गेल्या शंभर वर्षापासून संघाची एक कार्यपद्धती आहे. त्या विचारधारेतून जन्माला आलेल्या भाजपची एक कार्यपद्धती निर्माण झालेली आहे त्यावर संघाचा प्रभाव आहे. संघाची व भाजपची कार्यपद्धती संघटन सापेक्ष आहे. व्यक्तीसापेक्ष नाही. त्यामुळेच संघ व भारतीय जनता पार्टीचे विचारधारा उत्तरोत्तर जगभरात रुजण्यचा खरा आधार तोच आहे. मी बालपणापासून संघाचा स्वयंसेवक आहे. माझ्या घरातच संघाचे भाजपाचे बाळकडू मला मिळालेले आहे. हिंदुत्व, एखाद्या विषयावर चळवळ चालवणे. त्या विषयावर आंदोलन करणे, मोर्चा काढणे, जनजागृतीसाठी गावोगाव बैठका घेणे, अन्यायाविरोधात आवाज उठवणे, प्रस्थापितांविरोधात विस्थापितांना न्याय मिळवून देणे, असे अनेक विध प्रकार भाजपच्या कार्यपद्धतीचे अभिन्न अंग आहे. हि कार्यपद्धती भाजपचा आत्मा आहे. या कार्य पद्धतीमुळेच भाजपा देशभर वाढला. तीच भाजपची कार्यपद्धती आता माझा ब्लडग्रुप झाली आहे. नामदार विखेंना माझ्या या कार्यपद्धतीवर आक्षेप आहे मी मेंदू काढून त्यांच्यासोबत त्यांना समर्पित होऊन काम करावे अशी त्यांची अपेक्षा आहे. जिल्हाभर असलेल्या भाजपच्या जुन्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा त्यांची हीच अपेक्षा आहे. त्यामुळे जिल्हाभर जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांची कोंडी झालेली आहे. आता मी व्यक्ती सापेक्ष काम न करता भाजपासापेक्ष काम करीत आहे. त्यामुळे ते पक्षात आल्यापासून गेली सहा वर्ष ते माझ्यावर नाराज आहे. त्यामुळेच माझी हकालपट्टी झाली ही हकालपट्टी केवळ तांत्रिक आहे. भारतीय जनता पार्टीचे संघटन आणि मी मनाने प्रचंड एकरूप आहोत. मी सत्ता नसतानाही भारतीय जनता पक्षात होतो आजही भाजपतच आहे आणि पुढेही भाजपचाच राहणार आहे याबद्दल कोणी शंका बाळगण्याचे कारण नाही.
श्रीरामपर : सत्तेचे पद असेल तर संतुष्ट नसेल तर असंतुष्ट, अशा सत्ता केंद्रित भावनेभोवती नामदार विखेंच्या संतुष्ट असंतुष्टांच्या कल्पना साकारलेल्या आहेत. मात्र, सत्तेशिवाय हिंदुत्वाच्या विचारधारेसाठी आणि भाजपच्या संघटनेसाठी संघर्ष अंगावर घेत असताना जे रोमांचकारी प्रसंग, मंतरलेले दिवस आणि समाधान आम्ही अनुभवले आणि अनुभवत आहोत, त्यात मिळणारा आनंद हा स्वर्गीय सुखापेक्षा जास्त आहे. नामदार विखेंचा हिंदुत्वाशी अलीकडच्या काळात संबंध आल्याने आनंदाची कल्पना त्यांना येवू शकत नाही. मला असंतुष्ट ठरवण्यापेक्षा ज्या दोघाना मंडळ अध्यक्ष नेमले त्यांच्या नियुक्तीच्या कारणांवर व गुणवत्तेवर चर्चा करा, विषय दुसरीकडे भरकटतोय. श्रीरामपूर तालुक्यात गेल्या ३०-३५ वर्षापासून काम करणाऱ्या भाजपच्या छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांना राजकीय सत्तेची पदे मिळू शकत नाही. त्यामुळे त्यांनाच पक्ष संघटनेची पदे देण्यात यावी व त्यांच्या जीवनाचे सार्थक व्हावे, यासाठी माझा लढा आहे, असे मत भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष प्रकाश चित्ते यांनी व्यक्त केले.
नगर जिल्ह्यात काँग्रेस पक्षाचा सेक्युलर विचारधारेचा प्रचंड प्रभाव होता. त्या विचारधारेचे विरोधात हिंदुत्वराज देताना जिल्ह्यातील संघ आणि भाजपचे कार्यकर्ते देशोधडीला लागले. त्यांचे प्रपंच उध्वस्त झाले. त्याचे परिणाम त्यांचे कुटुंब व मुले बाळे भोगत आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीत ज्यांनी संघ व भाजपाचे हिंदुत्व दारोदार पोहोचवले. त्यातून जनाधार वाढला. भाजपाची सत्ता आली. भाजपाला महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता आणायची आहे. त्यामुळे भाजपचा विस्तार होणे गरजेचे आहे. त्यासाठी अनेक काँग्रेस संस्कृतीतून आलेल्या प्रत्येक नेत्याला भाजपच्या कार्यकर्त्यांनी आनंदाने स्वीकार केला. त्याचे स्वागत केले. आम्ही तर श्रीरामपुरात नामदार राधाकृष्ण विखे पाटील मंत्री झाल्यानंतर त्यांचे मोठी मोटरसायकल रॅली काढून मनापासून स्वागत केले. नामदार विखे यांनी जिल्हाभर जुन्या भाजपच्या कार्यकर्त्यांना स्वीकारले नाही. त्यांना सावत्रपणाची वागणूक दिली, छळ केला. दुबळे म्हणून हिणवले. मात्र या दुबळ्यांनी सत्ता नसण्याच्या काळात सह्याद्री एवढी छाती करून आभाळाएवढी हिम्मत धरून काँग्रेसमय असलेला जिल्हा भाजपमय केला आणि काँग्रेसची जिल्ह्यात वाट लावली, bहे नामदार सोयीस्करपणे विसरतात जुन्यांच्या योगदानाची साधी त्यांची जाणीवही ठेवत नाही. जुने भाजप संपवणे म्हणजे भाजप वाढवणे असे नाही, vनामदारांचे हे वागणे बरोबर नसल्याची टीका चित्ते यांनी केली.
