श्रीरामपूर : विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून धार्मिक तेढीच्या माध्यमातून सामाजिक सौहार्द बिघडवणाऱ्या व्यक्ती व कार्यक्रमांना पायबंद घालावा, अशी मागणी श्रीरामपूर येथील सामाजिक सलोखा समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहर व तालुक्यात धार्मिक द्वेष पसरविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यावरून आंदोलन-प्रतिआंदोलने सुरू आहेत. त्या माध्यमातून आव्हाने प्रति आव्हाने दिली जात आहेत. त्यामुळे धार्मिक ध्रुवीकरणाची प्रक्रिया सुरू असून सामाजिक शांतता भंग होण्याची दाट शक्यता आहे. धार्मिक सौहार्द कायम रहावे म्हणून सार्वजनिकरित्या द्वेषपूर्ण विधाने करण्याचा इतिहास असलेल्या व्यक्तींना सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास व द्वेष पूर्ण वक्तव्ये करण्यास मनाई करण्यात यावी. गेल्या पंधरा दिवसांत अशी वक्तव्ये असणारी आंदोलने व कार्यक्रम रोखण्यास पोलीस व प्रशासनास अपयश आल्याने सामाजिक शांतता धोक्यात आली आहे. ती मालिका खंडित होण्याची चिन्हे दिसत नाही येत.
हिंदु-मुस्लिम द्वेष पसरविण्याचा इतिहास असणाऱ्या व्यक्तींना सार्वजनिकरित्या तशी वक्तव्ये करण्यापासून रोखावे व त्यांचा समावेश असणाऱ्या कार्यक्रमांना पोलीस प्रशासनाने परवानगी देऊ नये. द्वेषपूर्ण व प्रक्षोभक संदेश व व्हिडीओ सोशल मिडीयावर पसरविणाऱ्यांवर निर्बंध घालून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. शहरातील वातावरण तणावग्रस्त करण्यास जबाबदार असणाऱ्यांना विधानसभा निवडणूक होईपर्यंत हद्दपार करण्यात यावे. तणावग्रस्त वातावरण निवळण्याकरता शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात यावी. या मागण्या जिल्हाधकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात शिष्टमंडळाने मांडल्या आहेत. यावेळी जिल्हाधिकारी व पोलीस प्रशासनाने शिष्टमंडळाने उपस्थित केलेले मुद्दे समजावून घेत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासित केले.
यावेळी शिष्टमंडळात डॉ. वसंत जमधडे (विचार जागर मंच), जीवन सुरुडे, शरद संसारे (लाल निशाण पक्ष), डॉ. जालिंदर घिंगे (विद्रोही सांस्कृतीक चळवळ/ वंचित बहुजन आघाडी) अँड. राजेश बोर्डे पाटील,लकी सेठी (राष्ट्रवादी काँग्रेस, एस.पी), डॉ. सलीम शेख,अशोकराव दिवे, (विद्रोही सांस्कृतीक चळवळ), किशोर संचेती (जैन समाज संघटना), सुनील वाघमारे, सागर खरात (वंचित बहुजन आघाडी), कुमार भिंगारे, अमोल सोनवणे (विद्रोही विद्यार्थी संघटना) फ्रान्सिस शेळके, (भारत मुक्ती मोर्चा), धनंजय कानगुडे (सामजिक कार्यकर्ते), एस. के. बागुल (बामसेफ) आदि उपस्थित होते.