शहरातील नेवासा-संगमनेर रस्ता, गोंधवणी रस्ता, दशमेश चौक भाग, दळवी वस्ती रस्ता, छ.शिवाजी महाराज चौक भाग, म.गांधी चौक व बस स्थानक परिसर रस्त्यांची पुरती चाळणी झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते उखडले आहेत. जागोजागी पडलेल्या खड्डयात पाणी साचत आहे. दशमेश चौक पारिसरात झालेले अतिक्रमण व अनेक ठिकाणी पडलेल्या खड्डयामुळे शाळकरी मुले व नागरिकांना येथून जाता-येताना जीव मुठीत धरून जावे लागते. वाहन चालवताना नागरिकांचा पूर्ण खुळखुळा होत आहे. वाहने खराब होत आहेत. आरोग्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. रस्त्यांचे निकृष्ट कामे करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टवर कोणतीही कारवाई केली जात नाही. शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी, वृद्ध व्यक्तींचा मार्गक्रमण करताना जीव टांगणीला लागत आहे. शहरातील जनतेच्या जीवाशी खेळण्याचे काम ठेकेदार व नगरपरिषद प्रशासन करत असल्याची टीका राजेश बोरुडे यांनी केली आहे.
शास्रशुद्ध पद्धतीने खड्डे बुजवा...
शहरातील डांबरी रस्त्यावरील खड्डे सध्या मुरमाने बुजवून निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार चालू आहे. खड्डयात एअर कॉम्प्रेसर मारून सर्व धूळ, माती बाहेर काढून दर्जेदार डांबर व खडीने पॅचिंग होणे गरजेचे आहे. रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने मुरमाने बुजविलेले खड्डे लागलीच उखडणार आहेत. केवळ खड्डे न बुजविता रस्त्यांचे नुतनिकरण करणे आवश्यक आहे.
- राजेश बोरुडे
शहरातील बहुसंख्या जनता ही गोंधवणी रोड परिसरात राहते. गोंधवणी रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. जलशुद्धीकरण केंद्र, एज्युकेशन शाळा, कॅनॉल लगतच्या परिसरात मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. छोटे-मोठ्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. येथे गरिरोधकांची आवश्यकता आहे. शहरातील या सर्व रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावे, दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना काळ्या यादीत टाकावे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.