साईकिरण टाइम्स | राजेश बोरुडे
अहिल्यानगर : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना' सर्वसामान्यांपर्यंत पोहोचत असताना, खुद्द सरकारी बाबूच या योजनेची जाणीवपूर्वक बदनामी करत असल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे. "लाडकी बहीण योजनेमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला (PWD) गेल्या दोन वर्षांपासून दमडीचाही निधी मिळालेला नाही," असा खळबळजनक आणि पूर्णपणे निराधार दावा PWD मधील एका कर्मचाऱ्याने केला आहे. या बेजबाबदार वक्तव्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुधिर तुपे आणि पत्रकार राजेश बोरुडे यांनी थेट कार्यकारी अभियंत्यांकडे पुराव्यांनिशी तक्रार ठोकली असून, संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर प्रशासकीय कारवाईची मागणी केली आहे.
अहिल्यानगर येथील सार्वजनिक बांधकाम उपविभाग कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी सचिन चव्हाण यांचा एका माहिती अधिकार कार्यकर्त्याशी झालेला संवाद नुकताच समोर आला. शासकीय कार्यालयात खुर्चीवर बसून, अत्यंत बेजबाबदारपणे चव्हाण यांनी थेट शासनाच्या धोरणावरच प्रश्नचिन्ह निर्माण केले. स्वतःच्या विभागातील प्रलंबित देयके आणि निधीच्या नियोजनातील त्रुटी लपवण्यासाठी त्यांनी अत्यंत सोयीस्करपणे 'लाडकी बहीण' योजनेकडे बोट दाखवले. शासनाने विकासकामांचा निधी महिलांच्या योजनेकडे वळवल्याचा अत्यंत चुकीचा आणि दिशाभूल करणारा संदेश यातून समाजात पसरवला जात आहे.
वास्तविक पाहता, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महिला व बालविकास विभाग यांचे अर्थसंकल्प, निधीचे वाटप आणि लेखाशीर्ष (Budget Head) पूर्णपणे स्वतंत्र असतात. त्यामुळे 'लाडकी बहीण' योजनेचा आणि PWD च्या थकीत बिलांचा प्रशासकीयदृष्ट्या काडीमात्र संबंध नाही. तरीही, अपयश लपवण्यासाठी थेट शासनाच्या जनकल्याणकारी योजनेला जबाबदार धरणे, हे प्रशासकीय उत्तरदायित्वापासून पळ काढण्याचेच लक्षण असल्याचे तक्रारदारांनी सडेतोडपणे मांडले आहे.
शासकीय सेवेत असलेल्या कर्मचाऱ्याने कार्यालयात बसून शासनाच्याच धोरणांबद्दल अविश्वास निर्माण करणे, हे 'महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांचे' थेट आणि गंभीर उल्लंघन आहे. या प्रकारामुळे शासन यंत्रणेच्या विश्वासार्हतेला मोठा तडा गेला आहे. या संपूर्ण प्रकरणाची सखोल प्रशासकीय चौकशी करून श्री. सचिन चव्हाण यांच्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी 'ऑल इंडिया मीडिया असोसिएशन'चे सदस्य श्री. सुधिर तुपे आणि 'साईकिरण टाइम्स'चे संपादक श्री. राजेश बोरुडे यांनी केली आहे.
या गंभीर प्रकारामुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, आता PWD चे वरिष्ठ अधिकारी आपल्या कर्मचाऱ्यावर पांघरूण घालणार की कारवाईचा बडगा उगारणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.
.jpeg)