श्रीरामपूर | वाचनालय व अभ्यासिकेला राजकीय अड्डा बनवू नका; सर्वसामान्य श्रीरामपूरकरांचे खडे बोल


श्रीरामपूर  : नगरपालिकेमार्फत चालवले जाणारे मेनरोड आझाद मैदान येथील लोकमान्य टिळक वाचनालय व अभ्यासिका यांचा दर्जा महाराष्ट्रात उल्लेखनीय आहे. शहरातील विद्यार्थ्यांच्या हितासाठी ही अभ्यासिका दररोज 12 तास चालू असते. अत्यल्प दरामध्ये गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सोय नगरपालिकेने या ठिकाणी केलेली आहे. मात्र, तेथील कर्मचारी व अभ्यासिकेतील विद्यार्थी यांच्यामध्ये गेल्या काही दिवसापासून सुप्त संघर्ष पाहाव्यास मिळत आहे. यामागे शहरातील काही लोक राजकीय उद्देशाने आपले हेतू साध्य करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत असून अभ्यासिकेमध्ये फक्त अभ्यास झाला पाहिजे आणि तो ही शिस्तीत झाला पाहिजे. पालकांच्या अपेक्षा पूर्ण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे त्यांनी येथे फक्त अभ्यास करावा, इतर गोष्टींकडे लक्ष देऊ नये. त्याचबरोबर वाचनालयाच्या कर्मचाऱ्यांनी देखील तारतम्य ठेवून विद्यार्थ्यांशी वागावे अशी अपेक्षा शहरातील सर्वसामान्य नागरिकांनी व्यक्त केली आहे.

           लोकमान्य टिळक वाचनालयाच्या अभ्यासिकेतील विद्यार्थी व वाचनालयाच्या ग्रंथपाल यांच्यामध्ये दोन दिवसापूर्वी संघर्ष झाला. त्यातून विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करून वाचनालय दणाणून सोडले. नगरपालिकेचे मुख्याधिकारी आल्याशिवाय चर्चा करणार नाही असा सूर त्या विद्यार्थ्यांचा होता. शेवटी नाईलाजाने मुख्याधिकारी सोमनाथ जाधव हे तेथे आले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संपर्क साधला असता ग्रंथपालाबद्दल त्यांच्या खूप तक्रारी असल्याचे दिसून आले. स्टडी टेबल च्या फळ्या काढून घेणे, हॉलमध्ये बसू न देणे, मुलींना नको ते बोलणे, उद्धटपणाशी वागणे अशा प्रकारचे आरोप उपस्थित विद्यार्थ्यांनी ग्रंथपालांवर केले व त्यांची येथून बदली करावी अशी मागणी केली. मात्र मुख्याधिकाऱ्यांनी या प्रकाराला सपशेल नकार देऊन कोणत्याही कर्मचाऱ्यांची बदली केली जाणार नाही. कारण असे केले तर नवीन प्रथा पडेल.परंतु विद्यार्थ्यांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या निश्चितपणे सोडविल्या जातील असे आश्वासन दिले. त्याचबरोबर ग्रंथपालांना अभ्यासिकेबाबतच्या काही सूचना केल्या. त्यानंतर या प्रकरणावर पडदा पडला परंतु या घटनेची शहरात खूपच चर्चा झाली.

             याबाबत आमच्या प्रतिनिधीने वस्तूस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता असे दिसून आले कि वाचनालयामध्ये नियमितपणे काही कार्यक्रम होतात. कार्यक्रमासाठी हॉल घेणारे लोक आपल्या पद्धतीने तेथे व्यवस्था करण्याचा प्रयत्न करतात.त्यातून हॉल विद्रूप होण्याची शक्यता असते तसेच काही विद्यार्थ्यांचे पालक कारण नसताना ग्रंथपालांशी वाद घालताना दिसतात.यात काही लोक राजकीय हस्तक्षेप सुद्धा करीत आहेत. परंतु हे सर्व वाचनालयाच्या नावलौकिकास बाधा आणणारे आहे.

