फळ रोपवाटिकेतील कामगारांना 82 लाख देण्याचे कामगार न्यायालयाचे आदेश


श्रीरामपूर :  अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा ता. राहाता तसेच काष्टी, ता. श्रीगोंदा येथील फळ रोपवाटिका मधील  रोजंदारी कामगारांना समान कामाला समान वेतन यानुसार 1/26  दरानुसार रोजंदारी  कामगारांना 82 लाख रुपये देण्याचे आदेश  कामगार न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित देशमुख यांनी दिले आहे.  याबाबतची माहिती अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस कॉ. बाळासाहेब सुरूडे यांनी दिली आहे.

याबाबत माहिती अशी की, पुणतांबा येथील फळ रोपवाटिका मधील रोजंदारी कामगार सुशीला बोडखे, शांताबाई देठे, सुलोचना ढंगारे, अशोक थोरात यांनी सन 2021 मध्ये तसेच सन 2022 मध्ये काष्टी फळ रोपवाटिका येथील शिवाजी ढवाण, बापू शेळके, तुकाराम ढवाण, बंडू राऊत यांनी  कामगार न्यायालय, अहमदनगर यांचे समोर समान कामाला समान वेतन 1/26 दराने रोजंदारी वेतनाचा सन 1988 पासून चा फरक मिळणे कामी आयडीए अर्ज  दाखल केले होते. 

अहमदनगर जिल्ह्यातील तालुका फळ रोपवाटिका व बीजगुणन केंद्रावरील रोजंदारी कामगारांना समान कामाला समान वेतन 1/ 26 रोजंदारी दराने वेतन देण्याबाबतचे आदेश औद्योगिक न्यायालय, अहमदनगर व उच्च न्यायालय खंडपीठ, औरंगाबाद यांनी दिले होते.  परंतु कृषी खात्याने सदर आदेशाची अंमलबजावणी केली नाही, म्हणून कामगार न्यायालय, अहमदनगर यांच्यासमोर यापूर्वी 150 कामगारांनी केसेस दाखल केल्या होत्या. या सर्व केसेस कामगार न्यायालय व उच्च न्यायालय यांनी मंजूर करून याचिकेतील कामगारांना १२ टक्के व्याजासह दोन कोटीची रक्कम सन 2017-18  मध्ये कृषी खात्याला अदा करावी लागली होती.  त्यानुसार वरील 8 कामगार सध्या कामावर असून सुद्धा न्यायालयीन आदेश असतांना देखील वेतन फरक त्यांना दिला जात नव्हता.  म्हणून कामगार न्यायालयात युनियनच्या  वतीने कामगारांनी विवाद दाखल केलेला होता. 

 सदर विवादात कामगार न्यायालयाने दोन्ही बाजूचे साक्षी पुरावे तपासून 8 कामगारांना 83 लाख रुपये तीन महिन्यात  देण्याचे आदेश करून तीन महिन्यात रक्कम अदा न केल्यास रक्कम अदा होईपर्यंत 6 टक्के व्याज देण्याचे आदेश 31 ऑगस्ट 2023 रोजी केले आहे. 

कामगार न्यायालयात अर्जदारांचे वतीने कामगार संघटना प्रतिनिधी म्हणून कॉ.बाळासाहेब सुरुडे व अँड. के.वाय. मोदगेकर यांनी कामकाज पाहिले आहे.

Rajesh Borude

Post a Comment

Previous Post Next Post