इंन्कलाब - भाग १
श्रीरामपूर ( राजेश बोरुडे ) : श्रीरामपूर शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे शहरवासियांना रोज मरणयातना भोगाव्या लागत आहे. आकार्यक्षम पालिका प्रशासन व रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या मुजोर कंत्राटदारांनी श्रीरामपुकरांचा अक्षरशः छळ चालविला आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराची तर पुरती चाळणी झाली असून, येथे ठिकठिकाणी पडलेले खड्डे, बंद असलेले सिंग्नल आणि वाहतुकीची दिवसरात्र होणाऱ्या कोंडीमुळे घरातून गेलेली व्यक्ती घरी परत येईल का नाही, याची कोणतीही शाश्वती राहिलेली नाही. दरम्यान, पालिका हद्दीतील रस्त्यांवर कोट्यवधी रुपये खर्चूनही ठिक-ठिकाणी खड्डे पडून रस्त्यांची बाराही महिने अत्यंत दयणीय अवस्था होत असल्याने शहरातील रस्त्यांवर शेती करण्याची परवानगी मिळावी. निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करून त्याच-त्याच ठेकेदारांना रस्त्यांची कामे देऊ नये, अशी मागणी राजेश बोरुडे यांनी प्रशासनाकडे केली आहे.
यासंदर्भात राजेश बोरुडे यांनी प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. शहरातील जनता नगरपरिषदेकडे विविध कर भरूनही पालिका प्रशासन शहरवासियांना नागरी सुविधा पुरविण्यास असमर्थ ठरत आहे. नेवासा रस्त्यावरील रेल्वे, बस स्थानक परिसर, म. गांधी चौक परिसर ठिक-ठिकाणी मोठे-मोठे खड्डे पडले आहेत. बोरावके महाविद्यालय लगतचा इंदिरा नगरकडे जाणारा रस्ता जागोजागी उखडला आहे. दशमेश चौक परिसरात जागोजागी खड्डे पडले असून या ठिकाणी वाहतुकीची कायमच कोंडी होते.
रस्त्यांची कामे अत्यंत निकृष्ट दर्जाची केली जात असताना पालिका प्रशासन कंत्राटदारांवर कारवाई का करत नाही? निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर आजपर्यंत कारवाई का झाली नाही? दर्जाहीन कामे करणाऱ्या ठेकेदारांनाच रस्त्यांची कामे कशी दिली जातात.? शहरातील रस्त्यांवर अवाढव्य खर्च होऊनही रस्त्यांची कामे गुणवत्तापूर्ण का होत नाही? रस्त्यांची कामे करताना साहित्त्याची तपासणी केली जाते का नाही? केली जात असेल तर निकृष्ट मटेरीयल वापरून रस्ते का करू दिले जातात? रस्त्यांच्या दर्जाबाबत वारंवार तक्रारी होत असताना प्रशासन ठेकेदारांवर कारवाई का करत नाही? असे अनेक सवाल राजेश बोरुडे यांनी उपस्थित केले आहेत.
शिवाजी महाराज चौक, नेवासा रस्ता, संगमनेर रस्ता, शिवाजी महाराज रस्ता, मुख्य रस्त्यासह सर्व प्रमुख, अंतर्गत रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करून यापूर्वी याच रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांवर कायदेशीर कारवाई करून त्यांना कायमस्वरूपी काळ्या यादीत समाविष्ट करण्याची मागणी करून नगरपरिषद प्रशासनाला गुणवत्तापूर्ण काम करणारे कॉन्ट्रॅक्टर मिळत नाही का? कायम त्याच-त्याच ठेकेदारांना कामे का दिली जातात? असा सवाल राजेश बोरुडे यांनी केला आहे.
पालिकेचे अधिकारी व कंत्राटदार संगणमताने श्रीरामपुरकरांसह शासनाची फसवणूक करत आहे. शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट कामांना पालिकेचे संबंधित अधिकारी व ठेकेदार जबाबदार आहे. अधिकारी कंत्राटदरांकडून टक्केवारी घेत असल्याने ठेकेदारांवर कोणतीही कारवाई केली जात नसल्याचा आरोप राजेश बोरुडे यांनी केला आहे.
रस्त्यांची निकृष्ट कामे करणारे कॉन्ट्रॅक्टर व पालिकेचे संबंधित अधिकाऱ्यांनी स्वतःचे खिशे भरण्याचा चालविलेला कार्यक्रम त्वरित थांबवावा. निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांना पुनः कामे देऊ नये त्यांना काळ्या यादीत टाकावे. शहरातील सर्व मुख्य, अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे शास्रशुद्ध पद्धतीने त्वरित बुजवावे. रस्त्यांची डागडुजी करून रस्त्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या ठेकेदारांवर कायदेशीर करावी, अन्यथा पालिका प्रशासनाविरोधात उपोषण, आंदोलन, ठिय्या, घेराव, धरणे अंदोलन करण्याचा इशारा राजेश बोरुडे यांनी दिला आहे.