श्रीरामपूर : सरलापीठाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते श्री शिवाजी महाराज चौकात नामदार विखे यांनी छ. शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भूमिपूजन केले. वर्षभरानंतर त्यांच्या राजकीय सोयीसाठी छत्रपतींच्या पुतळ्याची अचानक जागा बदलून नेहरू मार्केट भाजी मंडई मध्ये पुन्हा भूमिपूजन केले. हा केवळ मुस्लिमांच्या मतांकारिता नामदार विखेंनी हिंदू समाजाचा केलेला विश्वासघात असून, श्रीरामपूर तालुक्यातील जनता हा विश्वासघात विसरणार नाही, असा अशी भावना हिंदू रक्षा कृती समितीचे निमंत्रक प्रकाश चित्ते यांनी व्यक्त केली .
छत्रपतींच्या पुतळ्याची जागा बदलल्याच्या निषेधार्थ व छत्रपतींचा पुतळा श्री शिवाजी महाराज चौकातच व्हावा, या मागणीसाठी हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने श्रीरामपुरात मशाल मोर्चा व जाहीर सभेचे आयोजन केले होते. या जाहीर सभेचे अध्यक्षस्थानी सुदाम महाराज चौधरी हे होते. याप्रसंगी आचार्य महेशजी व्यास, हिंदू जनजागृती समितीच्या प्रतीक्षा कोरेगावकर, ह भ प सेवालाल महाराज, ऋषिकेश महाराज, भाजपचे माजी शहराध्यक्ष संजयजी पांडे , सुनील खपके , अशोक साळुंखे , सुरेश आसने आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये छत्रपतींचा पुतळा बसवण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बांधकाम रेषेच्या नियमाची अडचण आहे, असे सांगतात मग चाळीसगाव आणि तासगाव या तालुक्याच्या गावांमध्ये भर चौकामध्ये नॅशनल हायवेवर कायदेशीररित्या परवानगी घेऊन पुतळ्यांची प्रतिष्ठापना कशी झाली. येथे गावांमध्ये नॅशनल हायवे डी नोटीफाय करून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या बांधकामरेषेच्या नियमावर मार्ग काढण्यात आला व पुतळ्यांच्या प्रतिष्ठापना मोठ्या दिमाखात झाल्या. श्रीरामपुरच्या शिवाजी महाराज चौकातही त्याच पद्धतीने मार्ग काढून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला जाऊ शकतो. मात्र, शिवाजी चौकात बसवायचा नाही असाच निर्णय असेल तर हिंदू समाजाला न्याय मिळवण्यासाठी आंदोलनाच्या मार्गाने लढावे लागेल, असे श्री चित्ते यांनी यावेळी स्पष्ट केली.
आचार्य महेशजी व्यास यावेळी बोलताना म्हणाले, अखिल महाराष्ट्रातल्या जनतेची श्रद्धा असलेल्या सरला पिठाचे महंत रामगिरीजी महाराज यांच्या हस्ते नामदार विखेंनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी श्री शिवाजी महाराज चौकात भूमिपूजन केले आणि अचानक छत्रपतींच्या पुतळ्याची जागा बदलली. हा हिंदू समाजाचा व महंत रामगिरीजी महाराज व सरलापीठाचा अपमान आहे . ही घटना हिंदू समाज सहन करणार नाही.
यावेळी बोलताना हिंदू जनजागृती समितीच्या प्रतीक्षाताई लोणकर म्हणाल्या, की छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ छत्रपती नव्हते तर ते या भारतातील एक चक्रवर्ती सम्राट होते . या चक्रवर्ती सम्राटच्या राज्याच्या सीमा तामिळनाडू , कर्नाटक, गोवळकोंडा, मध्य प्रदेश ते थेट अटकेपार पोहोचलेल्या होत्या. अशा दैदिप्यमान राजाच्या स्मारकाची या श्रीरामपूरमध्ये हेडसाळ होत आहे . जगाच्या पाठीवर व्हिएतनामने अमेरिकेला 1956 ते 1975 पर्यंत व्हिएतनांमध्ये लढवले .अखेरीस अमेरिकेचा पराभव झाला. या विजयाचे श्रेय व्हिएतनामच्या राष्ट्रप्रमुखांनी छत्रपतींच्या युद्धनीतीला दिले अशा महान राजाच्या स्मारकासाठी श्रीरामपूर ४०- ४० वर्ष लढा उभारावा लागतो. हे या महाराष्ट्राचे आणि हिंदूंचे दुर्दैव आहे असे मत श्रीमती कोरेगावकर यांनी व्यक्त केले. हिंदू रक्षा कृती समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मशाल मोर्चा व जाहीर सभेला श्रीरामपूर तालुक्यातील हिंदू समाजाने उस्फुर्त प्रतिसाद दिला.