             वाचनालयाच्या ग्रंथपाल या अनेक वेळा वादग्रस्त ठरल्या आहेत. त्याबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या बाबी समोर आणल्या त्यावर ही विचार होणे आवश्यक आहे. अभ्यासिकेत येणारे सर्वच विद्यार्थी गोंधळ करणारे नाहीत.मात्र काही जण तेथे अभ्यास न करता इतर उद्योग करतात.अभ्यासाऐवजी तासान तास मोबाईलवर बोलत बसतात तसेच टेबलवर बसून समोरच्या टेबलावर पाय ठेवतात. त्यामुळे इतरांना त्रास होतो.मुलींना सुद्धा शिस्त लागावी म्हणून दोन शब्द सांगितले तर त्याचा विपर्यास करून वाचनालयाची बदनामी होईल अशा पद्धतीने प्रसार माध्यमांपुढे मांडणी करण्यात आली. वास्तविक पाहता अभ्यासिकेमध्ये अभ्यास करणे एवढेच उद्दिष्ट आहे. परंतु अभ्यास करणारे काही विद्यार्थी दुसराच अभ्यास करतात. अशांना शिस्त लावण्यासाठी जर दोन शब्द सांगितले असेल तर बिघडले कुठे ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अभ्यासिकेच्या फी वाढीबद्दल बोलताना हा निर्णय नगरपालिकेचा आहे. मी येथील कर्मचारी म्हणून फक्त ते राबवण्याचे काम करीत आहे. उद्या जर नगरपालिकेने फी वाढीबाबत वेगळा निर्णय घेतला तर तो ही राबविण्याचा मी प्रयत्न करीन असे त्यांनी सांगितले. विशेष म्हणजे विद्यार्थी आणि ग्रंथपाल यांचा हा सर्व वाद फारसा मोठा नव्हता.परंतु, यामध्ये एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केल्याने त्याला वेगळे स्वरूप येऊ पाहत आहे. 

           श्रीरामपूर नगरपालिकेचे वाचनालय हे राज्यात प्रसिद्ध आहे. हरिभाऊ कुलकर्णी, प्रभाकर विसपुते यांच्यासारख्या ग्रंथपालांनी या वाचनालयाचा दर्जा कायम राखण्याचे काम केले आहे. आता सुद्धा ग्रंथपाल स्वाती पुरे यांच्याकडून चांगली कामगिरी होत आहे. नियोजन करून राबविले जाणारे विविध उपक्रम त्यांच्या मार्गदर्शनाखालीच यशस्वी झाले आहेत. परंतु विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून त्यांनी दोन शब्द सांगितले असतील तर इतर लोक त्याला खतपाणी घालून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करीत आहे ही बाब निश्चितच चांगली नाही.

         अत्यंत कमी खर्चामध्ये शहरातील विद्यार्थ्यांना नगरपालिका अभ्यासिकेची सुविधा निर्माण करून देते. इतर शहरांमध्ये हजार, दीड हजार रुपये मासिक फी असताना इथे फक्त शंभर रुपये फी आकारली जाते. शिवाय महागडी पुस्तके अभ्यासासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता या ठिकाणी दोन शिफ्ट मध्ये अभ्यासिका चालविणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन एकही दिवस सुट्टी न घेता अभ्यासिकेचे कर्मचारी काम करतात.परंतु आता त्यांना सुद्धा असं वाटतंय कि आता आपल्याला किमान आठवड्यातून एक सुट्टी मिळाली पाहिजे.

         वाचनालयाच्या ग्रंथपाल स्वाती पुरे या अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांना आरेरावी करतात,वैयक्तीक बाबींवरून बोलतात व मानसिक त्रास देतात, अशी तक्रार करून विद्यार्थ्यांनी तेथे ठिय्या आंदोलन केले. पुरे यांच्या विरोधातील घोषणांनी वाचनालय परिसर निनादून गेला. अखेर मुख्याधिकाऱ्यांना आंदोलकांची भेट घ्यावी लागली. आपली कैफियत मांडून विद्यार्थ्यांनी पुरे यांची बदली करण्याची मागणी केली.

          याबाबत मुख्याधिकारी जाधव यांनी वाचनालयात येऊन विद्यार्थ्यांची चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या जागी तक्रारी आहेत त्या दुरुस्त करण्याची सूचना त्यांनी ग्रंथपालांना केली तसेच विद्यार्थ्यांनीही अभ्यास करावा, वाचनालयात राजकारण न आणता विद्यार्थ्यांप्रमाणे वागावे असा सल्लाही त्यांनी दिला.

          गौरी कुलथे, महेश तारगे, अशोक गांगुर्डे, अभिषेक अग्रवाल, सोमा कासार आदी विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महिनाभरापूर्वी पालिका प्रशासनाने अभ्यसिका शुल्कात अचानक १० पट वाढ केली. शुल्क न भरलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासास पुरे यांनी मज्जाव केला होता. त्यावेळीदेखील पुरे यांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मागणीवरून पुरे यांची बदली केल्यास वाईट प्रथा पडून जाईल. तसे झाल्यास कोणीही निवेदन देतील व पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्याची बदली करतील. त्यामुळे त्यांची बदली होणार नाही. विद्यार्थ्यांच्या शुल्काबाबत आचार संहिता संपल्यानंतर प्रांताधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. शिवाय विद्यार्थ्यांना आणखी सुविधा पुरविल्या जातील  असे मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांनी सांगितले.

