श्रीरामपूर : राज्य सेवा हक्क आयोगाचे आयुक्त दिनांक १४ मे रोजी श्रीरामपूर दौऱ्यावर असताना, शहरातील अनेक सेतू सेवा केंद्रे अचानक जाणीवपूर्वक बंद ठेवण्यात आली. या प्रकारामुळे शेकडो नागरिकांचे शासकीय कामकाज अडथळ्यात आले असून, सेवा हक्क अधिनियमाचा गंभीर भंग झाल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. यासंदर्भात राजेश बोरुडे यांनी प्रशासनाकडे तक्रार करून सेतू सेवा चालकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कर्मवीर चौक ते तहसील कार्यालय परिसरातील अनेक सेवा केंद्रे आयुक्तांच्या दौऱ्याच्या दिवशी बंद असल्याचे राजेश बोरुडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ तहसीलदार कार्यालयात लेखी तक्रार दाखल करून संबंधित केंद्रचालकांवर कारवाईची मागणी केली आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता केंद्रे बंद ठेवण्यात आली. नागरिकांच्या सेवा हक्कावर अन्याय झाला आहे. आयुक्तांच्या अचानक भेटीत त्रुटी उघड होण्याची शक्यता असल्याने ही केंद्रे मुद्दाम बंद ठेवण्यात आली, असा आरोप बोरुडे यांनी केला.
महाराष्ट्र सेवा हक्क अधिनियम, २०१५ अंतर्गत दोषींवर कायदेशीर कारवाई करावी. सेवेस विलंब करणाऱ्या केंद्रांचे परवाने रद्द करावेत. भविष्यात अशा प्रकारची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नियंत्रण यंत्रणा अधिक प्रभावी करावी, आदी मागण्या राजेश बोरुडे यांनी केल्या आहेत.या घटनेचे पुरावे प्रशासनाला सादर करणार असून, सेतू केंद्रे बंद असल्याचे स्पष्ट चित्र त्यात आढळते, असेही बोरुडे यांनी म्हंटले आहे.