आधार अपडेट मधील शेतकऱ्यांची हेळसांड थांबवा ;बोटांच्या ठशांऐवजी डोळ्यांचे स्कॅनिंग करा, पात्र असतानाही अनेक योजनांचा लाभ मिळेना : प्रशासनाने मार्ग काढण्याची मागणी


श्रीरामपूर ( साईकिरण टाइम्स ) : विविध सरकारी योजनांसाठी वयोवृद्ध शेतकऱ्यांचे आधार कार्ड अपडेट करण्यासाठी बोटांचे ठसे व्यवस्थित उमटत नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत आहे. यामुळे पात्र असताना अनेक योजनांना मुकावे लागत आहे. बँकेसह इतर सर्वच कामे खोळंबली आहेत. यातून प्रशासनाने मार्ग काढण्याची मागणी वडाळामहादेव सेवा संस्थेचे चेअरमन दिलीपराव पवार यांनी केली आहे.

        याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात दिलीपराव पवार यांनी पुढे म्हटले आहे की, आज प्रत्येक सरकारी कामात आधार कार्ड अपडेट असणे आवश्यक झाले आहे. यामुळे सर्वत्र आधार कार्ड अपडेट करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आधार कार्ड अपडेटमध्ये मोबाईल नंबर, ई- मेल जोडावा लागत आहे. आधार कार्ड अपडेट झाल्यानंतर बँक खाते, ७/१२, ८ अ व इतर अनेक ठिकाणी लिंक करणे गरजेचे झाले आहे. यामुळे शहरासह ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आधार कार्ड अपडेट व इतर कागदपत्रांसाठी लिंक करुन घेण्यासाठी गर्दी करत आहेत. युवक, युवतींचे आधार कार्ड अपडेट करण्यास अडचणी निर्माण होत नाहीत. मात्र, ७० वर्षांपुढील किंवा ज्यांचे मेहनतीचे जास्त काम आहे, अशा शेतकरी, कष्टकरी नागरिकांचे, महिलांचे ठसे उमटणे कठीण झाले आहे. ठसे जुळत नसल्यामुळे अनेकांचे आधार कार्ड हे बँक खात्याशी लिंक होत नाही.

बोटांच्या ठशांऐवजी डोळ्यांचे स्कॅनिंग करा...

आधार कार्ड अद्ययावत नसल्यामुळे बँकेचे व्यवहार, शेतीचे विविध सरकारी अनुदान, पंतप्रधान सन्मान निधीची रक्कम जमा होत नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. तहसील कार्यालय, गोंधवणी येथील कृषी विभागाच्या कार्यालयात शेतकरी हेलपाटे मारत आहेत. प्रशासनाने बँकांना बोटांच्या ठशांऐवजी डोळ्यांचे स्कॅनिंग करून आधार अपडेट करण्याचे त्वरीत आदेश द्यावेत, अशी मागणी दिलीपराव पवार यांनी केली आहे

.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post