साईकिरण टाइम्स ब्युरो, 22 एप्रिल 2020
टिळकनगर (वार्ताहर) लाॅकडाऊनमुळे शाळा बंद असल्याने आता शाळांनी मुलांना विविध ऑनलाईन टास्क देण्यास सुरवात केली आहे. एकीकडे आई-बाबा घरीच असल्याचा आनंद, तर दुसरीकडे बाहेर खेळायला जायला परवानगी नाही. आई-बाबांचे 'वर्क फ्रॉम होम' सुरू असल्याने ते घरी असूनही कामातच व्यस्त ! मग मुलांनी दिवसभर करायचे तरी काय? मुलांचा दिवसभरातील वेळ मजेत जावा, यासाठी शाळांनीही आता मुलांसाठी 'स्टडी फ्रॉक होम' चा उपक्रम सुरू केला आहे. राहता तालुक्यातील टिळकनगर येथील कॅथॉलिक मराठी या उपक्रमाचा श्रीगणेशा केला आहे.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्वत्र 'लॉकडाऊन' असल्याने शाळा बंद आणि मुले घरीच आहेत. संसर्गाचा धोका लक्षात घेऊन मुलांना बाहेर खेळायला सोडणेही शक्य होत नाही. त्यामुळेच कॅथॉलिक शाळेने मुलांसाठी अभिनव उपक्रम सुरू केला आहे. व्हाट्सएपच्या माध्यमातून पालकांना याबाबतची माहिती देण्यात येत आहे. व्हाट्सएपच्या माध्यमातून इयत्तेनुसार प्रश्न संच तयार केले आहे. शिक्षक ऑनलाइन टेस्ट लिंक पाठवून विद्यार्थ्यांना व पालकांना मार्गदर्शन व सूचना करत आहे.
राहता तहसीलदार, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने आयोजित केलेल्या कोरोना जनजागृती अभियानांतर्गत विद्यार्थी चित्रकला, रांगोळी, निबंध, घोषनावाक्ये, हस्तांतर स्पर्धेत ऑनलाइन सहभाग घेत आहे. मुलांच्या वयोगटानुसार यामध्ये उपक्रम समाविष्ट आहेत. विद्यार्थी दररोज हे अभ्यासक्रम पूर्ण करून त्याचे फोटो किंवा व्हिडीओ व्हाट्सएपच्या माध्यमातून अपलोड करत आहेत. दिलेला अभ्यासक्रम मुलांनी कसा केला, याबाबत शिक्षक प्रतिक्रिया देत आहेत, सुधारणा कळवत आहेत. नेहमी अभ्यासात, पुस्तकात अडकलेल्या मुलांना अशा अक्टिव्हिटी करताना खूप मजा येत आहे. हा उपक्रम यशस्वी राबविण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक पी. एस. निकम, संचालक फादर मायकल वाघमारे, शिक्षिका अगाथा सूर्यवंशी, छाया निकाळे, सुनील उबाळे, शामल साळवे, भारती शिंनगारे, वैशाली बनसोडे, सुनीता पंडित, आदींसह विद्यार्थ्यांना पालकांचे मार्गदर्शन लाभत आहे.
मुख्याध्यापक पी. एस. निकम म्हणाले , आता पालक आणि मुले दोघेही घरीच आहेत. मुलांना काय खेळायला द्यायचे, काय शिकवायचे याबाबत पालक गोंधळलेले आहेत. यंदा कोरोनामुळे शाळा लवकर बंद झाल्या आहेत. त्यामुळे शाळेकडून व्हाट्सएपच्या माध्यमातून मुलांना टास्क द्यायला सुरुवात केली आहे. हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या इयत्तेनुसार चालू आहे. उपक्रम कसे वाटले, कोणाचे खूप छान झाले, कोणाला सुधारणा करण्याची गरज आहे, याबाबत शिक्षक प्रत्येक विद्यार्थी आणि पालकांशी वैयक्तिक संवाद साधत आहेत.'
पालक म्हणाले की, 'शाळा लवकर संपल्यामुळे मुले आता घरी आहेत. कोरोनाचे थैमान पाहता मुलांना घराबाहेर सोडता येत नाही. मुले टीव्ही किंवा मोबाईलसाठी हट्ट धरतात. मात्र, शाळेने जो उपक्रम चालू केला आहे. मुले हे उपक्रम एन्जॉय करत आहेत आणि त्यांचा वेळही चांगला जात आहे. शाळेचा हा प्रयोग खूपच आवडतो आहे'.