श्रीरामपूर : श्रीरामपूर राहुरी विधानसभा मतदारसंघाकरिता वनविभागाकडून 13 पिंजरे मंजूर झाले आहेत. त्यामुळे बिबट्याच्या दहशतीतून सुटका होणार असल्याचे प्रतिपादन आमदार हेमंत ओगले यांनी म्हटले आहे.
श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघात बहुतांशी उसाची शेती असल्याने मोठ्या प्रमाणावर बिबट्यांचा वावर दिसून येतो. यामध्ये कित्येक वेळेला जीवित हानी बरोबरच पशुहानी देखील मोठ्या प्रमाणावर होत असते. याचा अतिरेक असा की मागील काही वर्षांमध्ये बिबट्यांचा वावर हा शहरात देखील होताना दिसून आले आहे. सद्यस्थितीला मोजकेच पिंजरे असल्याने मोठ्या प्रमाणावर अडचणींना सामोरे जावे लागत होते. याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले यांनी शासनाकडे श्रीरामपूर- राहुरी विधानसभा मतदारसंघाकरिता अतिरिक्त पिंजऱ्यांची मागणी केली होती ; त्या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दालनामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्या बैठकीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातून आमदार हेमंत ओगले आणि पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते हे उपस्थित होते. याच बैठकीत आमदार ओगले यांनी मतदारसंघातील बिबट्याच्या दहशतीची वस्तुस्थिती शासनाच्या निदर्शनास आणून देत मतदारसंघाकरिता १५ पिंजरे द्यावेत तसेच श्रीरामपूर येथे वन विभागाचे कार्यालय व्हावे, अशी मागणी केली सदर बैठकीत काही मागण्या तत्वतः मान्य केल्या होत्या.
नुकतेच वनविभागाने श्रीरामपूर मतदारसंघाकरिता १३ पिंजरे दिले असल्याने यापुढील काळात बिबट्याच्या दहशतीतून सुटका मिळणार आहे. शेतकऱ्यांना व नागरिकांना याबाबत काही अडचण असल्यास त्यांनी मला अथवा जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आमदार हेमंत ओगले यांनी आवाहन केले आहे.