साईकिरण टाइम्स ब्युरो, 15 एप्रिल 2020
श्रीरामपूर|प्रतिनिधी|जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या नवीन आदेशामध्ये दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना पेट्रोल बंद केल्यामुळे अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी व नागरिक यांना सुद्धा फटका बसला असून सरसकट लावलेली पेट्रोल बंदी मागे घ्यावी, अशी मागणी समाजातील विविध वर्गानी केली आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी काल एका आदेशान्वये पेट्रोल पंप चालकांना फक्त डॉक्टर, शासकीय वाहने, अँब्युलन्स व वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोक सोडून इतरांना दुचाकी व चारचाकी गाड्यांना पेट्रोल,डिझेल देऊ नये असे आदेश दिले. त्याची अंमलबजावणी जिल्हाभरातील पंप चालकांना सुरू केली. परंतु त्याच्यामुळे अत्यावश्यक सेवेतील लोकांनासुद्धा पेट्रोल न मिळाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कामावर जाता आले नाही.
बँकिंग सेवा ही अत्यावश्यक सेवा असून बँकांचे व्यवहार नियमित सुरू आहेत. विविध बँकांचे कर्मचारी शहराच्या वेगवेगळ्या व ग्रामीण भागात राहतात. पेट्रोल बंदीच्या निर्णयामुळे त्यांना आपल्या दुचाकी मध्ये पेट्रोल न भरताना आल्यामुळे बँकेत जाण्यामध्ये मोठी अडचण निर्माण झाली . लांबचे अनेक कर्मचारी येऊ शकले नाहीत तर शहरातील कर्मचाऱ्यांना पायी बँकेत जावं लागलं . पत्रकारांना सुद्धा पेट्रोल नाकारण्यात आले आहे . विविध वृत्तपत्रांचे पत्रकार हे बातमी मिळवण्यासाठी वेगवेगळ्या भागात फिरत असतात . विविध शासकीय कार्यालयाशी त्यांना संपर्क करावयाचा असतो . परंतु त्यांना सुद्धा पेट्रोल नाकारण्यात आले आहे . सर्वात मोठी कुचंबणा शेतकऱ्यांची झाली असून सध्या शेतीमध्ये कामाचा हंगाम सुरू आहे . नांगरणीसाठी ट्रॅक्टरचा वापर होत असून ट्रॅक्टरला सुद्धा पेट्रोल डिझेल दिले जात नाही . त्यामुळे शेतमालाची वाहतूक व इतर शेतीची कामे देखील खोळंबली आहेत . शेतकऱ्यांनी जर लॉक डाऊन पाळले तर शहरातील नागरिकांचे काय हाल होतील याची कल्पना केलेली बरी . अशी प्रतिक्रिया एका संतप्त शेतकऱ्याने व्यक्त केली . शेतकऱ्यांचा माल शहरात लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्रॅक्टरला सुद्धा डिझेल मिळाले नाही. सध्या गव्हाच्या काढणीचा हंगाम सुरू आहे. त्यासाठी हार्वेस्टर मशीनला सुध्दा डिझेलची आवश्यकता आहे.
आज अनेक पेट्रोल पंपावर नागरिकांचे पंप चालकांशी वाद झाले . काहींनी तहसीलदारांना फोन केले मात्र त्यांनीसुद्धा याबाबत असमर्थता व्यक्त केली. त्यामुळे बँकिंग, पत्रकारिता, शेती इत्यादी जीवनावश्यक क्षेत्रातील लोकांना त्यांच्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना पेट्रोल, डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत तातडीने आदेश द्यावेत अशी मागणी या सर्व क्षेत्रातील लोकांनी केली आहे .
पेट्रोल पंपावर वाद
जिल्हाधिकार्यांनी काल संध्याकाळी उशिरा दुचाकी आणि चारचाकी गाड्यांना पेट्रोल बंदीचे आदेश जारी केले. आज सकाळी बहुतेक लोक पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले. मात्र या आदेशाची त्यांना कल्पना नसल्यामुळे व पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कामगारांनी या लोकांना पेट्रोल-डिझेल देण्यास नकार दिल्यामुळे नागरिकांनी पंपावरील कामगारांशी वाद घातले . शहरातील तिन्ही पेट्रोल पंपावर या घटना घडल्या .याबाबत तहसीलदारांशी संपर्क केला असता पंप चालकांचे आपल्याला फोन आले असून त्यांची अडचण जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचविली असल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष
सध्या शेतीची विविध प्रकारची कामे सुरू आहेत . पिकलेला भाजीपाला व शेतमाल शहरांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तसेच गहू काढण्यासाठी डिझेलची आवश्यकता असून ट्रॅक्टरला देखील डिझेल दिले जात नसल्याने शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे . शेतीच्या कामासाठी तरी पेट्रोल-डिझेल उपलब्ध करून दिले गेले पाहिजे .शेतमाल जर लोकापर्यंत पोहोचला नाही ही तर शेतकऱ्यांचे नुकसान होईल आणि जनतेला सुद्धा भाजीपाला व शेतीमालाच्या टंचाईला तोंड द्यावे लागेल . एक अविवेकी निर्णय सर्वांसाठी त्रासदायक ठरू शकतो तरी जिल्हाधिकार्यांनी या आदेशा बाबत फेरविचार करावा, अशी संतप्त प्रतिक्रिया बेलापूरच्या एका शेतकऱ्यांनी व्यक्त केली.