साईकिरण टाइम्स ब्युरो, 24 मे 2020
वडाळा महादेव (राजेंद्र देसाई )श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील नेवासा रोडवरील एका अध्यात्मिक आश्रमामध्ये करोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे.
श्रीरामपूर तालुका तसेच परिसरात प्रशासनाकडून खबरदारीचा उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. वडाळा महादेव येथील अध्यात्मिक पंथातील गृहस्थ हे औरंगाबाद येथे धर्म प्रचार व प्रसारासाठी वास्तव्यास होते. औरंगाबाद येथे करोणा संसर्ग आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने सदर गृहस्थाने धार्मिक भावनेमधून तसेच पंथाच्या माध्यमातून गोरगरीब व गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. यावेळी सदर गृहस्थ यांना अस्वस्थ वाटत असल्याने त्यांनी वडाळा महादेव येथे येण्याचे ठरविले.
त्यानुसार त्यांना वैद्यकीय उपचारासाठी येथे आणण्यात आले त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने श्रीरामपूर येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले दोन ते तीन दिवस येथे उपचार करण्यात आले तरीही प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने वैद्यकीय सुत्रांकडून त्यांना अहमदनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले.
याठिकाणी त्यांच्यावर विविध तपासण्या करण्यात आल्या त्यानुसार त्यांना करुणा आजारांचा संसर्ग झाल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे.
याबाबत वैद्यकीय सूत्राकडुन माहिती प्राप्त झाली आहे . सदर गृहस्थ हे वडाळा महादेव नेवासा रोडवर अध्यात्मिक आश्रमात राहत होते. या घटनेची माहिती तात्काळ तालुक्यात तसेच परिसरात समजल्याने येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका व आशा कर्मचारी यांनी तात्काळ धाव घेत सदर प्रकार तालुका वैद्यकीय अधिकारी व येथील सरपंच अरुंधती पवार यांना दिली.
त्यानुसार येथील सामाजिक कार्यकर्ते अविनाश पवार यांनी तहसीलदार प्रशांत पाटील यांना माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखत प्रशासनाकडून तात्काळ जोरदार हालचाली सुरू झाल्या व येथील आश्रमात व्यक्तींना प्रशासकीय अधिकारी यांच्याकडून भेट देण्यात आली.
यावेळी प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील, श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मसुद खान, सरपंच सौ अरुंधती पवार, ग्रामपंचायत सदस्य तसेच करोना कमेटी यांनी भेट दिली.
यावेळी सदर व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती संकलित करण्यात आली. तसेच वडाळा महादेव येथील काही ग्रामस्थ सदर गृहस्थांच्या संपर्कात होते त्यांचीही माहिती घेण्यात आली .
यापुढे नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील पोलीस प्रशासकिय अधिकारी आरोग्य अधिकारी यांचेकडून नागरिकांना सूचना देण्यात आल्या आहेत. प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी ग्रामस्थ करोना कमिटी सरपंच सौ अरुंधती अविनाश पवार हे उपस्थित होते.