे सांगणे बेकायदेशीर आहे. दरम्यान त्यांची जीव धोक्यात घालणे हा ग्रामपंचायत प्रशासनाकडून होत असलेला मोठा अन्याय आहे. त्याबाबत तातडीने कारवाई करणे गरजेचे आहे. अंगणवाडी सेविका महिला असल्याने त्यांना अनेक ठिकाणी पुरूषी प्रभावाचा सामना करावा लागतो. त्यांच्यावर आधीच इतर महत्वाच्या जबाबदाऱ्या असताना विलीगीकरण कक्षाची जबाबदारी दिल्याने त्यांच्या इतर कामावर परिणाम होण्याची शक्यता संभवते आह.
अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर आधीच सरकारकडून घोर अन्याय सुरू आहे. आधीच अतिरिक्त कामाचा बोजा असताना ही आणखी जोखमीची जबाबदारी दिल्याने त्यांचे व त्यांच्या संपर्कातील गरोदर माता, स्तनदा माता, बालके यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे त्यांना विलीगीकरण कक्षातील नेमणूक देऊ नये. ग्रामपंचायतीने त्यांच्या पातळीवर निणर्य घ्यावा.
-कॉ. जीवन बा. सुरूडे,
सहचिटणीस, अंगणवाडी युनियन