यासंदर्भात राजेश बोरुडे यांनी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्याकडे तक्रार केली आहे. कार्यालयातील सर्व लोकसेवक वेळेत उपस्थित राहून नियमानुसार, निर्धारित शुल्कात जनतेची कामे करावी, कार्यालयात फेस रिडींग सिस्टिम चालू करण्याची मागणी केली आहे. कार्यालयीन कामकाजात सुधारणा करावी अन्यथा, कायदा हातात घेऊन 'आरटीओ' कार्यालयाला टाळे ठोकू. कार्यालयातील गैरकारभार चव्हाट्यावर आणण्याची मोहीम कार्यरत ठेऊन आंदोलन छेडण्याचा सज्जड इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे. उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 'झिरो आरटीओ राज' सुरु असल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला असून त्याबाबत ते वरिष्ठ पातळीवर सविस्तर तक्रारी करणार आहे.
'साईकिरण टाइम्स'ने शुक्रवारी (दि.४) श्रीरामपूर उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाची पाहणी केली. कार्यालयीन कामकाजात मोठी अनियमितता आढळून आली. कामकाजाची वेळ सुरु होऊनही बहुतांशी कर्मचारी कार्यलयात हजर नव्हते. अक्षरशः दुपारचे १२ वाजून गेल्यानंतरही बरेच अधिकारी, कर्मचारी आलेले नसतात. उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आनंदा जोशी यांचा कर्मचाऱ्यांवर कोणताही वचक नसल्याने कार्यालयात मनमानी कारभार सुरु असतो. अधिकारी, कर्मचाऱ्यांचा बेशिस्त कारभार करतात. कधीही येतात, जातात. सर्वसामान्य नागरिक कामानिमित्त आल्यावर व्यवस्थित माहिती दिली जात नाही. पैसे घेतल्याशिवाय कामे केली जात नाहीत. कार्यालयात लावलेले माहितीदर्शक फलक केवळ दिखावा आहे. कार्यालयात फेस रिडींग सिस्टिम, बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली त्वरित चालू करावी, असेही बोरुडे यांनी तक्रारीत म्हंटले आहे.