श्रीरामपूर | गोंधवणीतील नगरपालिका शाळा ३ मध्ये प्रवेश प्रक्रिया सुरु ; विविध योजनांचा समावेश, शासकीय शाळांमध्ये वाढणार विद्यार्थी : पालिका शाळेत वाढली शिक्षकांची संख्या


श्रीरामपूर : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गोंधवणीतील महादेव मंदिराजवळील नगरपालिका शाळा क्रमांक ३ येथे शैक्षणिक वर्ष २०२४-२५ साठी मोफत प्रवेश प्रकिया सुरु झाली आहे. दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण, ई-लर्निंग अध्यापन, व्यक्तिमत्व विकासासह विविध योजनांचा यात समावेश असणार आहे. नगरपालिका शाळांमध्ये नुकतीच पवित्र पोर्टलमार्फत नवीन शिक्षकांची नियुक्ती झाली आहे. अनुभवी शिक्षकांसोबतच नवनियुक्त गुणवत्ताधारक शिक्षक उपलब्ध झाल्याने विदयार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर अधिकाधिक भर राहणार आहे. दरम्यान, शिक्षण हक्क कायद्यात यंदा बदल झाल्यामुळे सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा लागणार असल्याने शासकीय शाळांना 'अच्छे दिन' आले आहे. खाजगी, महागड्या, दिखाव्या व आर्थिक लूट करणाऱ्या खाजगी शाळांपासून पालक-विद्यार्थ्यांची होणारी पिळवणूक थांबून सरकारी शाळांकडे विदयार्थ्यांचा कल वाढणार आहे.

शहरात नगरपालिकेच्या अनेक शाळा असून त्यातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.  शाळांमध्ये एलईडीचा वापर व नवनवीन अत्याधुनिक शैक्षणिक उपक्रम राबविले जात असल्याने विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक अभिरुची निर्माण होत आहे. मुला-मुलींना मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शूज, शालेय पोषण आहार, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, शिष्यवृत्ती योजना, इयत्ता ५ वी शिष्यवृत्ती योजना, अतिरिक्त व पूरक आहार योजना अशा अनेक योजनांचा लाभ विद्यार्थी घेत आहेत.

आतापर्यंत शिक्षण हक्क कायद्यानुसार, आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खासगी शाळेत 25 टक्के आरक्षित जागेवर प्रवेश मिळत होते. परंतु, राज्य सरकारने या कायद्यात आता बदल केला आहे. नव्या नियमानुसार आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना त्यांच्या जवळच्या खासगी शाळेपासून एक किलोमीटर परिघात सरकारी किंवा सरकारी अनुदानीत शाळा असल्यास या शाळांमध्ये प्राधान्याने प्रवेश घ्यावा लागेल.


Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post