साईकिरण टाइम्स | राजेश बोरुडे | दि. २१/०७/२०२६
अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात माहिती अधिकाराखालील प्रकरणांमध्ये थेट 'आर्थिक तडजोडीचे केंद्र' चालवले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कार्यालयातील कर्मचारी सचिन चव्हाण हे अर्जदारांना कायदेशीर माहिती देण्याऐवजी खाजगी 'सेटलमेंट एजंट'सारखे काम करत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी ऑल इंडिया मीडियाचे सदस्य सुधीर तुपे आणि 'साईकिरण टाइम्स'चे संपादक राजेश बोरुडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता लक्ष्मीकांत जाधव यांच्याकडे सविस्तर तक्रार दाखल केली असून, भ्रष्ट साखळी चालवणाऱ्या या कर्मचाऱ्याची सखोल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
तक्रारीनुसार, कार्यालयात मोठ्या बजेटच्या आणि निकृष्ट कामासंदर्भात माहिती अधिकाराचा अर्ज आल्यास सचिन चव्हाण हे संबंधित ठेकेदाराशी गुप्तपणे संपर्क साधून 'सेटलमेंट फंड' गोळा करतात. त्यानंतर अर्जदाराला कार्यालयात किंवा बाहेर बोलावून रोख रकमेचे आमिष दाखवले जाते आणि 'माझे समाधान झाले, मी अर्ज मागे घेत आहे' असे पत्र लिहून घेत अर्ज मागे घेण्यास भाग पाडले जाते. या 'संघटित' गैरप्रकारात वरिष्ठ अधिकारी आणि ठेकेदारांचाही सहभाग असल्याचा संशय तक्रारदार सुधीर तुपे व राजेश बोरुडे यांनी व्यक्त केला असून, हे कृत्य भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ आणि भारतीय न्याय संहिता (BNS), २०२३ अन्वये अत्यंत गंभीर स्वरूपाचा अपराध असल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या पैशांच्या वाटपाचे भक्कम पुरावे आपल्याकडे सुरक्षित असून, ते प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी चौकशी समितीसमोर सादर केले जातील, असा दावा सुधीर तुपे व राजेश बोरुडे यांनी केला आहे. पुरावे नष्ट केले जाण्याची शक्यता असल्याने, कार्यालयातील मागील ३० दिवसांचे सीसीटीव्ही फुटेज सुरक्षित करावे आणि सर्व माहिती अधिकार फायली त्वरित सील करून ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, मागील पाच वर्षांतील सर्व आरटीआय अर्जांचे व मागे घेतलेल्या अर्जांचे विशेष ऑडिट करावे आणि मुख्य सूत्रधार सचिन चव्हाण यांना तत्काळ सेवेतून निलंबित करून त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी करावी, अशी आग्रही मागणी त्यांनी केली आहे. प्रशासनाने कारवाई करण्यास टाळाटाळ केल्यास हे प्रकरण पुराव्यांसह लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) आणि लोकायुक्तांकडे नेण्याचा कडक इशारा सुधीर तुपे, राजेश बोरुडे यांनी दिला आहे.
