![]() |
कृष्ण तुळस |
तुळस ( Basil)
तुळस नेहमी घराच्या दर्शनी भागात म्हणजे जिथून घरात प्रवेश केला जातो अशा ठिकाणी लावली जाते. यापाठीमागे आपल्या पूर्वजांचे मानावेत तितके आभार कमीच आहेत. आजच्या इतके विज्ञान तेव्हा पुढारलेले ( साधनांचा विचार केला तर) नसताना सुद्धा त्यांनी मांडलेली गृहितके आपण अजूनही अभ्यासत आहोत आणि अजूनही त्यांचे दावे आपण खोडून काढू शकलो नाही.
![]() |
लाल तुळस |
तर,तुळस ही वातावरणातील नकारात्मक शक्ती / उर्जा खेचून घेते असा शास्त्रीय आधार आहे.याचीच प्रचीती म्हणजे एखाद्या घरी कितीही काळजी घेऊन कितीही वेळा तुळस लावली तर ती एकतर तितकी वाढत नाही किंवा कालांतराने मृतप्राय होते.(इथे कोणताही अंधविश्वास / मिथक पसरवणे हा उद्देश नक्कीच नाही पण अनुभवी व्यक्तीचे अनुभव / प्रचितीचे शब्द आणि अनेक वर्षांची निरीक्षणे आहेत) हा, शेवटी काही गोष्टी तर्काच्या आधारावर मान्य कराव्या लागतात. आणि म्हणूनच घरात प्रवेश करू इच्छिणाऱ्या व्यक्तीचा ( नकारात्मक )प्रभाव कमी करण्यास तुळस मदत करते.आपल्या खंडप्राय देशात तुळशीला अनन्यसाधारण महत्व उगाचच नाही आणि देवत्व बहाल करून तिची उगाचच पूजा केली जात नाही.
![]() |
राम तुळस |
तुळस Ocimum sanctum ( अॅासिमम सॅंक्टम )ही लॅमिएसी या पुदिना सदृश वनस्पतींच्या सुगंधी घराण्याशी आपले कुलसंबंध जोडताना दिसते. तज्ञांच्या मतानुसार तुळस दिवसभरात २० तास प्राणवायूचा अविरत पुरवठा करते. आणि म्हणूनच प्रात:काळी शक्यतो हिंदू संस्कृतीत महिला तुळशीला वंदन करून प्रदक्षिणा घालतात ते याच कारणांमुळे की,शुद्ध प्राणवायू (ओझोन) चा हलकासा पण प्रभावी आणि दिवसभर ताजातवाना ठेवणारा एनर्जी डोस मिळावा.
![]() |
रान तुळस |
नैवेद्यावर आवर्जून ठेवली जाणारी तुळशीपत्रे वरणभाताच्या पिवळ्या मुदीवर तीट दिल्यासारखी शोभून दिसतात. इतकेच नाही तर ग्रहणकाळातातील अन्न तथा तत्सम पदार्थाचे अतिनील किरणांपासून रक्षण करण्यासाठी तुळशीचे महत्व वादातीत आहे.
![]() |
कापूर तुळस |
तर, दिवसाची सुरूवात जिच्या दर्शनाने सुरू होते ते अगदी " शेवटचे" राम म्हटले की मृतकाच्या मुखात आवर्जून ठेवून तोंड " बंद " केले जाते ते दोन अर्थाने :- एक तर त्या अशुभाचा / रोगट औदासिन्याचा प्रभाव आजूबाजूच्या वातावरणावर पडायला नको आणि दुसरे म्हणजे मृतदेहावर तुळसीपत्र ठेवणे म्हणजे सर्वस्वाचा त्याग करणे होय.
तुळशीचे प्रकार
तुळसीच्या अनेक प्रजाती असल्या तरी मान्यता मिळालेल्या आणि औषधी वापराच्या दृष्टीने खालील पाच प्रकारांना प्राधान्य दिलेले दिसते.( नेटवरून अनेक प्रकार शोधण्याचा अटोकाट प्रयत्न केला पण फिरून फिरून हेच प्रकार आलटून पालटून समोर येत गेले)
१. कृष्ण् तुळस sacred basil
( Ocimum sanctum/tenuiflorum)
२. राम तुळस shrubby basil
( Ocimum gratissimum)
३. सब्जा hoary basil
( Ocimum Americanum )
४. रान तुळस sweet basil
( Ocimum basilicum)
५. कापूर तुळस camphor basil
( Ocimum kilimandscharicum)
वरील प्रकाराव्यतिरिक्त अनेक प्रकारांबाबत व्यक्ती आणि स्थान परत्वे अनेक मतमतांतरे असू शकतात पण इथं तिच्या प्रकारांच्या दिसण्यापेक्षा " असणं) अधिक महत्त्वाचे नाही का?
१) कृष्ण् तुळस :-
हिलाच काळी तुळस असेही म्हणतात. पाने,मंजिरा आणि खोडावर जांभळ्या रंगाचा प्रभाव अधिक जाणवतो. सर्दी, खोकला आणि ताप यावर आवर्जून हिच्या पानांचा काढ्याच्या माध्यामातून उपयोग केला जातो.
२) राम तुळस :-
याच प्रकाराला लवंगी तुळस असेही म्हणतात.ही मोठ्या पानांची, उंच आणि बेछूट अशी वाढणारी आहे.पोटातील विकारात ही तुळस उपयोगी आहे. हिला मसालेदार वास येतो.
३) सब्जा :-
शरीराला थंडावा पुरवण्याचे काम या तुळशीच्या बिया करतात. त्यासाठी आवर्जून हिची लागण केली जाते.या तुळशीची पाने आणि बिया सरबतात घालून पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते. विंचू दंश झाल्यास याची पाने चुरगाळून लावतात.
४) रान तुळस :-
जंगली पद्धतीने वाढणाऱ्या या तुळशीला वन तुळस असेही म्हणतात.अतिशय तीव्र सुवास हिला असून तिला विशेष औषधी मूल्य आहे.त्वचाविकार तथा न भरणाऱ्या जखमांवर हिच्या पानांचा चोथा लावतात.
५) कापूर तुळस :-
हर्बल / ग्रीन टी तयार करताना हिचा आवर्जून वापर केला जातो. पानांचा सुवास कापरासारखा येतो. यापासून बनविलेल्या तेलात ६०-८०% कापराचे प्रमाण असते. सर्दी, कफ आणि खोकला यावर उपयुक्त ठरते
क्रमशः
----- वैशालीतनय : विवेक पाथ्रुडकर, जेऊर ( सोलापूर )
21 एप्रिल 2020