श्रीरामपूर शहरात रोगराई पसरण्याची शक्यता; गटारी तुंबल्या, ठिकठिकाणी कचरा, डासांचा प्रादुर्भाव, नागरिकांचे आरोग्य धोक्यात : श्रीरामपूर पालिकेत गटारीचे पाणी सोडणार - 'समाजवादी'चा इशारा


श्रीरामपूर : श्रीरामपूर शहरात ठिकठिकाणी साचलेला कचरा, तुंबलेल्या गटारी, अस्वच्छता, डासांचा वाढलेला प्रादुर्भाव यामुळे  श्रीरामपुरवासियांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागात तक्रारी करूनही संबंधित अधिकारी-कर्मचारी नागरिकांना जुमानत नसल्याचे दिसत आहे. पालिका प्रशासन व आरोग्य विभागातील आकार्यक्ष कारभारविरुद्ध शहरवासी आक्रमक होऊ लागले आहेत. दरम्यान,  नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे नागरीकांच्या घरात शिरत असलेले गटारीचे घाण पाणी टॅंकरमध्ये भरुन नगरपालिकेत सोडणार असल्याचा इशारा समाजवादी पार्टीच्या वतीने देण्यात आला आहे. गटारीच्या घाण पाण्यामुळे शहरात रोगराई पसरल्यास नगरपालिका प्रशासनच जबाबदार धरण्यात यावे, असे 'समाजवादी पार्टी'चे जिल्हाध्यक्ष जोएफ जमादार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

             श्रीरामपूर नगरपालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे 'स्वच्छ श्रीरामपूर सुंदर श्रीरामपूर'चे तीन तेरा वाजले असल्याचे दिसून येत असून, वॉर्ड क्र.२ मधील वैदूवाडा परीसरातील पाटाच्या पुलाजवळील काही घरांमध्ये चक्क गटारीचे घाण पाणी शिरले आहे. रमजानच्या या पवित्र महीन्यात प्रार्थनेसाठी घराबाहेर पडून मशिदीत जाणे  मुश्किल झाले आहे.नगर पालिका प्रशासनाविरुद्ध नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. कायमच्याच या गंभीर समस्येंमुळे काही नागरीक तर आपले घरे सोडून इतरत्र रहावयास गेले व जात आहेत. सततच्या या प्रकारामुळे शहरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. या ठिकाणी पाण्यावर मृत्यूला निमंत्रण देवू पाहणाऱ्या स्ट्रिट लाईटच्या काही तुटलेल्या अवस्थेतील लोंबकळत्या वीजेच्या तारा आणी रस्त्याच्याकडेला गटारीच्या घाण पाण्याने तुडुंब भरलेल्या परिसरातील रस्त्यांसह गटारींचे खोल ढापे यात बुडून एखाद्या निर्पराधाचा जीव जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यावर वेळोवेळी तक्रार करुनही कार्यवाही झाली नाही.

                गत पाच दिवसांपासून सदरील गटारीचे घाण पाणी परिसरातील नागरिकांच्या घरात शिरले आहे. त्रस्त नागरीक वारंवार नगर पालिका प्रशासनाकडे तक्रार करत आहेत. मात्र नगर पालिकेचे संबंधित कर्मचारी कधी तरी येवून थातूरमातूर पद्धतीने कामे करुन निघून जातात. शहरातील घनकचरा असो वा गटार साफसफाई याविषयी शहराच्या प्रत्येक प्रभागात अशीच भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. यामुळे शहरात रोगराई पसरण्याची दाट शक्यता निर्माण झालीअसल्याचे प्रसिद्ध पत्रकात म्हंटले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post