श्रीरामपूर तालुक्यात हिंदुत्वाच्या विचारधारेची ४५ टक्के मते तयार झालेली आहे .मात्र, या मतांचे कोणी श्रेय घेऊ नये. ही विचारधारा रुजवण्यासाठी या तालुक्यात स्व. श्यामजी व्यास , स्व. माधवराव डावरे, स्व. बद्रीशेठ हरकुठ, स्व. मुरलीशेठ खटोड, स्व. अनंतराव याडकीकर, स्व. बाबा साठे, स्व. गिरधरलाल गुलाटी, स्व.सुभाष गुलाटी, स्व. बाबूशेठ चंदन, स्व. बाळकृष्ण पांडे, हेरंबजी आवटी, प्रवीण पांडे आदींसह अनेक ऋषितुल्य व्यक्तींनी आपले संपूर्ण जीवन संघ विचारधारेसाठी समर्पित केले. संघ आणि भाजपा ची विचारधारा श्रीरामपूरात रुजवली. त्यांच्या पुढच्या पिढीचा वारसा माझ्यासह भाजपनिष्ठ सहकार्यांनी गेले ३५ वर्ष चालविला आहे.पूर्वी काँग्रेसच्या उमेदवार या मतदारसंघात 60-60 हजार मतांनी आघाडीवर असायचा आता; त्याच मतदारसंघात वरील सर्वांच्या सामूहिक कामाचा परिणाम म्हणून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात 2014 साली आमच्या सोबत कोणीही मोठा प्रस्थापित पुढारी नसताना केवळ भाजपच्या संघटनेच्या जोरावर भाजपच्या उमेदवाराला 46 हजार मते मिळाली. २०१४ साली खासदार सदाशिवराव लोखंडे यांनां श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात ५२ हजार मताची आघाडी मिळाली. त्यावेळेला नामदार विखे काँग्रेसमध्ये होते. २०२४ विधानसभेला समर्पित भाजपा व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते यांच्या पाठिंबावर भाऊसाहेब कांबळे यांना दुसऱ्या क्रमाकाची ५२ हजार मते मिळाली. या विधानसभेला नामदार विखे राष्ट्रवादी च्या लहु कानडे यांच्या सोबत होते. तीस वर्ष नगरपालिकेच्या सत्तेत असलेले ससाणे आमच्या पाठिंब्यामुळे पायउतार झाले. श्रीरामपुरात कॉंग्रेसला ओहाटी लागली.
२०१४ ला आमच्या सारख्या दुबळ्या लोकांच्या संघटनेने श्रीरामपूर तालुक्यात भाजपचे 50 हजार सभासद केले. आता २०२४ ला मी एकट्याने भाजपाचे १० हजार सभासद केले. १०१८ साली भारतीय जनता पार्टीने राबविलेल्या महाविस्तार अभियानात महाराष्ट्रात श्रीरामपूर तालुक्याचा प्रथम क्रमांक आला व त्यावेळेला श्रीरामपूरच्या विस्तारचा कैलास शिंदे यांचा भाजपचे राष्ट्रीयनेते अमितभाई शाह यांच्या हस्ते भाजपा स्थापना दिनी त्याचा सत्कार करण्यात आला होता. भाजप कार्यकर्त्यांच्या सामूहिक कामामुळे या तालुक्यात भाजपला प्रचंड अनुकुलता निर्माण झालेली आहे. व काँग्रेसला ओहटी लागली आहे. गेली ३०-३5 वर्ष हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी काँग्रेसचे विरोधात संघर्ष केला. पक्षाचे काम करताना माझ्यासह माझ्या सहकाऱ्यांचे प्रपंच उध्वस्त झाले. या साऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करता येत नसेल तर किमान त्यांचा अपमान करू नका. अशा ३०-३५ वर्ष भाजपचे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी साधी मंडलाध्यक्षाची अपेक्षाही ठेवायची नाही. साधी इच्छाही व्यक्त करायची नाही. चार भिंतीच्या आत सुद्धा बोलायचे नाही, असा दडपशाहीच्या वरवंट्या खाली रगडला जाणारा नवीनच भाजप आम्ही अलीकडच्या काळात पाहत आहोत. हे आमच्या साठी अत्यंत धक्कादायक आहे. श्रीरामपूर तालुक्यात नामदार विखेंच्या गटातही अनेक गट आहे आणि प्रत्येक गट आणि व्यक्ती एकमेकांच्या प्रचंड विरोधात असून ऐकमेकाचे शत्रू आहेत. बॅनरबाजीचा आणि आमचा कुठलाही संबंध नाही.ज्या काही गोष्टी न्याय मिळवण्यासाठी करायचा त्या आम्ही उघड उघड करू. छोट्या-छोट्या कार्यकर्त्यांच्या न्यायासाठी लढा देणे, हा काही माझा गुन्हा नाही हे सर्व पक्ष जाणतो, असे प्रतिपादन श्री चित्ते यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.