            यासंदर्भात दुसरी बाजू मांडताना वाचनालयाचे काही कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सांगितले कि अभ्यासिकेला साप्ताहिक क सुट्टी देण्यात यावी. अभ्यासिकेसाठी येणाऱ्या विद्यार्थी, विद्यार्थीनींचा मनमानी कारभार सुरू आहे.फोनवर तासन तास बोलणे,पाय पसरून बसणे स्टडी टेबल वर बसून टेबलावर पाय ठेवणे असे प्रकार काही जण करीत असल्याने त्याचा त्रास इतरांना होतो त्यामुळे त्यांना बोलावेच लागते.

           पूर्वी वाचनालय विभागात महिला विभाग,बाल विभाग, संदर्भ विभाग असे विभाग होते.त्या ठिकाणी अभ्यासिका विभाग करण्यात आला. वाचनालय विभागाचे पहिले ग्रंथपाल हरिभाऊ कुलकर्णी यांच्या वेळेस टाचनी पडली तर आवाज नव्हता. इतकी शिस्त होती.अभ्यासिकेच्या मुलांना जर बोलले तर विद्यार्थी यांची मान वर करुन बघायची ताकत नव्हती.  या वाचनालयातून मुले अभ्यास करून अनेक विद्यार्थी उच्च पदापर्यंत पदापर्यंत पोहचले आहेत.काही विद्यार्थी आरे रावीची भाषा करतात.जे खरच अभ्यास करणारे विद्यार्थी आहे त्यांचेच भवितव्य घडू शकते.जे विद्यार्थी,विद्यार्थीनीं राजकारण करून ईतर अभ्यास करणारे विद्यार्थी यांना नुकसान पोहचवत असतील तर अशा विद्यार्थ्यांना अभ्यासिकेसाठी प्रवेश देवू नये.नगर पालिकेने मुलांना अभ्यासिके साठी नियम व अटी लागू करावेत.

         दरम्यान,वाचनालय व अभ्यासिकेमध्ये घोषणाबाजी करणे आंदोलन करणे या बाबी अनाकलणीय आहेत.विद्यार्थी आणि ग्रंथपाल यांच्यातील वाद असला तरी यामध्ये काही बाह्य शक्ती हस्तक्षेप करीत आहेत का राजकीय पक्षाच्या पुढार्‍याने तर याबाबत उपोषणाचा इशारा दिला. तर एका व्यापाऱ्याने आपला संबंध नसताना या वादात नाक खुपसले. दिवसभर याच प्रकाराची चर्चा शहरात होती.. मात्र या अभ्यासिकेचे नावलौकिक पाहता येथे गालबोट लागेल असे कोणतेही कार्य होऊ नये विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी ही अभ्यासिका नगरपालिका चालवीत असल्याने विद्यार्थ्यांनी येथे अभ्यास करावा व शिस्त पाळावी जेष्ठतेच्या नात्याने जर कोणी चार शब्द बोलले असेल तर ते सहन करावेत व पालकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात त्याचबरोबर पालिकेचे वाचनालयाच्या ग्रंथपाल व त्यांचे इतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांशी सौजन्याने वागावे किरकोळ गोष्टीवरून वाद वाढवून वाचनालयाच्या नावास बाधा येईल असली कामे करू नये असा सल्ला सुद्धा शहरातील जाणकार व जेष्ठ नागरिकांनी दिला आहे.

             याबाबत ग्रंथपाल स्वाती पुढे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या विषयाबद्दल मला काही बोलावयाचे नाही मी माझे कार्य इमानेइतबारे करीत आहे. परंतु याबाबत कोणाला वाईट वाटत असेल तर आता वाचनालयाच्या व अभ्यासिकेचे नियमानुसार मी माझे काम करीन एवढेच सांगितले.

पालिका कर्मचाऱ्यांचा अंतर्गत कलह कारणीभूत

या संदर्भात पालिका गोटातून माहिती घेतली असता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये अनेक गट आहेत या गटबाजीतून एकमेकांबद्दल चुकीची माहिती प्रसार माध्यम व समाज माध्यमांना दिली जाते व आपल्याच सहकार्यांना त्रास कसा होईल असा प्रयत्न काही कर्मचाऱ्याकडून केला जात असल्याचे दिसून आले. मुख्याधिकारी सोमनाथ जाधव हे नुकतेच येथे बदलून आलेले आहेत त्यांना येथील पूर्ण इतिहास माहीत नसल्याने त्यांना चुकीची माहिती पुरवून कर्मचाऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न काही जण करीत असल्याचे समजते.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post