श्रीरामपूर : नगरपालिका शाळा क्र. ३ या मतदान केंद्रावर स्तनदा मातांना पूर्णवेळ इलेक्शन ड्युटी दिली. परंतु, याठिकाणी हिरकणी कक्षच नसल्याने बाळास वेळोवेळी स्तनपान करायचे कसे? असा सवाल उपस्थित झाला आहे. या मतदान केंद्रावर त्वरित 'हिरकणी कक्ष' स्थापन करावा, असे तक्रार निवेदन राजेश बोरुडे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी किरण सावंत व सहाय्यक निवडणूक अधिकारी मच्छिन्द्र घोलप यांना दिले आहे. बाळास व स्तनदा मातेच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास संबंधित प्रशासन व अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला.
राजेश बोरुडे यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनात नमुद केले आहे की, नगरपालिका शाळा क ३ येथील मतदान केंद्रावर स्तनदा माता सौ पल्लवी राजेश बोरुडे यांना दि. ०१/१२/२०२५ ते ०२/१२/२०२५ रोजी पूर्णवेळ बूथवर थांबून सर्व निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य करण्याचे आदेशित करण्यात आले आहे. सदर आदेश नगरपालिका शिक्षण मंडळाचे अतिरिक्त प्रशासनाधिकारी संजीवन दिवे यांनी समाजमाध्यम समुहावर (व्हाट्सअप ग्रुप ) केवळ मेसेज द्वारे संबंधित शाळेच्या मुख्यध्यापकांना दिले. त्यानुसार, शाळा क्र. ३ च्या मुख्याध्यापकांनी स्तनदा माता सौ पल्लवी राजेश बोरुडे यांना पूर्णवेळ बूथवर थांबून निवडणूक प्रक्रियेसाठी सहकार्य करण्याचे पत्र दिले आहे. सौ. पल्लवी बोरुडे या स्तनदा माता असल्यामुळे निवडणूक ड्युटीचे आदेश संबंधित प्रशासनाकडून देण्यात आले नव्हते. परंतु, शाळा प्रशासनाकडून सौ पल्लवी बोरुडे यांना नगरपालिका शाळा क्र. ३ येथील मतदान केंद्रावर दि. ०१/१२/२०२५ ते ०२/१२/२०२५ पूर्णवेळ बूथवर उपस्थित राहून निवडणुक प्रक्रियेत सहकार्य करण्याचे आदेशित केले असल्याचे राजेश बोरुडे यांनी म्हंटले आहे.
नगरपालिका शाळा क्र. ३ या मतदान केंद्रावर तातडीने 'हिरकणी कक्ष' स्थापन करावा. जेणेकरून बाळास वेळोवेळी स्तनपान करता येईल. सदर मतदान केंद्र व शाळा परिसरात सर्वत्र सीसीटीव्ही केमेरे असल्यामुळे बाळास स्तनपान करणे शक्य नाही. वरील कालावधीत पूर्ण वेळ बूथवर उपस्थित राहून निवडणूक प्रक्रियेस सहकार्य करण्याचे आदेशित केल्यामुळे स्तनदा माता सौ पल्लवी राजेश बोरुडे व त्यांच्या बाळाच्या जीवितास कोणताही धोका निर्माण झाल्यास संबंधित प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.
